ईश्‍वरी गुण आणि अवगुण तसेच अलंकार !

ईश्‍वरी गुण म्हणजे सूक्ष्मातील अलंकार !

सूक्ष्मातील अलंकार

ईश्‍वरी गुण आणि सूक्ष्मरूपी अलंकार हे एकमेकांशी संबंधित असणे

१. जिवामध्ये असलेला ईश्‍वराचा एकेक गुण, म्हणजे ईश्‍वराने दिलेला एकेक सूक्ष्मरूपी अलंकार असणे : ‘जिवात असलेल्या वेगवेगळ्या ईश्‍वरी गुणांप्रमाणे वेगवेगळे अलंकार असतात आणि त्या ईश्‍वरी गुणांप्रमाणे ते आकार घेतात. तसेच जिवाला आवश्यक त्या तत्त्वाप्रमाणे त्यांत रंग भरले जातात.

२. दैवी अलंकारांचे स्थान शरिरातील वेगवेगळ्या चक्रांवर असून ते एकप्रकारे ईश्‍वराने जिवाला दिलेले संरक्षककवच आहे.

३. सूक्ष्मातील अलंकारांमुळे शरिरातील चक्रांना ऊर्जेचा पुरवठा सतत होत असतो.’ – एक अज्ञात शक्ती

जिवाचा गुण आणि अवगुण यांनुरूप असलेले सूक्ष्मातील अलंकार

१. जिवाच्या गुणांनुरूप असलेले सूक्ष्मातील अलंकार

१ अ. व्यापकत्व, क्षात्रवृत्ती, पारदर्शकता, प्रीती इत्यादी गुणांना वेगवेगळा अलंकार असतो.

१ आ. जसे देवतांनी अलंकार घातलेले असतात, त्याचप्रमाणे जिवाच्या देहावरही त्याच्या गुणांनुरूप सूक्ष्मातून अलंकार असतात.

२. जिवाच्या देहावर असलेले अलंकार हे तारक अलंकार असणे आणि हातांत घेतलेली शस्त्रे हे मारक अलंकार असणे : ईश्‍वराचे जास्तीतजास्त गुण असलेल्या आणि ईश्‍वराशी एकरूप असलेल्या जिवाला ईश्‍वर सूक्ष्मातील सगळ्यात जास्त अलंकार प्राप्त करून देतो. जिवातील तारक-मारक भाव आणि गुण यांनुसार जिवामध्ये सूक्ष्मातील तारक अन् मारक अलंकार असतात. जिवाच्या देहावर असलेले अलंकार हे सूक्ष्मातील तारक अलंकारांचे, तर जिवाने हातांत घेतलेली शस्त्रे (उदा. तलवार), हे सूक्ष्मातील मारक अलंकारांचे प्रतीक आहे.

अवगुण म्हणजे आसुरी शक्तींचे अलंकार !

१. अवगुणांमुळे आसुरी शक्तींनी व्यक्तीच्या शरिरामध्ये त्यांचे स्थान निर्माण करणे आणि त्या स्थानांमधे आसुरी अलंकार ठेवणे

ज्याप्रमाणे जिवाच्या गुणांमुळे त्याला दैवी अलंकारांची प्राप्ती होते, त्याप्रमाणे अवगुणांमुळे आसुरी शक्ती जिवाच्या शरिरामध्ये त्यांची स्थाने निर्माण करतात आणि त्या स्थानांमधे आसुरी अलंकार ठेवतात. जिवामध्ये जेवढे अवगुण जास्त, तेवढे सूक्ष्मातील आसुरी अलंकार त्याच्या देहात जास्त असतात.

२. कलियुगातील जिवांनी इतर युगांतील जिवांपेक्षा सगळ्यात जास्त आसुरी अलंकार धारण केलेले असणे

ज्याप्रमाणे स्थुलातील असुराचे अलंकारित रूप असते, त्याप्रमाणे कलियुगातील जिवाचे सूक्ष्मातील रूप आसुरी अलंकार घातलेल्या असुरांप्रमाणेच आहे.

३. राष्ट्र आणि धर्म यांच्या अधःपतनास कारणीभूत असणारे राष्ट्रद्रोही अन् धर्मद्रोही यांच्या देहांत मोठ्या आसुरी शक्तीशी निगडित अलंकार असतात.

४. भ्रष्ट अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्ग यांच्या देहांत आसुरी सैन्याशी निगडित अलंकार असतात.

५. नीतीमत्ताहीन स्त्रिया आणि राष्ट्र अन् धर्म यांच्या अधःपतनास कारणीभूत असलेल्या स्त्रिया यांच्या देहांत आसुरी स्त्रियांशी (स्त्री-वाईट शक्ती, उदा. राक्षसीण) निगडित अलंकार असतात.’

(सौ. रंजना गडेकर यांच्या माध्यमातून (१३.२.२००७) आणि  (२३.३.२००८))

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक