परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी साधकांना केलेले मार्गदर्शन

प्रत्येक जिवाची साधना व्हावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हे वेळोवेळी साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करत. १८ मार्च या दिवशी ‘व्यष्टी आणि समष्टी साधना’ याविषयी केलेल्या मार्गदर्शनातील काही भाग पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.     

भाग ११

भाग १० वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/459997.html

परात्पर गुरु डॉ. आठवले

६. व्यष्टी आणि समष्टी साधना ! 

६ इ. नामजप करतांना चांगले ध्यान लागत असले, तरीही कलियुगात समष्टी साधना महत्त्वपूर्ण आहे !

पहिला साधक : नामजप करतांना माझे नेहमी चांगले ध्यान लागते. कधी येथे पुष्कळ थंड जाणवते, तर कधी कधी माझे संपूर्ण शरीर थंंड झाल्याचे जाणवते. कधी मला ‘मी वैकुंठलोकात गेलो आहे’, असे वाटते, तर कधी वाटते, ‘मी उडत आहे. सगळे हलत आहे.’ काही वेळा ‘मी आकाशात आहे’, असेही वाटते. त्या वेळी चक्करसुद्धा येते.

परात्पर गुरु डॉक्टर : चांगली अनुभूती आहे. अशा चांगल्या अनुभूती येतात, मग पृथ्वीवर का येता ?

पहिला साधक : आपले दर्शन घेण्यासाठी !

परात्पर गुरु डॉक्टर : महत्त्वाची गोष्ट कशी आहे ? ध्यान केव्हा महत्त्वाचे होते ? पूर्वी सत्ययुग किंवा त्रेतायुग होते. तेव्हा सर्वजण सात्त्विक होते. त्या वेळी समष्टी साधना करणे आवश्यक नव्हते. जेव्हा समष्टी साधना करायची नसते, तेव्हा ध्यान लावून बसू शकतो; परंतु आता कलियुगात उलटे झाले आहे. ध्यान लावणे म्हणजे व्यष्टी साधना झाली आहे. कलियुगात समष्टी साधना महत्त्वाची आहे. ‘सर्वांना साधना शिकवणे किंवा त्यांच्याकडून साधना करवून घेणे’, महत्त्वाचे आहे. जेव्हा तुमचे ध्यान लागते, तेव्हा तुम्ही काय करायचे ? तुम्हाला मनाला जी स्वयंसूचना द्यायची आहे, ती त्या वेळी आठवावी. असे केल्याने स्वयंसूचना लवकर अंतर्मनापर्यंत, चित्तापर्यंत पोचेल. बाह्यमनातून स्वयंसूचना कितीही वेळा आठवली, तरी काही परिणाम होणार नाही. लवकर परिवर्तन होण्यासाठी सूचना चित्तापर्यंत जायला पाहिजे आणि तुम्ही चित्तापर्यंत जातच आहात. तुमचे ध्यान लागते, म्हणजे त्याचा लाभ स्वयंसूचना देणे आणि नामजप करणे यांसाठी घ्या. आणखी बोला.

पहिला साधक : बस, आपल्या चरणांशी रहायचे आहे.

परात्पर गुरु डॉक्टर : मनात काही प्रश्‍न असतील, तर त्वरित विचारून घ्या. मनात काही ठेवू नका. एकेका प्रश्‍नाचे उत्तर मिळाले, तर साधनेत लवकर पुढे जाता येते. मनात काही राहिले, तर त्या प्रश्‍नाविषयी मनात विचार येत रहातात. असे व्हायला नको.

६ ई. समष्टीत गेल्यानंतर समजते, ‘स्वतःमध्ये स्वभावदोष अधिक आहेत’ !

दुसरा साधक : मी गोरखपूरमध्ये अध्यात्मप्रसाराची सेवा करत आहे, याला आता दोन मास (महिने) झाले. समष्टीत गेल्यानंतर लक्षात आले की, माझ्यामध्ये पुष्कळ स्वभावदोष आहेत. ते वर उफाळून आलेले दिसून येतात.

परात्पर गुरु डॉक्टर : हो. कलियुगात ध्यानयोग इत्यादींचे साधनेत महत्त्व नाही, हे यावरून लक्षात येईल; कारण ध्यानामध्ये स्वतःतील स्वभावदोष लक्षात येत नाहीत. एखादा ध्यान लावून बसला आहे. जो समाजात जातो, बोलतो किंवा काही कृती करतो, त्याचे स्वभावदोष लवकर बाहेर पडतात. ऋषिमुनींच्या गोष्टी पुराणात वाचल्या असतील. एक ऋषि ५०० वर्षे ध्यान लावून बसले होते. एक दिवस एक कुत्रा त्यांच्या बाजूने जातांना त्यांना त्याचा स्पर्श झाला. त्यांनी डोळे उघडले, तर कुत्रा जळून भस्मसात् झाला. म्हणजे ते कुत्र्याचा स्पर्शसुद्धा सहन करू शकत नाहीत. त्यासाठी स्वभावदोष निर्मूलन महत्त्वाचे आहे. काय करायचे, हे समजले ना ?

६ उ. समष्टी प्रकृती असेल, तर नामजपाचे तेवढे महत्त्व नाही; परंतु स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन महत्त्वपूर्ण आहे !

साधिका : अध्यात्मप्रसारासाठी निवडलेल्या क्षेत्रांचे दायित्व माझ्याकडे आहे. त्यात वेळ निघून जातो आणि नंतर लक्षात येते, ‘अरेे एवढा वेळ गेला.’ आपल्याला असे करायचे आहे, तर व्यष्टी साधनेचे प्रयत्न होतच नाहीत.

परात्पर गुरु डॉक्टर : सेवा करण्यात वेळ जातो, तर ती साधनाच आहे. कसे असते ना, प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. कुणी व्यष्टी साधनेच्या प्रकृतीचा असतो, तर त्याच्यासाठी नामजप ही साधना आहे; पण तो नामजप भावपूर्ण होणे महत्त्वपूर्ण असते. कुणाची समष्टी प्रकृती असते. त्याच्यासाठी समाजात जाऊन प्रसार करणे इत्यादी महत्त्वपूर्ण असते. त्याचा ‘आणखी चांगली सेवा कशी होईल ?’, असा विचार असतो. तुमची समष्टी साधनेची प्रकृती आहे, तर नामजप आणि हे अन्य व्यष्टी साधनेचे प्रयत्न तुमच्यासाठी एवढे महत्त्वाचे नाहीत; परंतु स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन हे दोन्ही साधना मार्गांसाठी आवश्यक आहे.

 (क्रमश:)


भाग १२. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/460688.html

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक