सातारा, १० एप्रिल (वार्ता.) – कोरोनाच्या दुसर्या लाटेत बाधितांची संख्या दुपटीने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतांना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन वाई येथील उपविभागीय पोलीस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे यांनी केले आहे. डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित वाई पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
या वेळी त्या म्हणाल्या की, सर्वांनी साधेपणाने जयंती साजरी करून प्रशासनाला सहकार्य करावे. मंडळांनी आरोग्यविषयीचे सामाजिक उपक्रम राबवावेत. गरजू रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शनसाठी साहाय्य करावे. जयंतीनिमित्त मिरवणुका न काढता तो व्यय गावातील नागरिकांसाठी मास्क, सॅनिटायझर, इंजेक्शन यांच्यासाठी करावा. तसेच रक्तदान शिबिर अन् आरोग्य शिबिर यांचे आयोजन करावे.