उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. कृष्णांश योगेश भट एक आहे !
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
(‘वर्ष २०१७ मध्ये ‘चि. कृष्णांश योगेश भट याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असून तो महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आला आहे’, असे घोषित करण्यात आले.’ – संकलक)
‘६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला कु. कृष्णांश योगेश भट (वय ५ वर्षे) याला अनिष्ट शक्ती दिसतात. त्याला मागील दोन जन्मांतील घटनांचे, तसेच विदेशातील काही स्थानांचे स्मरणही होते. सौ. सुचिता मिठबांवकर यांनी कृष्णांशच्या आईला (सौ. वैदेही भट यांना) या संदर्भात जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. कृष्णांशला मागील दोन जन्मांतील गोष्टी आठवणे, सूक्ष्म स्तरावरील भागही जाणवणे आणि तो जात असलेल्या शाळेतील शिक्षकांच्याही ही गोष्ट लक्षात येणे
पूर्वी ठाणे येथे रहाणार्या साधिका सौ. वैदेही योगेश भट मागील सहा मासांपासून बेंगळुरू येथे स्थलांतरित झाल्या आहेत. त्यांचा ५ वर्षांचा मुलगा कृष्णांश याला मागील दोन जन्मांतील गोष्टी आठवतात, तसेच त्याला सूक्ष्मातील काही भागही जाणवतो. त्याला घरात किंवा बाहेर गेल्यावर तेथील किंवा काही व्यक्तींना त्रास देणार्या अनिष्ट शक्ती दिसतात. ठाणे येथे रहात असतांना त्याचा हा भाग लक्षात आला नव्हता; परंतु बेंगळुरू येथे गेल्यावर हे त्याच्या आईच्या लक्षात आले. कृष्णांश त्याला दिसणार्या अनिष्ट शक्तींविषयी हावभाव करून किंवा त्याच्या शब्दांत आईला सांगतो.
तो जात असलेल्या शाळेत (प्रकृती वर्ल्ड स्कूल, बेंगळुरू येथे) आध्यात्मिक स्तरावरील शिक्षण दिले जाते. तेथील शिक्षकांच्या ‘कृष्णांशला शाळेतील मुलांना त्रास देणार्या अनिष्ट शक्ती दिसत असून ‘तो मागील जन्मांतील गोष्टी सांगत आहे’, हेे लक्षात आले. याविषयी त्यांनी श्री. आणि सौ. भट यांना सांगितले.
२. कृष्णांशच्या आईने कृष्णांश सांगत असलेल्या गतजन्मांतील ठिकाणांची सत्यता पडताळून पाहिल्यावर ती ठिकाणे कॅनडा येथे असल्याचे लक्षात येणे
कृष्णांश मागील दोन जन्मांतील ठिकाणे, तसेच ‘त्या ठिकाणी कधी जाऊन आलो ?’, हेही सांगतो. ही ठिकाणे भारतातील नसून विदेशातील आहेत. त्याने ही ठिकाणे सांगितल्यावर त्याची सत्यता पडताळून घेण्यासाठी त्याच्या आईने मायाजालवर (इंटरनेट’वर) तपासण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती ठिकाणे ‘कॅनडा, यु.एस्.ए.’मध्ये असल्याचे तिच्या लक्षात आले. तो वारंवार ‘यु.एस्.’मधील ‘कालिया रोड’ येथे असणार्या ‘कालिया टॉवर’चा उल्लेख करतो. तो तेथे रहात असल्याविषयी सांगून तेथे जाऊन आल्याचे सांगतो. ‘‘तू तेथे कशाला जातोस’’, असे विचारल्यावर ‘तेथे माझी आठवण काढतात; म्हणून मला जावे लागते’, असे कृष्णांश सांगतो.
३. कृष्णांशने त्याचा मित्र ‘पियू’ याचा उल्लेख करून त्याने फ्रेंच भाषा शिकवल्याचे सांगणे आणि ‘पियू आणि कालीया टॉवर’ या संदर्भातील नावे बेंगळुरू येथील घराच्या सर्व भिंतींवर लिहिणे
कृष्णांश त्याचा मित्र ‘पियू’ याचा उल्लेख वारंवार करतो. तो कधी तिला ‘मुलगी’ म्हणतो, तर कधी ‘मुलगा’ म्हणून संबोधतो. तो तिच्या २ जन्मांविषयी सांगून एक जन्म पुरुषाचा आणि एक जन्म स्त्रीचा असल्याचे सांगतो. त्यामुळे तो तिला ‘मुलगा’ आणि ‘मुलगी’ असे संबोधतो. ‘पियू ठिकठिकाणी जाते. ती फ्रान्सला गेली आहे’, असेही तो सांगतो. ‘तिने मला फ्रेंच भाषा शिकवली’, असे तो सांगतो. त्याने त्याच्या आईला काही फ्रेंच शब्द सांगितले; पण तिला त्यातील एकच शब्द कळला. ‘पियू आणि कालीया टॉवर’ या संदर्भातील नावे त्याने बेंगळुरू येथील घराच्या सर्व भिंतींवर लिहिली आहेत.
४. कृष्णांशने सांगितलेली अन्य सूत्रे
अ. कृष्णांश ‘त्याच्या आईचा गतजन्म कॅनडा येथे झाल्याचे आणि ती कॅनडात रहात होती’, असे सांगतो. आणि त्या वेळी तो स्वतः ‘ज्युपिटर’ रुग्णालयात जन्माला आल्याचे सांगतो. प्रत्यक्षातही ‘यु.एस्.’मध्ये हे रुग्णालय आहे.
आ. तो काही ‘स्टेशन्स’चे, ‘मोर’ आणि ‘सावंड’ यांचे उल्लेख करतो. ती ‘यु.एस्.ए.’ आणि ‘कॅनडा’ मध्येअसल्याचे आढळले.
इ. तो ‘होनूलूलू’ या ठिकाणचा उल्लेख करतो. तेथेच ‘कालिया टॉवर’ आहे.
ई. तो आणखी एक ठिकाण सांगतो; पण ते गुप्त असल्याचे लक्षात आले. त्या ठिकाणची माहिती घेण्यासाठी एक विशिष्ट कोड टाकावा लागतो. तो टाकल्यावरच तेथील माहिती मिळू शकते.
उ. कृष्णांश ‘Hi’ या शब्दाचा उल्लेख करतो. ‘यु.एस्.ए.’मध्ये ‘Hi’ असे लिहून पुढे एक विशिष्ट नंबर लिहिलेला असतो. एखाद्या ठिकाणची वसाहत इत्यादीची माहिती घेतांना असे लिहिलेले आढळते.
ऊ. त्याने सांगितलेल्या ठिकाणांमध्ये एक विमानतळ, एक विद्यापीठ (युनिव्हर्सिटी) आणि एक ‘क्लब’ आहे.
ए. तो ‘होंडाच्या शो-रूम’मध्ये एक घटना घडल्याचे सांगतो.
ऐ. तो वादळ, पूर, आग आदी गोष्टींचा उल्लेख करतो. तो वादळाचे चित्र काढतो.
५. कृष्णांशची मागील २ जन्मस्थाने आणि संबंधित घटना !
अ. कृष्णांश ‘अॅबॅको आयलंड’चा उल्लेख करतो. वर्ष १९१६ मध्ये तो ‘अॅबॅको’ला होतो’, असे सांगतो. (‘यु.एस्.ए.’मध्ये ‘अॅबॅको’ नावाचे आयलंड आहे.) तो स्वतःचे वय ७२ वर्षे सांगून नंतर मृत्यू झाल्याचे सांगतो.
आ. मृत्यूनंतर पुन्हा ‘यु.एस्.ए.’मध्ये जन्म झाल्याचे तो सांगतो. वर्ष २००१ ते २०१० मध्ये तो ‘कालिया’ (यु.एस्.ए. येथील एक ठिकाण) येथे असल्याचे सांगतो. तेव्हा तेथे कु. वेदांतही (सौ. सुचिता मिठबांवकर यांचा पुत्र) असल्याचा उल्लेख करतो. तेव्हाचे वेदांतचे नाव सांगून ‘तो काय करायचा ?’, तेही सांगतो. तेव्हा ‘वेदांत साडेसोळा वर्षांचा असतांना ‘त्याचा मृत्यू झाला होता’, असे कृष्णांश सांगतो.
६. कृष्णांशने मृत्यूनंतर तो रहात असलेल्या लोकाचे नाव सांगून तेथे करत असलेला नामजप, शिवाने दिलेले दर्शन आणि मुंबईला झालेला त्याचा सध्याचा जन्म यांविषयी सांगणे
कृष्णांश वर्ष २०१० नंतर स्वतःचा मृत्यू झाल्याचे सांगतो. मृत्यूनंतर तो ज्या लोकात होता, तो लोक सांगतो. तिथे तो पियूचा उल्लेख करतो. कृष्णांश सांगतो, ‘तेथे आम्ही दोघे २४ घंटे नामजप आणि प्रार्थना करत होतो. आम्ही ‘ॐ’ बनवत होतो. मला शिव आणि गणपति बाप्पाने ‘दत्त’ अन् गणपति यांचा नामजप करण्यास सांगितले होते, तसेच पियूला दत्तबाप्पाने दत्ताचा नामजप करण्यास सांगितले होते. नंतर शिवबाप्पाने दोघांना दर्शन दिले आणि हरिणाचे रूप धारण केले. नंतर ते हरिण दिसेनासे झाले. कालांतराने शिवबाप्पाने ‘आता तू मुंबईला जा’, असे सांगितले आणि नंतर माझा पुन्हा जन्म झाला. तोच हा आताचा जन्म आहे.’ (आताचा त्याचा जन्म मुंबईतच झाला आहे.)’
७. सूक्ष्म जीव दिसणे
‘शाळेतील एक शिक्षिका मुख्याध्यापकांंना म्हणाल्या, ‘‘कृष्णांश वर बघत असतो.’’ तेव्हा मुख्याध्यापकांनी त्यांना समजावून सांगितले, ‘‘काही जणांना सूक्ष्म जीव दिसतात, तसे त्याला दिसत असतील.’’ मुख्याध्यापकांनी सौ. वैदेही भट यांना शाळेत भेटायला बोलावून कृष्णांशला जाणवत असलेल्या गोष्टींच्या संदर्भात कल्पना दिली.’
– सौ. सुचिता मिठबांवकर, फोंडा, गोवा. (१४.७.२०१९)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |