आरोपीला मदत करण्यापर्यंत पोलिसांची मजल कशी जाते ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्यास नवल काय ? याचाच अर्थ पाणी कुठेतरी मुरत आहे, असेच सर्वसामान्यांना वाटेल !
नगर – सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे यांना पोलिसांनी कह्यात घेतले; मात्र त्यानंतर त्यांची बडदास्त ठेवली जात असल्याचा आरोप जरे यांचा मुलगा रूणाल जरे यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा आत्मदहन करू, अशी चेतावणीही जरे यांनी दिली आहे.
आरोपीला पोलिसांनी कह्यात घेतल्यानंतर भाग्यनगरहून आणतांना तिरंगा ध्वज लावलेल्या आलिशान मोटारीमधून आणण्यात आले. त्याच्यासाठी पारनेर येथे स्वतंत्र कोठडीची व्यवस्था करण्यात आली. कह्यात घेतल्यानंतर त्याला बेड्याही घालण्यात आलेल्या नाहीत, असे सांगून ४८ घंट्यांत या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी रूणाल जरे यांनी केली. कायद्याच्या पलीकडे जाऊन बोठे यांची बडदास्त ठेवणार्या पोलिसांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे अधिवक्ता सुरेश लगड यांनी केली आहे.