जळगाव येथील महिला वसतीगृहात पोलीस अधिकार्यांनी महिलांना कपडे काढून नाचायला लावल्याचे प्रकरण
मुंबई, ३ मार्च (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेता; मात्र येथील पोलीस अधिकारी माय-भगिनींना कपडे काढून नाचायला लावतात. महिलांना कपडे काढून नाचायला लावणार्या पोलीस अधिकार्यांना एवढा माज आला कुठून ? या अधिकार्यांना कोण पाठीशी घालत आहे ?, असे प्रश्न भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ३ मार्च या दिवशी विधान परिषदेत उपस्थित केले. राज्यपालांच्या अभिभाषणावर ते सभागृहात बोलत होते.
या वेळी गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘‘जेजुरी येथे अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन केल्याप्रकरणी माझ्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. हा कार्यक्रम धार्मिक ट्रस्टकडून करण्यात आला असतांना त्याचे उद्घाटन एखाद्या व्यक्तीकडून करायला हवे, असे नाही. या प्रकरणात पोलिसांनी स्वत:हून गुन्हा नोंदवला, तर मग पूजा चव्हाण आत्महत्येच्या प्रकणात पोलिसांनी स्वत:हून गुन्हा का नोंदवला नाही ?’’