‘१५.९.२०१९ ते २१.९.२०१९ या कालावधीत श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवद आश्रमात वास्तव्यासाठी होत्या. त्या कालावधीत मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. देवद आश्रमात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या आगमनानंतर जाणवलेली सूत्रे
१ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवद आश्रमात आल्यानंतर ‘त्यांना भेटणे किंवा त्यांच्याशी बोलणे झालेच पाहिजे’, असे न वाटता ‘ईश्वरेच्छेने होईल ते आनंदाने स्वीकारूया’, असा विचार मनात येणे; मात्र अकस्मात् त्यांची भेट होणे : १५.९.२०१९ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवद आश्रमात आल्या. तेव्हा साधक त्याविषयी बोलत होते. काही साधकांनी मला कुतूहलाने विचारले, ‘‘तुम्ही त्यांना भेटलात का ? त्यांना पाहिले का ?’’ ते ऐकून मला उत्साही आणि चैतन्यमय वाटत होते; मात्र ‘त्यांना भेटणे किंवा त्यांच्याशी बोलणे झालेच पाहिजे’, असे वाटलेे नव्हते. ‘ईश्वरेच्छेने होईल, तसे आपण आनंदाने स्वीकारूया’, असा विचार माझ्या मनात आला आणि शांत वाटले.
अकस्मात् जिन्यामध्ये माझी त्यांच्याशी भेट झाली. त्या वेळी त्या अन्य साधकांशी बोलत होत्या. त्या मला म्हणाल्या, ‘‘भगवंताचे नियोजन होते की, आपली येथे भेट व्हावी.’’ मी त्यांना नमस्कार केला आणि त्यांना विचारून सेवेसाठी गेलो.
१ आ. रात्रभर प्रवास केलेला असूनही श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ उत्साही, आनंदी आणि चैतन्यदायी वाटणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ रात्रभर प्रवास करून आश्रमात आल्या होत्या, तरीही त्या पुष्कळ उत्साही, आनंदी आणि चैतन्यदायी वाटल्या. त्यांच्या दर्शनाचा आनंद मिळाल्याविषयी मी गुुरुचरणी कृतज्ञता व्यक्त केली.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आश्रमात आल्यानंतर आलेल्या अनुभूती
२ अ. आश्रमाशेजारील शिवमंदिरातील शिवपिंडीवर जलाभिषेक करण्याची सेवा करतांना आलेल्या अनुभूती
२ अ १. खाली बसणे जमत नसतांनाही दीड घंटा पाटावर मांडी घालून बसून अभिषेक घालण्याची सेवा करू शकणे : भगवान शिवाच्या कृपेने मला देवद आश्रमाच्या शेजारील शिवमंदिरात शिवपिंडीवर ‘ॐ नमः शिवाय ।’ असा जप करत दिवसभर अखंड जलाभिषेक करण्याची सेवा मिळाली. माझे वय ७३ वषेर्र् असून बर्याच वर्षांपासून मला भूमी किंवा पाट यांवर मांडी घालून बसणे जमत नाही. इतकेच नव्हे, तर आसंदीवर सलग बसणेही कठीण जाते; मात्र १९.९.२०१९ या दिवशी सकाळी १०.१५ ते ११.४५ या दीड घंट्यात मी पाटावर मांडी घालून बसून अभिषेक घालण्याची सेवा करू शकलो.
२ अ २. सकाळी दोन घंट्यांपेक्षा अधिक वेळ बसून समष्टी मंत्रजपाची सेवा केल्यावर जलाभिषेकाची सेवा करतांना कसलाही त्रास न होणे : शिवाची पिंडी मोठ्या आकाराची असल्याने उजवा हात लांब करून, थोडेसे वाकून आणि हातात पात्र घेऊन शिवपिंडीवर जलाभिषेक करावा लागला. त्यापूर्वी सकाळी माझी दोन घंट्यांपेक्षा अधिक वेळ बसून समष्टी मंत्रजपाची सेवा झाली होती, तरीही मला जलाभिषेक करतांना कसलाही त्रास झाला नाही. हे केवळ भगवान शिव, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि गुरुमाऊली यांच्या कृपेमुळे झाले. (इतर वेळी मला कुणी अशा लहानशा शिवमंदिरात बसून १० मिनिटे अभिषेक करण्यास सांगितले असते, तरी मला ते जड गेले असते.)
नियोजनानुसार एका घंट्याने अभिषेकाच्या सेवेसाठी पू. दाभोलकरकाका येणार होते आणि मी एक घंटा विश्रांती घेणार होतो. ‘वेळ आली, तर मी ही सेवा सायंकाळपर्यंत एकट्यानेही चालू ठेवू शकतो’, अशी माझ्या मनाची सिद्धता भगवान शिवाने करवून घेतली. त्यानंतर अन्य संत या सेवेसाठी आले आणि शिवाने माझ्याकडून अधूनमधून अशी ४.३० घंटे अभिषेकाची सेवा करवून घेतली.
२ अ ३. अभिषेक करतांना मंदिराजवळ आलेल्या भटक्या कुत्र्यांमध्ये खंडोबाचे रूप दिसणे आणि खंडोबाला प्रार्थना केल्यावर ती कुत्री मंदिरात न येता दूर निघून जाणे : अभिषेक करतांना परिसरातील १ – २ भटकी कुत्री मंदिराजवळ आली. असे ३ वेळा झाले. त्या कुत्र्यांमध्ये मला शिवाचा अवतार असलेल्या खंडोबाचे रूप दिसले. त्या वेळी माझ्याकडून प्रार्थना झाली, ‘हे खंडोबादेवा, तू माझे कुलदैवत आहेस. गुरुमाऊलींनी दिलेली ही सेवा तुझ्या कृपेने निर्विघ्नपणे पार पडू दे. या अखंड अभिषेकातून तुला अपेक्षित असा समष्टीला लाभ होऊ दे.’ प्रार्थना केल्यावर ती कुत्री मंदिरात न येता मान हलवून दूर निघून गेली.
२ अ ४. अभिषेक करण्याची संधी मिळाल्यावर कृतज्ञताभाव जागृत होणे आणि ही सेवा करतांना कोणतीही अडचण न येता पुष्कळ चैतन्य जाणवणे : जेव्हा हा अभिषेक करण्याची संधी देवाने दिली, तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटली; कारण आश्रमात शिवपूजेची सेवा मला आतापर्यंत कधीच मिळाली नव्हती. या निमित्ताने मला शिवाची सेवा करण्याची संधी मिळाली आणि माझा गुरुमाऊलीप्रती कृतज्ञताभाव जागृत झाला. त्यामुळे मला अभिषेकासाठी भूमीवर बसण्याचा, तसेच डासांचा किंवा इतर कसलाच त्रास झाला नाही.
मी अभिषेक करत असतांना शिवमंदिरात अन्य एकही व्यक्ती दिवसभरात आली नाही किंवा मला कसलीच अडचण आली नाही. तेथील ओलसर किंवा कोंदट जागेविषयी माझ्या मनात कसलाच विचार आला नाही. मला तेथे पुष्कळ चैतन्य जाणवले.
२ अ ५. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्यातील चैतन्य अन् संकल्पशक्ती यांमुळे जलाभिषेकाची सेवा उत्साहाने आणि आनंदाने करता येणे : १८.९.२०१९ या दिवशी सकाळी ९.३० ते सायंकाळी ७ या कालावधीत सेवा झाली. या दिवशी सकाळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी शिवपिंडीवर जलाभिषेक केला. त्यांच्यातील चैतन्य आणि संकल्पशक्ती यांमुळे आम्हाला जलाभिषेकाची सेवा उत्साहाने अन् आनंदाने करता आली.
अशा प्रकारे सलग ३ दिवस शिवमंदिरात शिवपिंडीवर जलाभिषेक करण्याची सेवा (प्रतिदिन सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आलटून-पालटून प्रत्येकी १ घंटा) मी आणि पू. गुरुनाथ दाभोलकरकाका यांच्याकडून भगवान शिवानेच करवून घेतली. गुरुकृपेने या सेवेतून आम्हाला आनंद मिळाला.
२ आ. ६ आठवडे सर्दीचा त्रास होणे आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवद आश्रमात आल्यावर एका सेवेसाठी बाहेर गेल्यावर पावसात भिजावे लागूनही सर्दीचा त्रास पूर्णपणे नाहीसा होणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवद आश्रमात येण्यापूर्वी ६ आठवडे मला सर्दीचा आणि सतत शिंका येण्याचा त्रास होत होता. बरेच औषधोपचार आणि मंत्रजप करूनही हा त्रास उणावत नव्हता. त्यामुळे मी आश्रमाच्या बाहेरची सेवा करण्याचे टाळत होतो; मात्र एका सेवेनिमित्त मला आश्रमाबाहेर जावे लागले. ही सेवा करतांना पहिले दोन दिवस मी पावसात भिजलो आणि वार्यामध्ये बाहेर जाऊन आलो. आश्चर्य म्हणजे त्यानंतर माझा सर्दीचा त्रास आपोआप गेला. याविषयी मी पू. (सौ.) अश्विनी पवार यांना विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘काट्याने काटा काढला गेला.’’ यावरून ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे चैतन्य आणि कृपा यांमुळे साधकांचे त्रास कसे दूर होतात ?’, याची जाणीव होऊन माझ्याकडून गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
‘आज मला कधी नव्हे, एवढी मनाची सिद्धता, उत्साह आणि स्फूर्ती कशी काय होत आहे ?’, याचा विचार केल्यावर लक्षात आले, ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या अस्तित्वाने आणि चैतन्याने सूक्ष्मातून माझ्या मनाची धारणा पालटून ती सकारात्मक होत आहे.’
२ इ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या अस्तित्वाने मनाची सकारात्मकता आणि उत्साह वाढणे : त्या कालावधीत श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ माझ्याशी १ – २ वाक्येच बोलल्या असतील; मात्र त्यांच्या अस्तित्वाने माझ्या मनाची सकारात्मकता आणि उत्साह वाढत होता. ‘त्यांच्यातील चैतन्याने कसा पालट होतो ?’, हे मला शिकायला मिळत होते. ‘हे मजस्तव झाले, परि म्या नाही केले ।’, ही भगवंताची, म्हणजे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची कृपा मला अनुभवता आली.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !
अ. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवद आश्रमात वास्तव्यास असतांना मला समष्टीसाठी नामजप, मंत्रजप आणि प्रार्थना करण्याची सेवा मिळाली. एरव्ही माझ्याकडून अशी साधना झाली नसती; मात्र आपत्काळाच्या आरंभी गुरुमाऊलींनी ती करवून घेऊन साधनेचा आनंद दिला. सूर्य उगवल्यावर फुले आपोआप उमलतात, त्यांना सांगावे लागत नाही; तसे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चैतन्यदायी वास्तव्याने आम्हा साधकांना आपोआप प्रोत्साहन मिळून सेवेचा आनंद लुटता आला. यासाठी कोटीशः कृतज्ञता !
आ. या काळात मला अनेक समष्टी सेवा करण्याच्या संधी मिळाल्या आणि गुरुमाऊलींनी त्या करवूनही घेतल्या. यासाठी कोटीशः कृतज्ञता ! ‘यापुढेही गुरुदेवांच्या समष्टी यज्ञात तन, मन, धन आणि प्राण यांची आहुती देण्याची संधी मिळावी’, अशी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना !
इ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या वास्तव्यामुळे आश्रम आणि परिसर चैतन्याने भारित झाला होता. त्यामुळे साधकांमधील उत्साह वाढला होता. या काळात मला ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असते’ आणि ‘चैतन्य कार्य करते’, हे अनुभवायला मिळाले. चैतन्यशक्तीचा आनंद देणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि परात्पर गुरुमाऊली यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२३.९.२०१९)
|