…तर स्वराज्यासह सुराज्य आणू शकतो का ? हा विचार व्हायला हवा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अद्यापही सुराज्य आलेले नाही, हे उघड सत्य कुणीही नाकारू शकत नाही. हिंदु राष्ट्राची स्थापना ही सुराज्याची संकल्पना आहे. त्यासाठी प्रत्येक राष्ट्रप्रेमीने योगदान द्यायला हवे !

मुंबई – स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याविषयी राज्यात उत्सव चालू होत आहे. स्वातंत्र्य चळवळीत सर्वसामान्य जनतेने जात-पात, धर्म यांपलीकडे जाऊन देशाप्रती भावना दाखवली. अनेकांनी बलीदान दिले. केवळ त्यांचे हौतात्म्य आठवून काही उपयोग नाही, तर ज्यांनी स्वत:चे आयुष्य स्वातंत्र्यासाठी वेचले, त्यांना अभिमान वाटेल, असा देश उभा करता येईल का ? स्वराज्यासह सुराज्य आणू शकतो का ? हा विचार व्हायला हवा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवानिमित्त १२ मार्च या दिवशी येथील ऑगस्ट क्रांती मैदानात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी वरील उद्गार काढले.

ते पुढे म्हणाले, ‘‘ऑगस्ट क्रांती मैदान हे रणमैदान होते. स्वातंत्र्य चळवळीची आठवण करून देणार्‍या या मैदानाचे नुसते नूतनीकरण न करता या मैदानात स्वातंत्र्यलढा जिवंत करणारे स्मारक उभारावे. इतिहास जिवंत ठेवणे आणि तो पुढच्या पिढीपर्यंत पोचवणे, हे आपले कर्तव्य आहे. ‘स्वराज्य आधी कि सुराज्य आधी ?’ हे सूत्र होते. आता स्वराज्याला ७५ वर्षे झाली. सुराज्य आले का, याचा विचार कोण करणार ? आज हे मैदान निःशब्द आहे. हौतात्म्य देऊन स्वातंत्र्य मिळाले आहे. आपल्या पिढीला आयते स्वातंत्र्य मिळाले आहे. त्याचे रक्षण करणे, हे आपले कर्तव्य आहे. स्वातंत्र्याचे तेज जपले पाहिजे. इतिहास जिवंत करणारे स्मारक येथे झाले पाहिजे.’’