वादग्रस्त ‘ट्वीट’ प्रसारित करण्यासाठी उत्तरदायी असलेला अधिकारी सेवेतून बडतर्फ

ट्विटर हँडलवर पर्यटन खात्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याचा ‘आक्रमणकर्ता’ असा उल्लेख केल्याचे प्रकरण

पणजी, ४ एप्रिल (वार्ता.) – पर्यटन खात्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठा साम्राज्याचा ‘आक्रमणकर्ता’ असा उल्लेख करण्यात आला होता; मात्र याला विरोध झाल्यानंतर पर्यटन खात्याने हे वादग्रस्त ट्वीट मागे घेऊन चुकीमुळे असा उल्लेख झाल्याचे सांगून दिलगिरी व्यक्त केली होती. गोवा राज्य पर्यटन महामंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांच्या सूचनेवरून या प्रकरणाचे सखोल अन्वेषण करून यासाठी उत्तरदायी असलेल्या अधिकार्‍याला शोधून काढून त्याला सेवेतून बडतर्फ केले आहे. गोवा पर्यटन विकास महामंडळाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

पर्यटन खात्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर गोव्यातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती आहे. यामध्ये वर्ष १६१२ मध्ये बांधलेल्या आग्वाद किल्ल्याची माहिती देतांना म्हटले होते की, डच आणि मराठा या आक्रमणकर्त्यांपासून रक्षण करण्यासाठी पोर्तुगिजांना आग्वाद किल्ला महत्त्वाचा ठरला आहे. याला विरोध झाल्यानंतर पर्यटन खात्याने चूक सुधारून नवीन ट्वीट प्रसारित करून यामध्ये ‘आक्रमणकर्ते’ हा उल्लेख केवळ डच यांना संबोधित केल्याचे म्हटले, तसेच या चुकीविषयी दिलगिरी व्यक्त केली. या अनुषंगाने गोवा पर्यटन विकास महामंडळ प्रसिद्ध केलेल्या पत्रकात पुढे म्हणते, ‘‘महामंडळाचे उपसरव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) एस्.के.नार्वेकर यांनी या घटनेचे सखोल अन्वेषण केल्यानंतर वादग्रस्त ट्वीट प्रसारित करण्यास एक अधिकारी उत्तरदायी असल्याचे निष्पन्न झाले. सामाजिक माध्यमात ट्वीट प्रसारित करण्यासाठी महामंडळाच्या प्रकल्प विभागाने या अधिकार्‍याची सेवा घेतली होती. ही सेवा तात्काळ रहित करण्यात आली आहे, तसेच त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे यापुढे सामाजिक माध्यमांत प्रसारित केले जाणारे लिखाण महामंडळाच्या उत्तरदायी अधिकार्‍यांच्या मान्यतेनंतरच प्रसारित केले जाणार आहे.’’ प्राप्त माहितीनुसार सामाजिक माध्यमांतील सर्व ‘पोस्ट’ हाताळण्यासाठी सार्वजनिक संबंध ठेवणार्‍या व्यावसायिक संस्थेची (पी.आर्.एजंसी) सेवा घेण्याचा प्रस्ताव महामंडळाने शासनाकडे मांडला आहे.

मागील दाराने ‘पी.आर्.एजंसी’ला नेमण्याचा हा कुटील डाव नाही ना, याचे अन्वेषण करा ! – काँग्रेस

वादग्रस्त ट्वीट करण्यामागे पुन्हा पर्यटन खात्यात सार्वजनिक संबंध ठेवणार्‍या व्यावसायिक संस्थेची (पी.आर्. एजंसी) मागील दाराने नेमणूक करण्याचा पर्यटन खात्याचा हा कुटील डाव नाही ना, या हेतूने मराठ्यांना अपकीर्त करण्याच्या घटनेचे अन्वेषण करावे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी ट्वीट करून केली आहे.