‘सुर-ताल हुनर का कमाल’ या नृत्यस्पर्धेत भाग घेतल्यानंतर नृत्याचा सराव करतांना कु. अंजली कानस्करला आलेल्या अनुभूती

दुर्ग (छत्तीसगड) येथील कु. अंजली कानस्कर (वय २० वर्षे) हिने महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाकडून ‘सुर-ताल हुनर का कमाल’ या नृत्यस्पर्धेत भाग घेतल्यानंतर नृत्याचा सराव करतांना तिला आलेल्या अनुभूती

‘सुर-ताल हुनर का कमाल’ या नृत्यस्पर्धेत मला महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाकडून भाग घेण्याची संधी मिळाली आहे’, असे मला कळले. तेव्हा मला फार आनंद झाला. ‘मला या स्पर्धेच्या माध्यमातून पुष्कळ नवीन सूत्रे शिकायला मिळणार आहेत’, या विचाराने माझ्याकडून गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

संगीत सदर

ईश्‍वरप्राप्तीसाठी संगीतयोग

१. नृत्याचे चित्रीकरण आणि संकलन करतांना पुष्कळ वेळ लागत असल्यामुळे चित्रीकरण वेळेत पूर्ण होऊ न शकणे, तेव्हा नृत्याचे चित्रीकरण पाठवण्याचा दिनांक पुढे गेल्याचे समजणे अन् आणखी ५ – ६ दिवस मिळाल्याने कृतज्ञता व्यक्त होणे

माझ्या नृत्याचे चित्रीकरण करून पाठवायचे होते. आम्हाला त्याचे चलत्चित्र बनवायला फार वेळ लागत होता आणि त्यामुळे माझ्या नृत्याचे चित्रीकरण पूर्ण झाले नव्हते. तेव्हा तेजलताईचा (कु. तेजल पात्रीकर, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय यांचा) आम्हाला निरोप आला, ‘नृत्याचे चलत्चित्र पाठवण्याचा दिनांक पुढे गेला आहे आणि तुमच्याकडे आणखी ५ – ६ दिवस आहेत.’ हे ऐकून गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

कु. अंजली कानस्कर

२. नृत्यासाठी देवीचे स्तुतीपर गीत ठरवले जाणे, नृत्याचे चित्रीकरण करायचे असलेल्या सभागृहात सरस्वतीदेवीचे चित्र असणे आणि त्याकडे पाहून प्रार्थना केली जाणे

ज्या दिवशी नृत्याचे चित्रीकरण करायचे होते, त्या दिवशी मी नृत्यासाठी सिद्ध होऊन चित्रीकरण करण्यासाठी सभागृहात गेले. नृत्याच्या स्पर्धेसाठी मी देवीची स्तुती बसवली होती. चित्रीकरणापूर्वी मी देवीला आणि गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘तुम्ही तुम्हाला अपेक्षित असेच नृत्य माझ्याकडून करवून घ्या.’ त्या सभागृहात श्री सरस्वतीदेवीचे चित्र लावले होते. नृत्याचे चित्रीकरण चालू असतांना मी देवीच्या चित्राकडे बघून प्रार्थना केली, ‘हे देवी, तुला अपेक्षित असा भाव तूच माझ्या मनात निर्माण कर आणि तुला अपेक्षित असे नृत्य माझ्याकडून करवून घे.’

२ अ. आलेल्या अनुभूती

१. घरी सराव करतांना माझे नृत्य एका दमात होत नव्हते. अर्ध्या गीतानंतर मला दमायला व्हायचे; पण नृत्याच्या चित्रीकरणाच्या वेळी देवी आणि गुरुदेव यांच्या कृपेने मला न थांबता पूर्ण नृत्य करता आले.

२. इतरांची चलत्चित्रे बघून ‘माझी निवड होणार नाही’, असेच वाटत होते; पण देवाच्या कृपेने माझी उपउपांत्य फेरीसाठी निवड झाली.

३. उपउपांत्य फेरीसाठी नृत्य करतांना जाणवलेली सूत्रे

३ अ. उपउपांत्य फेरीसाठी नवरसातील एका रसावर नृत्य करण्यास सांगितले जाणे आणि परीक्षा जवळ आल्यामुळे ‘नवीन नृत्य बसवणे अन् त्याचा सराव करणे’ याचा ताण येणे : उपउपांत्य फेरीसाठी मला नवरसांमधील कुठल्याही एका रसावर नृत्य बसवायला सांगितले होते. तेव्हा मी वीर आणि रौद्र रसप्रधान नृत्य बसवायचे ठरवले. नृत्याचे चित्रीकरण २ – ३ दिवसांच्या आत पाठवायचे होते आणि माझी परीक्षाही जवळ आली होती. त्यामुळे मला ‘नवीन नृत्य बसवणे आणि त्याचा सराव करणे’ याचा ताण येत होता.

३ अ १. गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर केवळ एकाच दिवसात नृत्य बसवून होणे : माझ्याकडून देवाला प्रार्थना झाली, ‘हे देवा, मला नवीन नृत्य बसवण्याचा ताण येत आहे आणि परीक्षेमुळे नृत्याचा सराव करण्याचे नियोजनही होत नाही. या नृत्याचा सराव तुम्हीच माझ्याकडून करवून घ्या.’ नंतर मला ‘मी सराव करत होते, तिथे गुरुदेव आहेत आणि ते माझे नृत्य बघत आहेत’, असा भाव ठेवून नृत्याचा सराव करता आला. ‘प्रार्थना केल्यावर गुरुदेवांच्या कृपेमुळे एका दिवसात नृत्य बसवून झाले’, अशी मला अनूभूती आली.

३ आ. चित्रीकरण करण्यापूर्वी नृत्याचा सराव करतांना तोंडवळ्यावर अपेक्षित भाव न येणे आणि भावाच्या स्तरावरील प्रयत्न वाढवल्यावर गीतातील भाव ठेवता येणे : नृत्याचे चित्रीकरण करण्यापूर्वी मी सराव करत असतांना अपेक्षित असा भाव माझ्या तोंडवळ्यावर येत नव्हता. त्या वेळी मी भावाच्या स्तरावर प्रयत्न वाढवले आणि गाणे लावून केवळ हातांच्या हालचाली करून त्यात भाव आणण्याचा प्रयत्न केला. यामुळे चित्रीकरणाच्या वेळी गुरुदेवांना अपेक्षित असा गीतातील भाव मला ठेवता आला.

३ इ. अर्ध्या गीतानंतर पुढील पदन्यास विसरणे आणि अत्तर-कापूर यांचे उपाय अन् सभागृहाची शुद्धी केल्यानंतर न विसरता सर्व नृत्य करता येणे : नृत्याचे चित्रीकरण करतांना काही वेळा मी अर्ध्या गाण्यानंतर पुढचे पदन्यास विसरायचे. तेव्हा आईने मला अत्तर आणि कापूर यांचे उपाय करायला सांगितले. तिने सभागृहाची शुद्धी केली. त्यानंतर न विसरता मला पुढचे नृत्य करता आले. हे सगळे केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळेच होऊ शकले. त्यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता !

३ ई. काही तांत्रिक अडचणींमुळे प्रत्यक्ष फेरीच्या वेळी नृत्याचे चलत्चित्र दाखवले न गेल्याने निराशा येणे आणि नंतर उपांत्य फेरीसाठी निवड झाल्याचे कळल्यावर आनंद होणे : प्रत्यक्ष उपउपांत्य फेरीच्या वेळी काही तांत्रिक अडचणींमुळे माझ्या नृत्याचे चलत्चित्र दाखवण्यात आले नाही. तेव्हा मला निराशा आली; पण नंतर परिस्थिती स्वीकारून मी स्थिर झाले. काही दिवसांनी तेजलताईने ‘माझी उपांत्य फेरीसाठी निवड झाली आहे’, असा निरोप दिला. ‘माझी निवड झाली आहे’, हे एकून मला फार आनंद झाला आणि कृतज्ञता व्यक्त झाली.

४. उपांत्य फेरीच्या वेळी एकाच दिवसात नृत्याचे चित्रीकरण पाठवायचे असल्यामुळे सरावासाठी वेळ न मिळणे आणि केवळ २ – ३ वेळा गाणे ऐकून लगेचच नृत्याचे चित्रीकरण करणे

उपांत्य फेरीच्या वेळी मी गोवा येथे रामनाथी आश्रमात होते. मला पुढचे नृत्य केवळ एका दिवसाच्या आत चित्रीकरण करून पाठवायचे होते. या वेळी मला ‘तराणा’ हा नृत्यप्रकार दिला होता. माझा या नृत्याचा सराव झाला नव्हता. मी केवळ २ – ३ वेळा गाणे ऐकले आणि लगेचच नृत्याचे चित्रीकरण केले.

४ अ. रामनाथी आश्रमातील चैतन्यामुळे तेथे नृत्य करतांना चूक न होणे आणि तोंडवळ्यावर वेगळाच आनंद दिसणे : माझा नृत्याचा सराव झाला नसतांनाही नृत्य न चुकता झाले. घरी असतांना नृत्य करतांना माझ्याकडून नृत्यात चुका व्हायच्या; परंतु या वेळी मी रामनाथी आश्रमात असल्याने तेथील चैतन्यामुळे माझे नृत्य न चुकता आणि सहज झाले. या नृत्याचे चित्रीकरण बघतांना माझा तोंडवळा मलाच वेगळा वाटत होता आणि तोंडवळ्यावर वेगळाच आनंद जाणवत होता. हे सर्व मला देवाच्या कृपेमुळेअनुभवता आले. कृतज्ञता !’

– कु. अंजली कानस्कर, दुर्ग, छत्तीसगड. (१६.२.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक