पुढची ४  वर्षे सुखाची झोप हवी असेल, तर आम्हाला डिवचू नका !  

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन याच्या बहिणीची जो बायडेन यांना धमकी

प्यांगयांग (उत्तर कोरिया) – जर त्यांना (अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना) पुढील ४ वर्षांसाठी सुखाने झोपण्याची इच्छा असेल, तर त्यांच्यासाठी हेच चांगले ठरेल की, त्यांनी आम्हाला डिवचणारे निर्णय घेऊ नयेत. त्यांनी असे केले, तर त्यांची झोप उडेल, अशी धमकी उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याची बहीण किम यो जोंग हिने अमेरिकेला दिली आहे. या धमकीमुळे दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा ताणले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्यातील वार्षिक सैनिकी अभ्यास मागील आठवड्यापासून चालू झाला आहे. यापूर्वी अनेकदा उत्तर कोरियाने या संयुक्त अभ्यासाला ‘दक्षिण कोरिया आक्रमणाची सिद्धता करत आहे’ असे सांगत यावर आक्षेप घेतला आहे. या युद्धाभ्यासाला उत्तर देण्यासाठी उत्तर कोरियाने अनेकदा क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्या आहेत.

किम यो जोंग हिने पुढे म्हटले की, आम्हाला दक्षिण कोरियाचे सहकार्य लाभले नाही, तर सैनिकी तणाव समाप्त करण्याच्या संदर्भात वर्ष २०१८ मध्ये केलेल्या करारामधून बाहेर पडण्याचा निर्णयही आम्ही घेऊ शकतो. ‘दोन्ही देशांमध्ये शांतता टिकवून ठेवण्यासाठी १० वर्षांपूर्वी बनवण्यात आलेली समितीही विसर्जित करू’, अशी धमकीही तिने दिली.