मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांच्या हातात दिले पाहिजे !

माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यांचे सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या मंदिर रक्षणाच्या चळवळीला समर्थन !

भारतातील प्रसिद्ध हिंदु खेळाडू, अभिनेते किंवा वलयांकित व्यक्ती कधीही हिंदु धर्माविषयी बोलत नाहीत; कारण असे बोलले, तर त्यांच्या तथाकथित धर्मनिरपेक्षतेला धक्का बसेल, असे त्यांना वाटत असते; मात्र येथे वीरेंद्र सेहवाग यांनी मंदिरांच्या सरकारीकरणाचा विरोध केल्यामुळे त्यांचे कौतुकच करायला हवे !

नवी देहली – सहस्रो वर्षे प्राचीन असणार्‍या मंदिरांची दयनीय स्थिती पाहून मनाला दुःख होत आहे. एका योग्य प्रक्रियेच्या अंतर्गत या मंदिरांची दुर्दशा रोखणे, ही काळाची आवश्यकता आहे. मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांच्या कह्यात दिले पाहिजे, असे ट्वीट प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यांनी केले आहे. तमिळनाडूतील मंदिरांच्या दुर्देशेवरून सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या चळवळीला त्यांनी समर्थन दिले आहे.

ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी चेन्नईतील एका दयनीय स्थितीतील मंदिराचा व्हिडिओ रिट्वीट करत तमिळनाडूच्या मुख्यमंत्री कार्यालयाला आणि वीरेंद्र सेहवाग यांना टॅग केला होता. त्यावर सेहवाग यांनी वरील प्रतिक्रिया देत ट्वीट केले. जग्गी वासुदेव यांनी अभियानाच्या अंतर्गत तमिळनाडूतील ४४ सहस्र २१२ मंदिरांवर सरकारचे नियंत्रण हटवून ती भक्तांच्या कह्यात देण्याची मागणी केली आहे; कारण सरकार या मंदिरांसाठी काहीही करत नसल्याचे दिसून येत आहे.