शांत, समंजस, परिस्थिती सहजतेने आणि आनंदाने स्वीकारून नेहमी वर्तमानकाळात रहाणारी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीची पुणे येथील कु. प्रार्थना महेश पाठक (वय १० वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. प्रार्थना पाठक ही एक आहे !

कु. प्रार्थना महेश पाठक

फाल्गुन कृष्ण पक्ष प्रतिपदा (२९.३.२०२१) या दिवशी कु. प्रार्थना पाठक (वय १० वर्षे) हिचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने पुणे येथील साधिकांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये ३१ मार्च या दिवशी पाहिली. आज आपण उर्वरित गुणवैशिष्ट्ये पाहूया.

याआधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/464230.html


४. कु. अर्चिता सोन्ना (वय १० वर्षे), पुणे

४ अ. इतरांशी जुळवून घेणे : ‘मागील ४ वर्षांपासून माझी आणि प्रार्थनाची मैत्री आहे; पण आजपर्यंत ती एकदाही माझ्याशी भांडली नाही.

४ आ. आधार देणे : एकदा शाळेमध्ये परीक्षा चालू असतांना मला ताण आला होता. तिच्याशी बोलल्यानंतर माझा ताण हलका झाला.

४ इ. इतरांचे गुण पहाणे : आमच्या शाळेत कवी संमेलनाचे कार्यक्रम होतात. त्या कार्यक्रमात प्रार्थनाने वर्गशिक्षिका असलेल्या बाईंच्या गुणांवर आधारित छान कविता केली होती. या प्रसंगातून ‘इतरांचे गुण कसे पहायचे ?’, हे मला शिकायला मिळाले.

४ ई. ‘प्रार्थना’ या तिच्या नावाचा मला सुचलेला अर्थ

प्रा – प्रांजळ आहे मनाने

र –  रत असते इतरांना आनंद देण्यात

थ – थकत नाही कधीच

ना – नाही सोडत श्री गुरूंचा ध्यास’

५. डॉ. (सौ.) अश्‍विनी देशपांडे आणि सौ. विदुला देशपांडे, पुणे

५ अ. प्रांजळ : ‘प्रार्थना स्वतःच्या चुका प्रांजळपणे सांगून त्यावर प्रायश्‍चित्त घेते.

५ आ. अपेक्षा नसणे : ‘पुणे सेवाकेंद्रात सौ. मनीषाताईंना सलग सत्संग असायचे. त्या वेळी प्रार्थना झोपेतून उठून आली, तरी ‘आईने जवळ घ्यावे किंवा आईने तिचे सर्व आवरावे’, अशी तिची अपेक्षा नसायची.

५ इ. स्वीकारण्याची वृत्ती : तिला सकाळी दुधात ‘बोर्नव्हिटा’ घातलेला आवडतो; परंतु तो नसल्यास ती हळद घातलेले दूध मागून घ्यायची. जेवतांनासुद्धा तिच्या आवडीचे पदार्थ नसले, तरी पानात टाकायचे नाही; म्हणून ती सर्व खायची.

५ ई. सात्त्विक वृत्ती : शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात तिने सात्त्विक गीतावर सात्त्विक नृत्य केले होते.

५ उ. सेवेची ओढ असणे : सध्या ती रामनाथी आश्रमात असते. अन्य बालसाधकांच्या समवेत खेळण्यापेक्षा तिला सेवा करायला आवडते.’

६. श्रीमती शीतल नेरलेकर, सिंहगड रस्ता, पुणे.

६ अ. समजूतदार : ‘प्रार्थनामध्ये पुष्कळ समजूतदारपणा आहे. त्यामुळे तिच्या मैत्रिणींना किंवा साधकांच्या मुलांना तिची मैत्री हवीहवीशी वाटते.

६ आ. तत्त्वनिष्ठ : कधी लहान मुलांकडून असात्त्विक कृती होत असेल किंवा चुकीची कृती होत असेल, तर प्रार्थना तत्त्वनिष्ठपणे त्याला चुकीची जाणीव करून देते.

६ इ. जवळीक साधणे : प्रार्थनाला साधक घरी आलेले पुष्कळ आवडतात. आम्ही तिच्या घरी गेल्यावर ‘काकू, तुम्ही आमच्याकडे रहा’, असा ती आम्हाला आग्रह करायची.

६ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी अनुसंधान असणे : लहानपणापासूनच प्रार्थनाला सात्त्विक रहाण्याची पुष्कळ आवड आहे. तिचे खेळही प.पू. गुरुदेव आणि श्रीकृष्ण यांच्याशी जोडलेले असायचे. या दोघांविषयी तिच्या मनात पुष्कळ भक्तीभाव आहे. तिला खेळतांना पाहिल्यावर ‘ती वेगळ्याच भावविश्‍वात तल्लीन झाली आहे’, असे मला वाटायचे.

६ उ. सेवेची आवड : पूर्वी प्रार्थना लहान असतांना मी सौ. मनीषा यांच्या घरी सेवेला जायचे. तेव्हा प्रार्थना ‘मलाही सेवा द्या’, असे म्हणायची. त्या वेळी ती ‘साबण पिशवीत भरणे किंवा उत्पादने वेगवेगळी नीट लावून ठेवणे’, अशा सेवा करायची.

६ ऊ. प्रार्थना : ‘लहान वयात संत होण्याचे ध्येय ठेवणार्‍या प्रार्थनाचे गुण माझ्यात येण्यासाठी माझ्याकडूनही प्रयत्न होऊ दे’, अशी गुरुदेवांच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’

७. सौ. प्रतिभा फलफले, सातारा रस्ता, पुणे.

७ अ. आनंदी : ‘बाह्य परिस्थिती कशीही असो, प्रार्थना सतत आनंदी असते.

७ आ. सात्त्विक वृत्ती : ती सात्त्विक खेळण्यांची निवड करते. ती खेळण्यातील वस्तूंची मांडणीही सात्त्विक पद्धतीने करतेे.

७ इ. आज्ञापालन करणे : प्रार्थनाची आई (सौ. मनीषाताई) सेवेत असतांना, सत्संग घेत असतांना प्रार्थना अन्य बालसाधकांच्या समवेत खेळायची. त्या वेळी खेळतांना तिचा कधीही मोठा आवाज आला नाही. तिच्या आईने ‘प्रार्थना, आता सर्वांनी थोडा वेळ जप करा’, असे सांगितल्यावर ती लगेच आज्ञापालन करून अन्य बालसाधकांना घेऊन नामजप करते.

७ ई. सेवेची ओढ : एकदा प्रार्थना शाळेतून तिच्या बाबांच्या समवेत एका ग्रंथप्रदर्शनावर आली होती. आल्यावर लगेच ती ‘ग्रंथप्रदर्शनावर साहित्य मांडणे, जिज्ञासूंना वस्तू देणे’ या सेवेत सहभागी झाली. तिने तेथे दिवसभर आनंदाने सेवा केली. ती म्हणाली, ‘‘प्रदर्शनकक्ष असेल, तेव्हा मला सेवेला बोलवा.’’

७ उ. भाव : कृष्णाष्टमीच्या दिवशी तिने श्रीकृष्णाला छान सजवून सिद्धता केली होती.’

८. सौ. अश्‍विनी ब्रह्मे, सिंहगड रस्ता, पुणे.

८ अ. समाधानी : ‘कु. प्रार्थना कधीही कुठलाही हट्ट करत नाही. ती अतिशय समाधानी आहे.

८ आ. खेळतांना ‘सेवा करत आहे’, असे खेळ खेळणे : तिचे बालपणीचे खेळसुद्धा इतर मुलींसारखे नसून साधनेतील, सेवेतील आणि भावाच्या स्तरावरचे आहेत. ‘मी प.पू. आबांसाठी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी) पोळी-भाजी किंवा वरण-भात करते’, असा भातुकलीचा खेळ ती खेळायची. दूरदर्शन पहाणे तिला ठाऊकच नाही !

८ इ. परिस्थिती सहजतेने स्वीकारणे : ‘वर्तमान परिस्थितीचा स्वीकार करणे’ हा फार मोठा ईश्‍वरी गुण तिच्यात लहानपणापासून आहे.

८ ई. अपेक्षा नसणे : धूलिवंदनाच्या दिवशी तिचा वाढदिवस असतो. नेहमी खडकवासला जलाशयाच्या सान्निध्यात आणि साधकांच्या समवेतच तिचा वाढदिवस साजरा व्हायचा; पण त्यातही ती पुष्कळ आनंदी असायची.

प्रार्थनाला वाढदिवसाच्या पुष्कळ शुभेच्छा आणि आशीर्वाद ! ‘या गुणी बाळाची उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो’, ही गुरुमाऊलींच्या चरणी प्रार्थना !’

९. सौ. चारुलता पानघाटे, सिंहगड रस्ता, पुणे.

९ अ. लहानपणापासूनच प्रार्थनाच्या सहवासात आनंद मिळतो.

९ आ. स्वीकारण्याची वृत्ती : एकदा प्रार्थना रुग्णाईत असतांना आमच्याकडे होती. ती शांतपणे औषध घ्यायची. मी तिला जे पदार्थ खायला देईन, ते ती आवडीने खायची.

९ इ. इतरांचा विचार : तिच्यामध्ये ‘इतरांचा विचार करणे’ हा मोठा गुणही आहे. तिला कुणी खाऊ दिला, तर ती आधी आपल्याला देते आणि मगच ती खाते.’

१०.  सौ. नीता बोरामणीकर, सहकारनगर, पुणे.

१० अ. अभ्यासाला प्राधान्य देणे : ‘प्रार्थना आमच्या घराच्या समोरच्या बंगल्यात असलेल्या कथ्थक नृत्याच्या शिकवणीला यायची. तेव्हा श्री. महेश पाठक (कु. प्रार्थनाचे वडील) कधी कधी तिला आमच्या घरी सोडून सेवेला जायचे. शिकवणीनंतर ती उरलेल्या वेळात अभ्यास करायची किंवा चित्र काढत बसायची. एक दिवस मी तिला विचारले, ‘‘घराजवळ असलेल्या बागेत जाऊया का ?’’ तेव्हा ती मला म्हणाली, ‘‘नको. मी अभ्यास पूर्ण करते.’’

१० आ. सेवेची ओढ

१. विज्ञापनांच्या सेवेनिमित्त माझे प्रतिदिन सेवाकेंद्रात जाणे व्हायचे आणि प्रार्थनाला भेटणेही व्हायचे. तेव्हा ती मला ‘‘मी काय सेवा करू ?’’, असे विचारायची. कधी कधी मी तिला नाणी मोजायला द्यायची. प्रार्थना ती नाणी व्यवस्थित मोजून ‘एकूण किती रक्कम आहे ?’, हे मला सांगायची.

२. सेवाकेंद्राच्या स्वच्छता सेवेतही ती उत्साहाने सहभागी व्हायची.’

११. सौ. मंगला सहस्रबुद्धे, सिंहगड रस्ता, पुणे.

११ अ. चुकीची खंत वाटून प्रायश्‍चित्त घेणे : प्रार्थनाकडून काही चूक झाल्यास ती परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्रासमोर उभे राहून कान पकडून क्षमायाचना करते आणि ‘उठाबशा काढणे’, असे प्रायश्‍चित्त वारंवार घेते. तिच्यात एवढ्या लहान वयापासूनच हा साधकत्वाचा मोठा गुण आहे.’

११ आ. आज्ञापालन करणे : आईने सांगितल्यावर ती तिचे सर्व उपाय आणि नामजप त्याच वेळी पूर्ण करते.’

१२. सौ. संगीता जागडे, सिंहगड रस्ता, पुणे.

१२ अ. चुकांची खंत वाटून घेतलेले प्रायश्‍चित्त पूर्ण करणे : एकदा सौ. मनीषाताईच्या घरी मी आणि सौ. मीना गोले एका सेवेसाठी गेलो होतो. सेवा झाल्यावर मनीषाताईने आम्हाला खाऊ दिला. तेव्हा आम्ही ‘‘प्रार्थना, खाऊ खातेस का ?’’, असे विचारल्यावर तिने तिची चूक सांगितली आणि खाऊ न खाण्याचे प्रायश्‍चित घेतल्याचे सांगितले. यातून प्रार्थनाला चुकांची किती खंत वाटते आणि तिची प्रायश्‍चित पूर्ण करण्याची तळमळ किती आहे ?’, हे शिकायला मिळाले.’

(समाप्त)