नागपूर येथे वृद्धाच्या मृत्यूप्रकरणी निष्काळजीपणा दाखवणार्‍या एका पोलीस अधिकार्‍यासह ३ पोलीस कर्मचारी निलंबित !

  • अकार्यक्षम पोलीस यंत्रणा !
  • घटनास्थळी विलंबाने गेल्याने घायाळ वृद्धाला तत्परतेने रुग्णालयात न नेणार्‍या कर्तव्यचुकार पोलीस कर्मचार्‍यांचे केवळ निलंबन न करता त्यांच्यावर बडतर्फीची कठोर कारवाई करायला हवी ! असे जनतेचे रक्षण न करणारे पोलीस असून नसल्यासारखेच आहेत !

नागपूर – येथील लोखंडेनगर परिसरात रहाणारे ज्येष्ठ नागरिक भैय्यालाल बैस (वय ६४ वर्षे) यांच्या मृत्यूप्रकरणी निष्काळजीपणा दाखवल्याच्या प्रकरणी मानकापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लाकडे, पोलीस कर्मचारी रोशन यादव, राहुल बोटरे आणि पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी संजय पांडे यांना पोलीस आयुक्तांनी १३ मार्च या दिवशी निलंबित केले.

भैय्यालाल हे ८ मार्चपासून त्यांच्या घरातून बेपत्ता होते. ९ मार्च या दिवशी सकाळी १० वाजता गोरेवाडा भागात निर्जन ठिकाणी ते घायाळ अवस्थेत काही जणांच्या निदर्शनास आले. त्याच वेळी तेथून जात असलेले पोलीस कर्मचारी संजय पांडे यांना लोकांनी याची माहिती दिली होती. पांडे यांनी तेथे थांबून घटनेची माहिती स्थानिक मानकापूर पोलीस ठाण्याला दिली होती; मात्र पांडे हे मानकापूर पोलीस ठाण्याचे पथक पोचण्याच्या आधीच तेथून निघून गेले होते. (असे पोलीस कर्मचारी जनतेचे कधीतरी रक्षण करू शकतील का ? – संपादक)

पोलीस उपनिरीक्षक लाकडे आणि इतर २ पोलीस कर्मचारी दुपारपर्यंत घटनास्थळी पोचले नव्हते. दुपारी ४ वाजेपर्यंत घायाळ भैय्यालाल त्याच ठिकाणी मृतावस्थेत पडले होते. नागरिकांनी वृद्धाचा मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना सूचना दिली होती. घटनास्थळी विलंबाने आलेल्या पोलिसांनी मृतदेह कह्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. (माहिती देऊनही घटनास्थळी विलंबाने येणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांवर बडतर्फीची कारवाई करून त्यांच्यावर खटलाही प्रविष्ट केला पाहिजे ! – संपादक) भैय्यालाल यांच्या मृतदेहावर अनेक जखमा असल्याने वैद्यकीय अहवालाच्या आधारे ११ मार्च या दिवशी पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंद केला होता.

मात्र एका पोलीस कर्मचार्‍याने घायाळ अवस्थेत वृद्ध आढळल्यानंतरही पोलीस पथक तेथे येईपर्यंत थांबणे योग्य समजले नाही आणि माहिती देऊनही मानकापूर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वेळेत तेथे पोचले नाहीत. त्यामुळे भैय्यालाल यांचा मृत्यू झाला. पोलीस आयुक्तांनी सर्व प्रकरण गांभीर्याने घेतले, तसेच या ४ पोलिसांची प्राथमिक चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

भैय्यालाल यांची हत्या संपत्तीच्या वादातून झाल्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे मोक्याच्या जागी शेत असल्यामुळे काही भूमाफिया त्यांच्या मागे लागले होेते. ८ मार्च या दिवशी त्यांना अज्ञातस्थळी नेऊन मारहाण केली. त्यात ते बेशुद्ध झाले आणि नंतर आरोपींनी त्यांना मृत समजून गोरेवाडा परिसरात निर्जन ठिकाणी फेकून पळ काढला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.