मुंबई, १० मार्च (वार्ता.) – कोरोनाचा संसर्ग न होण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्याचा कार्यक्रम चालू करण्यात आला आहे. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडून आधारकार्ड आणि शिधापत्रिका घेण्यात येत आहेत; पण महाराष्ट्रात सहस्रो साधूसंत असून ते एका ठिकाणी रहात नसल्याने त्यांच्याकडे आधारकार्ड आणि शिधापत्रिका नाही. त्यामुळे त्यांची पडताळणी करण्यासाठी पोलीस ठाण्यांना अधिकार देण्यात यावेत. जे साधूसंत हे लसीकरण करू इच्छितात, अशांना लस देण्यासाठी एकत्रित करावे. यासाठी शासनाने त्वरित आदेश लागू करावा. यामध्ये महापालिकांनाही सहभागी करून घ्यावे, अशी मागणी भाजप आमदार मंगलप्रभात लोेढा यांनी विधानसभेत केली.
या वेळी काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी ‘सर्व धर्मांतील साधूसंत, मौलाना, मौलवी, पाद्री यांच्याकडेही आधारकार्ड आणि शिधापत्रिका नसेल, तर त्यांनाही लसीकरण करावे’, अशी मागणी केली. त्यावर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरि झिरवळ यांनी ‘या मागणीची सरकारने नोंद घ्यावी’, असे सांगितले.