गतीरोधकातून विद्युत् निर्मिती करणार्‍या पुणे येथील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांच्या संशोधनास केंद्र सरकारचे ‘पेटंट’

पुणे, १८ मार्च – येथील पॉलिटेक्निकच्या (एस्.व्ही.सी.पी.) प्राध्यापिका सौ. वेणूताई चव्हाण आणि विद्यार्थी यांनी मीनल मजगे यांच्या मार्गदर्शनाखाली भौतिकशास्त्राच्या मूलभूत संकल्पनेचा वापर करून ‘पॉवर जनरेशन यूजिंग स्पीड ब्रेकर’ हा प्रकल्प विकसित केला आहे. गतीरोधकावरून जाणार्‍या वाहनाद्वारे निर्माण होणारी ऊर्जा गतीशील ऊर्जेत रूपांतरीत केली जाते. या विद्युत् निर्मितीच्या प्रकल्पात यांत्रिक ऊर्जा विद्युत् ऊर्जेत रूपांतरीत करण्याची सोपी यंत्रणा वापरल्याने केंद्र सरकारच्या वतीने या संशोधनासाठी ‘पेटंट’ देण्यात आले आहे.

मीनल मजगे यांनी सांगितले, गतीरोधकाखाली प्लेट्स बसवल्या आहेत. वाहन त्या प्लेटवरून गेल्यावर त्यांची उंची वाढण्यासह ऊर्जानिर्मितीही होईल. एका वर्दळीच्या महामार्गावरील गतीरोधकावरून प्रतीमिनिटाला सरासरी १०० हून अधिक वाहने जात असतील, तर अशा ठिकाणी प्रत्येक मिनिटात अनुमाने १ किलोवॅट वीज सिद्ध केली जाऊ शकते. उत्पन्न केलेली वीज बॅटरीमध्ये साठवली जाते आणि पुढे रस्त्यावर दिवे लावणे, जवळपासच्या झोपडपट्ट्यांना अल्प मूल्यात वीजपुरवठा करणे इत्यादी उद्देशांनी वापरले जाऊ शकते. ही यंत्रणा मल्टिप्लेक्स पार्किंग, मॉल, टोल बूथ, सिग्नल आदी ठिकाणी बसवणे सोयीचे आहे.