देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमाविषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

देवद, पनवेल येथील सनातनचा आश्रम

१. देवद आश्रमात आल्यावर ‘वैकुंठात आलो आहोत’, असे जाणवणे

‘देवद आश्रमात आल्यावर ‘आम्ही वैकुंठात आहोत’, असे मला सतत जाणवत होते. येथील चैतन्यमय वातावरणाने माझे मन प्रसन्न झाले. येथे आल्यावर ‘मला पुष्कळ चैतन्य मिळत आहे’, असे मला वाटायचे. येथील साधकांचे साधनेने प्रसन्न झालेले तोंडवळेे पाहून ‘त्यांच्या तुलनेत मी कुठेच नाही. माझी काही साधनाही नाही. आता शून्यापासून आरंभ करायचा आहे’, असे मला वाटले.

२. ‘देवाला तळमळीने प्रार्थना केल्यावर देव ऐकतो’, याची अनुभूती येणे

माझी मुलगी आनंदी साडेपाच वर्षांची आहे. ती शांत आहे. आश्रमात आल्यावर ती कुणासमवेत बोलायची नाही. ती ४ दिवस माझ्याच मागे मागे होती. साधक तिच्या समवेत बोलायचे, तिचे लाड करायचे; पण ती कुणालाच प्रतिसाद देत नव्हती. त्यासाठी मी देवाला प्रार्थना केली, ‘हे श्रीकृष्णा, तूच आनंदीच्या स्वभावात पालट कर. तिला समवेतच्या मुलांसह खेळू दे.’ दुसर्‍या दिवसापासून ती मुलांमध्ये मिसळू लागली. ती साधकांना नाव सांगू लागली आणि त्यांच्याशी बोलू लागली. ‘देवाला तळमळीने प्रार्थना केल्यावर देव ऐकतो’, याची मला अनुभूती आली. आता ती आश्रमात चांगली रमली आहे.

३. आश्रमातील चैतन्याने मुलीच्या स्वभावात पालट होणे

आश्रमातील साधक प्रत्येक १५ मिनिटांनी प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करतात. आरंभी २ दिवस माझी मुलगी प्रार्थना करत नव्हती. मी प्रार्थना करत असतांना पाहून ती प्रार्थना करायची. नंतर ती मला सुचवायची, ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आरतीला जायचे आहे.’ जेवण झाल्यावर ताट घासायला ती माझ्या समवेत यायची. ती नामजपही करू लागली. ती मला सेवेतही साहाय्य करायची. ‘आश्रमात आल्यावर तिच्या स्वभावात पुष्कळ पालट झाला’, हे मला जाणवले.

४. आश्रम म्हणजे चैतन्याने भरलेले मंदिर !

आश्रम हे चैतन्याने भरलेले मंदिर आहे. ‘येथे आल्यावर मन ईश्‍वराकडे कसे धावते ?’, हे लक्षात आलेे. येथील संत आणि साधक यांच्याकडून मला पुष्कळ शिकायला मिळाले. येथे आम्हाला सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, श्रीचित्शक्ती सौ. अंजली गाडगीळ, पू. (सौ.) अश्‍विनी पवार आणि पू. कर्वेमामा यांच्या जीवनावर आधारित ध्वनीचित्र-चकत्या दाखवल्या. त्या पाहून आम्हाला त्यांची साधनेची तळमळ लक्षात यायची.

४ अ. आश्रमात प्रतिदिन सकाळी योगासने आणि स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग असायचा. तेथेही मी जात होते. त्यामुळे मला दिवसभर उत्साही वाटायचे.

४ आ. ध्यानमंदिर : ध्यानमंदिरातील पादुकांचे दर्शन घेतल्यावर मला कृतज्ञताभाव वाटायचा. तेथील आरतीही चैतन्यमय असायची. त्यामुळे माझा नामजप आपोआप व्हायचा.

४ इ. परात्पर गुरु पांडे महाराज यांची खोली : परात्पर गुरु पांडे महाराजांच्या खोलीत मला पुष्कळ चैतन्य जाणवत होते. मला तेथे त्यांचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवत होते.

४ ई. प.पू. भक्तराज महाराज यांनी वापरलेली गाडी : प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीला प्रदक्षिणा घालतांना मला मळमळायचे. नंतर मला समजले, ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीतील चैतन्याने माझ्यावर आलेले त्रासदायक आवरण दूर होत आहे.’ नंतर मी तेथे बसून अधिक वेळ नामजप करू लागले.

४ उ. साधकांची सेवेची तळमळ : येथील साधक प्रेमळ आहेत. प्रत्येकात साधनेची तळमळ आहे. वयस्कर साधकांची सेवेची तळमळ बघून ‘मी आता दमते, तर त्यांच्या वयाचे झाल्यावर किती थकणार ?’, असे मला वाटायचे. सौ. मीना खळतकर यांनी आम्हाला आश्रमाविषयी माहिती दिली. त्यांनी ‘सेवा भावपूर्ण कशी करायची ? मनाला सूचना का द्यायच्या ?’, हे सांगितले. त्यांनी लिहिलेल्या कविता वाचून माझी भावजागृती झाली.

४ ऊ. आश्रमातील संतांच्या भेटीने मला आनंद झाला.

मी नेहमीच आश्रमात येण्याचा प्रयत्न करीन आणि सहसाधकांनाही घेऊन येईन. मी त्यांनाही सांगीन, ‘देवळात गेल्याविना देव दिसत नाही.’

परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे आम्ही आश्रम बघू शकलो. आमच्याकडून चुका झाल्या असल्यास आम्ही क्षमा मागतो. माझ्या मनात कृतज्ञतेचा भाव दाटून येत आहे.’

– सौ. स्वाती सचिनराव पाटील, हिंगणघाट, वर्धा. (१२.६.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक