छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख प्रकरणी मंत्री हसन मुश्रीफ यांनी माफी मागावी ! – अतुल भातखळकर, भाजप

अतुल भातखळकर

मुंबई – कागल येथील हसन मुश्रीफ फाऊंडेशनच्या शाळेत शिष्यवृत्ती सराव चाचणी परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. हा प्रकार निषेधार्ह असून या संदर्भात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी ही प्रश्‍नपत्रिका मागे घेऊन जनतेची विनाअट क्षमा मागावी, अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

भातखळकर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून हिंदुविरोधी सामाजिक तेढ निर्माण करणार्‍या प्रवृत्ती बोकाळल्या आहेत. सातत्याने महापुरुषांचा अवमान करण्याचा सपाटा चालू आहे. हिंदूंच्या उत्सवावर निर्बंध आणले जात आहेत, एवढेच नव्हे, तर आषाढी यात्रेच्या वारकर्‍यांना अतिरिक्त भाडे आकारण्यात आले. हिंदूंचे दैवत असलेल्या शिवछत्रपतींचा अवमान आम्ही सहन करणार नाही. मुश्रीफ यांनी क्षमा न मागितल्यास भाजप आंदोलन करील.

नेमका प्रश्‍न काय होता ?

जर संभाजीचा पगार शिवाजीपेक्षा १२ २/४ ने जास्त असल्यास शिवाजीचा पगार संभाजीपेक्षा शेकडा कितीने कमी आहे ?

उत्तरे – २, ५०, १, १

शिष्यवृत्ती प्रश्‍नपत्रिकेत जाणीवपूर्वक अवमानकारक मजकूर ! – अजित ठाणेकर, भाजप, माजी नगरसेवक

कोल्हापूर – या संदर्भात कोल्हापूर येथे २१ मार्च या दिवशी अन्य एका विषयाच्या आंदोलनात भाजपचे माजी नगरसेवक अजित ठाणेकर म्हणाले, ‘‘दोनच दिवसांपूर्वी कागल येथे शिष्यवृत्ती प्रश्‍नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी जाणीवपूर्वक अवमानकारक मजकूर करण्यात आला होता. सरकारमुळेच असे कृत्य करणार्‍यांचे मनोबल वाढत आहे.’’

कागल तालुका शिष्यवृत्ती नियोजन समितीचा खुलासा !

कागल तालुका स्तरावर इयत्ता आठवीच्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी १६ मार्च या दिवशी झाली. या प्रश्‍नपत्रिकेच्या अनुषंगाने समाजमाध्यमांवर फिरत असलेल्या पोस्टविषयी कागल तालुका शिष्यवृत्ती नियोजन समितीने खुलासा केला आहे.

‘‘ही प्रश्‍नपत्रिका गणित विषयाची असून यात कोणत्याही स्वरूपाचे ऐतिहासिक दाखले अगर संदर्भ दिलेले नाहीत. यात कोणत्याही धर्मियांच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता आणि नाही. गणिताच्या प्रश्‍नपत्रिकेमध्ये वापरलेल्या या नावाला कोणतीही ऐतिहासिक पार्श्‍वभूमी अगर संदर्भ नाही. प्रश्‍नपत्रिका सिद्ध करणारे शिक्षक संभाजी तोडकर रा. राधानगरी यांनी असा खुलासा केला आहे की, त्यांनी उदाहरणादाखल दिलेली नावे ही त्यांचे नाव आणि त्यांचे भाऊ यांची आहेत. तरीसुद्धा दुखावलेल्या भावनांमुळे मी जाहीर क्षमायाचना करत आहे.’’