सरकारी कर्मचारी ऐकत नसतील, तर त्यांना बांबूचे फटके मारा ! – केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचा जनतेला सल्ला

हा सल्ला म्हणजे कायदा हातात घेण्याचा प्रकार आहे ! प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी हे घटक जनतेची कामे करत नसतील, तर त्यांना वठणीवर आणण्याचे दायित्व सरकारचे नाही का ? असे सल्ले देण्याऐवजी केंद्रीय मंत्र्यांनी प्रशासन लोकाभिमुख कसे होईल, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

बेगूसराय (बिहार) – सरकारी अधिकारी वारंवार लोकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असतात. सामान्य लोकांकडून अशा तक्रारी वारंवार माझ्याकडे येत असतात. मला या लोकांना सांगायचे आहे की, एवढ्या छोट्या गोष्टींसाठी तुम्ही माझ्याकडे कशाला येता ? खासदार, आमदार, गावचे प्रमुख, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी या सर्वांचे कर्तव्य आहे की, त्यांनी जनतेची सेवा केली पाहिजे. जर त्यांनी तुमचे ऐकले नाही, तर मग दोन्ही हातात बांबूची काठी घ्या आणि त्यांच्या डोक्यावर मारा.

जर असे करूनही तुमचे काम होत नसेल, तर मी तुमच्यासमवेत आहे, असा सल्ला केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी येथे त्यांच्या मतदारसंघातील जनतेला दिला.