संशयिताकडून पोलीस निरीक्षकांसमोरच तक्रारदारावर चाकूने आक्रमण

कराड शहर पोलीस ठाण्यातील प्रकार

पोलीस ठाण्यात येऊन संशयित आरोपी तक्रारदारावर येऊन चाकूने आक्रमण करतो म्हणजे पोलिसांचा धाक पोलीस ठाण्यातही राहिला नसल्याचे लक्षण आहे. असे पोलीस त्यांच्या क्षेत्रातील नागरिकांचे रक्षण काय करणार ?

कराड, ४ मार्च (वार्ता.) – अदखलपात्र गुन्ह्याच्या चौकशीसाठी कराड शहर पोलीस ठाण्यात आलेल्या संशयिताने वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर्. पाटील यांच्यासमोरच अर्जदारावर चाकूने आक्रमण केले. किशोर पांडुरंग शिखरे असे घायाळ झालेल्यांचे नाव असून त्यांना तात्काळ कृष्णा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. शिखरे यांच्यावर आक्रमण करणार्‍या लखन भागवत माने यांना चाकूसहित पोलिसांनी कह्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

किशोर शिखरे हे गवंडी कामाचे ठेकेदार आहेत. लखन माने हे सतत भ्रमणभाषद्वारे किशोर शिखरे आणि त्यांचे वडील यांना धमकावत होते. त्यामुळे त्यांनी २५ फेब्रुवारी या दिवशी कराड शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद केला होता. माने यांची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी १ मार्च या दिवशी पोलीस ठाण्यात बोलवले होते. तेव्हा माने यांनी शिखरे यांच्याकडून माझ्या जीविताला धोका असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी शिखरे यांनाही पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवून घेतले. दुपारी १२.३० वाजता शिखरे त्यांच्या नातेवाइकासमवेत कराड शहर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर्. पाटील याच्या दालनामध्ये आले. या वेळी लखन माने हेसुद्धा पाटील यांच्या दालनामध्ये उपस्थित होते. पोलीस निरीक्षक पाटील आणि शिखरे हे काही बोलायच्या आत माने यांनी जॅकेटमध्ये लपवलेल्या चाकूने शिखरे यांची छाती, पाठ आणि दंड यांवर आक्रमण केले. अचानक झालेल्या आक्रमणामुळे उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची तारांबळ उडाली. माने यांना पोलिसांनी जेरबंद केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला; मात्र किशोर शिखरे या आक्रमणात गंभीर घायाळ झाले.