गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निषेधार्थ भाजपची सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंदोलने

सिंधुदुर्ग – महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना प्रतिमहा १०० कोटी रुपये गोळा करायला सांगितले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केल्यानंतर राज्यात राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. याचे पडसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यातही उमटत आहेत. भाजपच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने करून ‘गृहमंत्री देशमुख त्यांनी त्यागपत्र द्यावे’, अशी मागणी केली.

सावंतवाडी शहरातील जयप्रकाश चौक, वेंगुर्ले शहरात पिराचा दर्गा, बांदा शहरातील कट्टा कॉर्नर, वैभववाडी शहर आणि कुडाळ शहरात भाजप कार्यालयाच्या समोर शहर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून देशमुख यांचा निषेध करण्यात आला.