नर्मदेचे जगन्नाथ !

‘नर्मदेऽऽ हर हर’ या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक जगन्नाथ कुंटे उपाख्य स्वामी अवधूतानंद यांचे ४ मार्च या दिवशी निधन झाले. कुंटे यांनी ‘कालिंदी’, ‘धुनी’, ‘नित्य निरंजन’, ‘साधनामस्त’ आणि ‘प्रकाशपुत्र’ अशी अनेक पुस्तके लिहिली; मात्र ‘नर्मदेऽऽ हर हर’ या पुस्तकामुळे ते महाराष्ट्रात ओळखले जाऊ लागले. कुंटे यांनी नर्मदेच्या ४ परिक्रमा केल्या. तिसर्‍या परिक्रमेनंतर त्यांनी त्या काळात आलेले अनुभव आणि अनुभूती या पुस्तकात शब्दबद्ध केल्या. हे पुस्तक लोकांना इतके भावले की, त्याच्या आतापर्यंत २४ आवृत्त्या निघाल्या. रत्नाकर मतकरी यांच्यासारख्या चिकित्सक लेखकाला हे पुस्तक भावले, यावरून या पुस्तकाची श्रेष्ठता लक्षात येते. भारतात अध्यात्मावर विविध भाषांमध्ये अनेक पुस्तके उपलब्ध आहेत; मात्र ‘नर्मदेऽऽ हर हर’ या पुस्तकाची गोष्टच वेगळी ! अध्यात्मावर आधारित पुस्तके वाचतांना संबंधित वाचक अध्यात्माची आवड असणारा, किमान त्याविषयी थोडे ज्ञान असणारा किंवा साधक असावा लागतो अन्यथा अशा पुस्तकांमधील माया, ब्रह्म, आत्मा आदी विषय संबंधितांना बोजड वाटू शकतात. अशी पुस्तके वाचणारा एक ठरावीक वर्ग असतो. त्याच्या पलीकडे जाऊन ही पुस्तके विकत घेऊन वाचणारे इच्छुक फार अल्प असतात. ‘नर्मदेऽऽ हर हर’ या पुस्तकातही अध्यात्मच आहे; मात्र त्याची मांडणी किंवा अनुभव आणि अनुभूती मांडण्याची शैली ही एकदम वेगळी असल्यामुळे पुस्तक रसरशीत वाटते. ‘पुस्तक वाचतांना आपल्याच आजूबाजूला वावरणारी व्यक्ती आपल्याशी संवाद साधत आहे’, असे वाचकाला वाटते. हे पुस्तक वाचतांना आपण त्या परिक्रमेचा एक भागच होऊन जातो. माणूस चिरंतन आनंदाच्या शोधात असतो. नर्मदा परिक्रमेद्वारे कुंटे यांनी याचाच शोध घेतला आणि तो शब्दबद्ध केला.

मराठी साहित्य क्षेत्राला सध्या उतरती कळा लागली आहे. सध्या हिंदु धर्म आणि परंपरा यांच्या विरोधात जो अधिक मोठ्या प्रमाणात कागदावर गिरपटतो, त्याला लेखक हे ‘लेबल’ लावले जाते. यामुळे सध्या श्रीपाल सबनीस, श्रीमंत कोकाटे, हिंदु धर्माला ‘अडगळ’ समजणारे भालचंद्र नेमाडे आदी पुरो(अधो)गामी, सुधारणावादी यांचा उदो उदो होतो. अशा लेखकांसाठी पायघड्या घातल्या जातात; मात्र कुंटे यांच्यासारखा जगण्याचे मर्म समाजाला उलगडून सांगणार्‍या लेखकाकडे दुर्लक्ष केले जाते. कुंटे यांनी कधी मान-सन्मानाची अपेक्षा केली नाही किंवा कुठला पुरस्कारही स्वीकारला नाही; मात्र साहित्यक्षेत्रातील त्यांचे योगदान दुर्लक्षले गेले, हे नाकारून चालणार नाही.

‘शिष्य’ लेखकाची गाथा !

‘नर्मदेऽऽ हर हर’ हे पुस्तक कुंटे यांनी चक्क ३ दिवसांत लिहून संपवले. त्यांनी लिहिलेली बरीच पुस्तके ही अशीच ३-४ दिवसांत लिहून संपवली आहेत. याविषयी त्यांना विचारले असता, ‘ही पुस्तके मी कुठे लिहिली ? माझ्याकडून ती सद्गुरूंनी लिहून घेतली’, असे ते नम्रपणे सांगत. त्यामुळे नर्मदा परिक्रमेविषयी भरभरून बोलणारे कुंटे हे त्यांच्या लेखनाच्या शैलीविषयी बोलणे मात्र टाळत; कारण ‘जे मी लिहिलेच नाही, त्याविषयी काय बोलायचे ?’, असा त्यांचा भाव. अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या लेखकांचा साहित्यक्षेत्रात वावर असतांना एक लेखक म्हणून कुंटे यांची स्वतःच्या लेखनाविषयी असणारी अभिमानशून्यता उठून दिसते. लोकांनी डोक्यावर घेऊनही पाय जमिनीवर ठेवून वावरणारे कुंटे यांच्यासारखे लेखक विरळच.

नर्मदा परिक्रमा ही व्यक्तीमधील विकार घालवण्यासाठी करायची असते. ही परिक्रमा झाल्यावर मनुष्य विकारमुक्त होऊन त्याला वैराग्य येते. ही परिक्रमा म्हणजे ‘स्व’ला शोधण्याचा प्रवास आहे. आयुष्यात प्रत्येक जण हा शोध घेत असतो; मात्र अध्यात्माची कास पकडल्याने खर्‍या अर्थाने आपण त्यापर्यंत पोचतो. सामान्य माणसाला साधना करणे काहीसे कठीण वाटते; मात्र ‘नर्मदेऽऽ हर हर’ हे पुस्तक वाचतांना ‘आपणही या मार्गाने जाऊ शकतो’ याची खात्री वाचकाला वाटते किंवा अध्यात्म, साधना यांविषयी जिज्ञासा तरी त्याच्या मनात निर्माण होते. हे या पुस्तकाचे किंबहुना कुंटे यांचे खरे यश आहे. नर्मदा परिक्रमेच्या वेळी जंगलातून प्रवास करतांना प्रवाशांना तेथील स्थानिक जमातीकडून ‘लुटले’ जाते. ही चोरी नसते, तर परिक्रमा करणार्‍या भाविकाला पैसा, वस्त्र अशी कशाचीही आसक्ती राहू नये, यासाठी चालत आलेली ही परंपरा आहे. याचे वर्णन करतांना कुंटे एका मुलाखतीमध्ये त्याचा मिश्कीलीने ‘लुटण्याचा कार्यक्रम’ असा उल्लेख करतात. ‘स्वतःकडील पैशांचा, संपत्तीचा त्याग करा’, असे कुणी सांगितल्यास ते सामान्यांच्या पचनी पडत नाही; मात्र अशा ‘लुटण्याच्या कार्यक्रमा’चे खुसखुशीत भाषेत वर्णन केल्याने ही त्याग करण्याची कृतीही सोपी आणि सुलभ वाटते ! त्यामुळे सर्वसंगपरित्याग करणे हे किती आनंददायी, सोपे आणि सुलभ आहे, हे कुंटे अनाहूतपणे दाखवून देतात. ‘साहित्य हे दिशादर्शन करणारे, तसेच मनुष्याला प्रगल्भ करणारे असावे’, असे आपण ऐकतो. कुंटे यांची पुस्तके चिरंतन आनंदाच्या शोधात असणार्‍या लोकांना दिशादर्शन करणारी आहेत. त्यामुळेच साहित्यातील त्यांचे कर्तृत्व उठून दिसते.

खरे पुरोगामी आणि सुधारणावादी !

कुंटे यांनी भोंदूबाबांच्या विरोधात आवाज उठवला. त्यासह ‘देवाला मानणे’ ही अंधश्रद्धा आहे’, असे म्हणणार्‍या अंधश्रद्धावाल्यांच्या विरोधातही ते परखडपणे बोलले. ‘साधना केल्यानेच खर्‍या अर्थाने जाती-धर्माच्या भिंती गळून पडतात’, असे त्यांचे प्रांजळ मत. सध्या जातनिर्मूलन म्हणजे ब्राह्मणांवर प्रहार करणे, अशी व्याख्या झाली आहे; मात्र साधकवृत्तीची व्यक्ती सर्वच समाजाला कशी आपलेसे करते, हे ते अनुभवांवरून सांगत. खंत एवढीच की, अशांचे कधी ‘सुधारणावादी’ किंवा ‘पुरोगामी’ म्हणून कौतुक केेले गेले नाही !

वर्ष २०१९ मध्ये मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पाद्री फ्रान्सिस दिब्रेटो यांची निवड झाली. त्यांचे साहित्यक्षेत्रातील योगदान हा वादाचा विषय. असो. कुंटे यांनी संन्यासाश्रमात प्रवेश केल्यावर भगवे वस्त्र धारण केले. प्रश्‍न हाच की, जर पांढरा झगा घातलेली व्यक्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवू शकते किंवा तिला मान-सन्मान मिळू शकतो, तर भगवे वस्त्र धारण केलेले कुंटे यांच्या लेखनकार्याची म्हणावी तशी नोंद साहित्यक्षेत्रात किंवा सरकार दरबारी का घेतली गेली नाही ? याचे उत्तर सर्वांनीच शोधायला हवे !