हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा त्रिपुरा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशाकडून रहित

त्रिपुरा उच्च न्यायालय

आगरतळा (त्रिपुरा) – त्रिपुरा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अकील कुरेशी यांनी श्रीमद्भगवद्गीतेचा ‘ठकबाजी गीता’ असा उल्लेख फेसबूक पोस्टद्वारे करणार्‍याच्या विरोधात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून नोंदवण्यात आलेला गुन्हा रहित केला आहे. आरोपीने म्हटले, ‘माझी पोस्ट बंगाली भाषेमध्ये असून त्याचा तक्रारकर्त्याने चुकीचा अर्थ काढला. माझ्या पोस्टचा अर्थ होता, गीता कठोर आहे, त्यामध्ये ठक लोकांना नष्ट केले जाते.’

न्यायाधीश कुरेश यांनी म्हटले की, धर्माचा जर जाणीवपूर्वक अवमान करण्यात आला नसेल, तर भा.दं.वि.चा कलम २९५ अ नुसार गुन्हा ठरत नाही. या कलमानुसार जाणीवपूर्वक धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करणार्‍यांनाच शिक्षा करण्याची तरतूद आहे. या प्रकरणात आरोपीने जाणीवपूर्वक अवमान केलेला नाही. त्यामुळे या कलमानुसार गुन्हा ठरत नाही. निष्काळजीपणा किंवा नकळत अशा प्रकारचा अवमान करण्यात आला, तर त्याच्यावर या कलमानुसार गुन्हा नोंदवता येत नाही.