परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी साधकांना केलेले मार्गदर्शन

प्रत्येक जिवाची साधना व्हावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हे वेळोवेळी साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करत. १९ मार्च या दिवशी ‘व्यष्टी आणि समष्टी साधना’ याविषयी काही भाग पाहिला. आज या मालिकेतील अंतिम भाग पाहूया.

भाग १२.

भाग ११ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/460314.html

परात्पर गुरु डॉ. आठवले

७. अध्यात्मप्रसाराच्या संदर्भात केलेले मार्गदर्शन 

७ अ. अध्यात्मप्रसाराला कालमाहात्म्य आणि स्थानमाहात्म्य यांनुसार प्रतिसाद मिळतो !

साधक : आमच्या भागात अध्यात्मप्रसाराचा वेग जेवढ्या गतीने वाढायला पाहिजे, तेवढा वाढत नाही. तेथे स्थानमाहात्म्य असे काही आहे का ?

परात्पर गुरु डॉक्टर : आपण कालमाहात्म्य म्हणतो. ते कसे आहे ? रात्री दीड-दोन वाजता ‘अरे, सूर्य केव्हा उगवणार ?’, अशी आपण काळजी करत राहिलो, तर कसे होईल ? अशी चिंता कशाला करायची ? तो सकाळी सहा वाजता उगवणारच आहे. त्याचप्रकारे स्थानमाहात्म्य असते. ‘कोणता भाग, जिल्हा, राज्य आणि पृथ्वीवर कोणत्या देशात हे कार्य होईल ?’, हे सर्व काळानुसार ठरलेले असते. ‘स्थान आणि काळ’, याचा आपण विचार करायचा नाही. आपण एखाद्या भागात जाऊन प्रयत्न केला आणि तिथे प्रतिसाद मिळाला नाही, तर ते क्षेत्र सोडून दुसरीकडे जायचे. जिथे प्रतिसाद आहे, तेथे आपण जायचे.

७ आ. ‘पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची (कलियुगांतर्गत सत्ययुगाची) स्थापना करायची आहे !’, असा अमेरिकेतील एका संतांचा विचार संतांमधील व्यापकत्व दर्शवते ! 

परात्पर गुरु डॉक्टर : वर्ष १९९८ मध्ये मी एक ग्रंथ लिहिला होता. त्याचे नाव ‘ईश्‍वरी राज्याची स्थापना’, असे होते. तेव्हा माझ्या मनात ‘भारतामध्ये रामराज्य आणावे, हिंदु राष्ट्र आणावे’, असा विचार होता. मला वाटायचे, ‘अरे, मी केवळ माझ्या कुटुंबाचा विचार करत नाही, तर मी भारताचा विचार करत आहे.’ जवळजवळ ८ ते १० वर्षांपूर्वी एका संतांचा अमेरिकेतून दूरभाष आला. ते भारतीय हिंदू संतच आहेत. त्यांनी सांगितले, ‘‘मी तुमच्या आश्रमात येऊन यज्ञ-याग इत्यादी करू इच्छितो.’’ आपण पृथ्वीवर रहातो, तर आपल्याला इतर लोकांचे काही ठाऊक नसते. ईश्‍वर संपूर्ण विश्‍वात आहे. संत ईश्‍वराच्या जवळ असतात. त्यामुळे त्यांना ‘पृथ्वीवर काय चालू आहे ?’, हे ठाऊक असते आणि ‘ईश्‍वराच्या मनात काय चालू आहे’, तेसुद्धा त्यांना ठाऊक असते. त्यांचे वय ८२ वर्षें आहे; म्हणून मी विचार केला, ‘या वयात त्यांनी अमेरिकेतून येथे यायचे आणि काही विधी करायचे. त्यांना कशाला त्रास द्यायचा ?’ बोलता बोलता आणखी एक गोष्ट समजली की, ते अग्निहोत्र शिकवतात. त्यांचे पृथ्वीवर १० सहस्र ठिकाणी शिष्य आहेत. मी त्यांना सांगितले, ‘‘तिसरे महायुद्ध, तर अणूयुद्ध होणार आहे. जो सूर्योदय आणि सूर्यास्त या वेळी अग्निहोत्र करतो. त्यामुळे ३ ते ३० कि.मी. क्षेत्रात अणूयुद्धाच्या किरणांचा परिणाम होत नाही. पृथ्वीवर १० सहस्र स्थानांवर तरी मानव जिवंत रहातील ना ? तेच कार्य महत्त्वाचे आहे. येथे कशाला येता ?’’ त्यांनी सांगितले, ‘‘मी तिथे येऊन यज्ञ-याग इत्यादी करीन. ८ दिवस राहीन आणि सर्व करीन. त्यामुळे पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची स्थापना करणे सोपे होईल.’’ मी केवळ भारताविषयी विचार करत होतो, तर त्यांनी पृथ्वीविषयी सांगितले. संतांचे व्यापकत्व किती असते ना ! आपल्याला वाटते, ‘आम्ही काहीतरी मोठे कार्य करतो ?’

मी त्यांना सांगितले, ‘‘फारच छान ! आपण आल्यावर मी थोडा तरुण झालो आहे’, असे मला वाटेल.’’

या अनमोल मार्गदर्शनासाठी आम्ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

(समाप्त)