राळेगणसिद्धी (नगर) येथे बनावट पोलिसांकडून नागरिकाची फसवणूक

नगर – राळेगणसिद्धी येथे ‘दळणवळण बंदी असतांना हातात सोन्याची अंगठी घालून कशाला फिरता’, असे म्हणून बनावट पोलिसांनी एका गृहस्थाची अंगठी घेऊन पुडीत बांधून परत दिली. थोडे पुढे गेल्यावर ती पुडी उघडून पाहिली असता फसवणूक झाल्याचे गृहस्थाच्या लक्षात आले. त्यांनी याविषयी पारनेर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंद केली आहे.

पोलीस किंवा कोणतेही सरकारी कर्मचारी अशा प्रकारच्या कोणत्याही वस्तू कधीही मागत नाहीत. अशा प्रकारच्या वस्तू कुणी मागत असेल, तर त्वरित त्यांचे ओळखपत्र मागावे. ओळखपत्र दाखवल्यानंतरही शंका वाटत असेल, तर स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी केले.