इंग्लंडमध्ये भारतीय संगीताच्या अभ्यासासाठी ‘मुन्नी बदनाम हुई’ या गाण्याचा समावेश !

‘कला ही आत्म्याला परमात्माशी जोडणारी असावी’, हे ज्ञात नसलेला पाश्‍चात्त्य शिक्षण विभाग ! भारतीय संगीत साधनेवर आधारित आहे. साधना केल्यासच खर्‍या अर्थानेच संगीताचा अभ्यास करता येईल ! असे असतांना संगीताच्या अभ्यासाच्या नावाखाली ‘मुन्नी बदनाम हुई’ सारख्या अश्‍लील गाण्यांची निवड करणे म्हणजे मूळ भारतीय संगीताला ‘बदनाम’ करण्याचा प्रकार आहे !

मुंबई – इंग्लंडमधील ‘डिपार्टमेंट फॉर एज्युकेशन’ने चालू केलेल्या नवीन संगीत अभ्यासक्रमामध्ये ‘दबंग’ या भारतीय हिंदी चित्रपटातील ‘मुन्नी बदनाम हुई’ या गाण्याचा समावेश केला आहे. जगभरातील संगीतामधील विविधता समजून घेण्यासाठी इंग्लंडच्या शिक्षण विभागाकडून हा अभ्यासक्रम चालू करण्यात आला आहे.

(भारतीय संगीताचा अभ्यास करण्यासाठी अशा गाण्याची निवड करणे, यात भारतीय युवकांना भरकटवण्याचे षड्यंत्र असल्याचेच दिसून येते. इंग्लंडच्या शिक्षण विभागाला जर भारतीय संगीताचा खरोखरच अभ्यास करायचा असेल, तर त्याने भारतीय शास्त्रीय संगीताचा अभ्यास करावा ! – संपादक)

या गाण्याची अभ्यासक्रमासाठी निवड करतांना इंग्लंडमधील शिक्षण विभागाकडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, ‘मुन्नी बदनाम हुई’ हे हिंदी चित्रपटसृष्टीतील गाणे ‘आयटम नंबर्स’पैकी आहे. अशा गाण्यांचा चित्रपटाच्या कथानकाशी थेट संबंध नसतो; पण या गाण्याचे चित्रीकरण आकर्षक आहे. या गाण्याच्या चालीत संगीतामधील वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे या गाण्याचा समावेश करण्यात आला आहे. आम्ही प्रायोगिक पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. शिक्षकांना प्रत्येक इयत्तेला शिकवणे सोपे जावे, हाही आमचा प्रयत्न आहे.’

यापूर्वी इंग्लंच्या शिक्षण विभागाने सुप्रसिद्ध गायिका दिवंगत किशोरी आमोणकर यांचे ‘सहेला रे’, गायिका अनुष्का शंकर यांचे ‘भारतीय समर’, ए.आर्.रहमान यांचे ‘जय हो’ या भारतीय गाण्यांचा समावेश केला आहे. इंग्लंडमधील संगीतकार आणि अभ्यासक यांच्या १५ जणांच्या गटाने मिळून हा अभ्यासक्रम सिद्ध केला आहे.