‘स्वतःत पालट करून गुरुचरणी जायचे आहे’, असा ध्यास असलेल्या कोथरूड (पुणे) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती अनुराधा पेंडसे (वय ६६ वर्षे) !

पुणे येथील श्रीमती अनुराधा पेंडसे यांनी जून २०२० मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी गुरुपौर्णिमेनिमित्तच्या ऑनलाईन सत्संगात सांगितली. साधकांना त्यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

श्रीमती अनुराधा पेंडसे

१. व्यवस्थितपणा

‘पेंडसेकाकूंच्या घरातील प्रत्येक खोली नीटनेटकी आणि आवरलेली असते. त्या प्रत्येक वस्तू जागच्या जागी ठेवतात. ‘त्यांचे घर आश्रम आहे’, असे जाणवते.

२. स्वावलंबी

काकू ठरलेल्या वेळी ठरलेली कामे करतात. त्या घरची आणि बाहेरची सर्व कामे स्वतः करतात. त्यासाठी त्या कुणावरही अवलंबून नसतात.’ – सौ. प्रीती कुलकर्णी, कोथरूड, पुणे.

३. प्रेमभाव

अ. ‘काकू घरी आलेल्या साधकांची मनापासून विचारपूस करतात. त्या खाऊ दिल्याविना कुणालाच घरून जाऊ देत नाहीत. त्या माझ्या मुलीच्या वाढदिवसाला आवर्जून तिच्यासाठी केक करून देतात.’ – सौ. प्रीती कुलकर्णी

आ. एकदा त्यांच्याकडे रामनाथी आश्रमातील ४ – ५ साधकांचे १ मास रहाण्याचे नियोजन केले होते. त्या वेळी त्यांनी साधकांचे भोजन आणि सर्व व्यवस्था मनापासून केली. साधकांना त्यांच्या घरात सहजतेने वावरता येते. त्यांच्याकडे रहातांना साधकांना संकोच वाटत नाही.’ – सौ. प्रीती कुलकर्णी आणि श्री. नारायण पाटील

इ. आम्ही नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत असतांना काकूही तिकडेच होत्या. त्यांच्या मुलीचे घर आमच्या रहाण्याच्या ठिकाणापासून पुष्कळ दूर असूनही त्या प्रेमाने त्यांची मुलगी आणि नात यांच्यासह आम्हाला भेटायला घरी आल्या होत्या. तेव्हा ‘गुरुदेव आले आहेत’, असे मला वाटत होते.’ – सौ. मनीषा पाठक

४. व्यष्टी साधनेचे गांभीर्य

‘आम्ही ३ वर्षांपूर्वी नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत वास्तव्याला होतो. तेव्हा काकूही तेथे त्यांच्या मुलीकडे होत्या. तेव्हा त्या मला नियमित भ्रमणभाषवरून व्यष्टी साधनेचा आढावा द्यायच्या.’ – सौ. मनीषा पाठक, पुणे

५. सेवेची तळमळ

अ. ‘काकू काही सेवा दायित्व घेऊन करत आहेत. त्यांना वेळ असल्यास त्या स्वतःहून सेवा मागून घेतात.’ – सौ. प्रीती कुलकर्णी

आ. ‘त्या गुरुपौर्णिमेच्या काळात अमेरिकेत असल्या, तरी त्या पू. शिल्पा कुडतरकर यांच्या घरी गुरुपौर्णिमेला येण्याचा प्रयत्न करतात. तेथे त्या मिळेल ती सेवा मनापासून करतात. कधी त्यांना प्रत्यक्ष यायला जमले नाही, तर त्या ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमेच्या उत्सवात सहभागी होतात.’ – सौ. मनीषा पाठक

६. परिस्थिती स्वीकारणे 

अ. ‘काकूंच्या यजमानांचे निधन झाल्यानंतर त्यांनी तीनही मुलींचे शिक्षण पूर्ण करणे आणि त्यांचे विवाह करून देणे, असे दायित्व मोठ्या हिंमतीने पार पाडले. त्या कठीण प्रसंगांविषयी कधीच नकारात्मक बोलत नाहीत. ‘देवानेच करून घेतले’, असा त्यांचा भाव असतो.’ – सौ. मनीषा पाठक

आ. ‘त्या कित्येक वर्षे घरातील सर्व कामे एकट्याच करत आहेत. ‘एकटे रहायला लागते’, यांविषयी त्यांची कधीही तक्रार नसते.

इ. काकू ३ वर्षांपूर्वी गाडीवरून पडल्या होत्या. त्या वेळी त्यांच्या पायाचे मोठे शस्त्रकर्म झाले. तेव्हा त्या ६ मास (महिने) अंथरुणावर होत्या. त्या वेळी त्या गुरूंवर श्रद्धा ठेवून स्थिर आणि शांत राहिल्या अन् कठीण प्रसंगाला सामोरे गेल्या.’  – सौ. प्रीती कुलकर्णी

७. चुकांप्रती संवेदनशील

अ. ‘काकू त्यांच्याकडून झालेल्या चुका मनापासून स्वीकारतात आणि सत्संगात सांगतात अन् ‘मी अजून काय प्रयत्न करू ?’, असे विचारतात. त्यांना चुकांविषयी खंत वाटते.’ – सौ. मनीषा पाठक आणि श्री. नारायण पाटील

आ. ‘काही दिवसांपूर्वी ‘आपल्याकडून झालेल्या चुकांसाठी नातेवाईक आणि साधक यांची क्षमायाचना करूया’, असे सूत्र सांगितले होते. तेव्हा काकूंनी तत्परतेने त्यांच्याकडून झालेल्या चुकांसाठी नातेवाईक आणि साधक यांची मनापासून क्षमायाचना केली.’ – सौ. मनीषा पाठक

८. संतांप्रतीचा कृतज्ञताभाव

अ. ‘काकू संतसेवा मनोभावे करतात. त्या सद्गुरु आणि संत यांच्यासाठी खाऊ किंवा डबा करून देणे, अशा सेवाही मनापासून करतात.

आ. त्यांना गुरुदेव आणि पू. दातेआजी यांच्याप्रती कृतज्ञता वाटते. त्या म्हणतात, ‘‘पू. दातेआजी मला ‘आई’ म्हणून लाभल्या. त्यांच्यामुळे मी साधनेत आले.’’ – सौ. प्रीती कुलकर्णी

९. जाणवलेले पालट

अ. ‘पूर्वी काकू मनातील काही सांगत नसत. आता त्यांचे बोलणे आणि वागणे यांत मोकळेपणा आला आहे. त्या सत्संगातही मोकळेपणाने बोलतात. त्या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांविषयी स्वतःहून विचारून घेतात आणि ते नियमित करतात.’ – सौ. प्रीती कुलकर्णी आणि श्री. नारायण पाटील

आ. ‘काकूंची मायेची ओढ आणि काळजीचे विचार पूर्वीपेक्षा अल्प झाले आहेत. ‘स्वतःची साधना चांगली कशी होईल ?’, असा त्यांचा विचार असतो.

इ. आता काकूंमध्ये स्थिरता जाणवतेे. ‘स्वतःत पालट करून गुरुचरणी जायचे आहे’, असा त्यांना ध्यास असतो.’ – सौ. प्रीती कुलकर्णी आणि सौ. मनीषा पाठक

ई. ‘काकूंशी बोलतांना आनंद जाणवतो. ‘त्यांची प्रगती झाली आहे’, असे वाटते.’ –  सौ. वर्षा भिडे, कोथरूड, पुणेे.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक