‘हिंदु धर्मातील काही तथाकथित महाराजांमुळेच सर्वसामान्यांची हिंदु धर्मावरील श्रद्धा न्यून होत चालली आहे. पैसे कमावण्याच्या लालसेपोटी असे तथाकथित महाराज समाजाला अध्यात्मशास्त्रविरोधी कृती करायला सांगतात आणि समाजाला रसातळाला घेऊन जातात. त्यामुळे स्वतःसह समाजीची कधीही भरून न येणारी हानी करतात. याविषयी साधिकेला आलेला एक वाईट अनुभव येथे देत आहोत.
१. पुष्कळ लांबचा प्रवास करून आलेले असतांनाही महाराजांनी पाय धुण्यास नकार देणे
माझ्या आईकडे भागवत सप्ताह आयोजित केला होता. भागवत करणार्या महाराजांनी घरात प्रवेश केला, तेव्हा त्यांनी काळ्या रंगाचे कपडे घातले होते. त्या वेळी माझ्या भावाने घरात पाय धुण्यासाठीची सिद्धता केली होती. महाराज पुष्कळ दुरून आलेले असूनही त्यांनी पाय धुण्यास नकार दिला. त्यांच्या पायांत मोजे होते. त्यांनी पायांवर केवळ दोन थेंब पाणी शिंपडायला सांगितले. माझ्या बहिणीने मात्र ‘नहीं । आपको पैर धोनेही पडेंगे’, असे म्हटल्यावर त्यांनी मोजे काढून पाय धुतले.
२. महाराजांनी भ्रमणभाषवर बोलतांना अधिक किमतीचे कपडे घेण्यास सांगणे
महाराजांसह त्यांचे दोन शिष्य होते. त्यांनी सात्त्विक कपडे घातले होते. त्यांना न्याहरी दिल्यावर भ्रमणभाष आला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘हमें कपडे (कृष्णाचा वेश) अच्छा देना क्यों की कार्यक्रम दस लोगों को अच्छा लगेगा, तो वह लोग बाकी लोगों को बता सकते है ।’’ म्हणजे ‘आपण व्यवस्थित आयोजन केले, तर आपल्याला आणखी कार्यक्रम मिळू शकतात’, असे त्यांना म्हणायचे होते. ते येऊन बसल्यावर बहीण त्यांच्याशी पुष्कळच अनावश्यक आणि मायेतील गोष्टी बोलत होती; पण ते अल्प बोलत होते. त्या वेळी मला गुरुमाऊलीने ‘सनातन संस्थेत सहभागी करवून घेतले, चांगली शिकवण आणि धर्मशिक्षण दिले’, याविषयी कृतज्ञता वाटत होती.
३. महाराजांनी भक्तांकडून भरपूर पैसे घेणे आणि त्यांचे न्यूनतम शुल्क ५१ सहस्र रुपये असणे
ते घरात असतांना किंवा त्यांच्यासाठी चहा आणि स्वयंपाक करतांना कुणीही अजिबात नामजप करत नव्हते. तेथे मोठमोठ्याने बोलणे आणि गोंधळच गोंधळ होता. ‘महाराजांच्या एका कार्यक्रमाचे शुल्क (फी) न्यूनतम ५१ सहस्र रुपये इतके होते. इतर ठिकाणी १ ते २ लाख रुपये असे शुल्क घेतात’, असे त्यांनी सांगितले. ‘१० सहस्र रुपयांचे कपडे आणि जेवणात पुरी किंवा पोळी प्रतिदिन असावी’, अशी त्यांची मागणी असे.
४. महाराज आणि त्यांचे ७ शिष्य यांच्या तोंडवळ्यावर चैतन्य न जाणवणे
महाराज आणि त्यांचे ७ शिष्य १० दिवस घरी होते. या कालावधीत लक्षात आले की, त्या सर्वांच्या तोंडवळ्यावर चैतन्य जाणवत नव्हते. महाराजांच्या शिष्यांनासुद्धा नवीन कपडे घेतले. त्यांनी आदल्या दिवसापासून पितरांची स्थापना केली. पुढे ७ दिवस प्रतिदिन आरंभीला पितरांची पूजा आणि नंतर यज्ञ अन् भागवत कथा, अशी त्यांची दिनचर्या होती.
५. भागवत सप्ताहाचा कार्यक्रम वेळेवर चालू न करणे
पहिल्या दिवशी कार्यक्रमाची वेळ दुपारी ३ ते ७ अशी होती; पण भागवत सप्ताहाचा कार्यक्रम दुपारी ४ वाजता चालू झाला. प्रतिदिन कार्यक्रम दुपारी ४ वाजण्याच्या पुढेच चालू व्हायचा. उपस्थिती अल्प असल्यामुळे प्रत्येकाला आरती ओवाळायला सांगितले गेले. त्यात बराच वेळ गेला आणि उपस्थिती वाढल्यावर त्यांनी भागवत चालू केले.
६. प्रतिदिनचे जेवण पुष्कळ चांगले घेणार असल्याचे सांगणे
त्यांनी ‘एक वेळ फळे आणि संध्याकाळी जेवण घेणार’, असे सांगितले; पण बहिणीच्या आग्रहाखातर ‘प्रतिदिन जेवणात मिठाई, श्रीखंड आणि पुरी घेणार’, असे सांगून ते जेवणासाठी सिद्ध झाले.
७. पूजा करण्याची पद्धत अयोग्य असणे, तसेच देवतांवर फुले फेकल्यासारखी वहात असणे
पितरांचे छायाचित्र पूर्व-पश्चिम ठेवलेले होते आणि पूजा सांगणार्याचे मुख उत्तर-दक्षिण होते. यजमानांचे (पूजा करणार्यांचे) मुख दक्षिणेकडे होते. पूजा करतांना यजमान दूर बसल्यामुळे, म्हणजे फूल वहाण्यासाठी हात पुरत नसल्यामुळे फुलाला यजमान स्पर्श करायचे आणि नंतर ते फूल महाराज छायाचित्रासमोर ठेवायचे; पण ते ठेवतांना एकाच वेळी जलद गतीने वरून सोडून ती फुले सर्व देवतांवर फेकल्यासारखी वहायचे. फुलाचे किंवा पानाचे देठ देवाकडे न ठेवता ते जसे पडेल, तसे वाहिले जात होते. ते मंत्र जलद गतीने म्हणत होते, तसेच मंत्र म्हणतांना भ्रमणभाषवरील ‘कॉल’ पहात होते आणि पूजा सांगतांना इकडेतिकडे बघत पूजा सांगत होते.
८. साधिकेने महाराजांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी राग येऊन मोठ्या आवाजात उत्तर देणे
मी महाराजांना विचारले, ‘‘पितरांचे छायाचित्र दक्षिण दिशेला ठेवू का ? पूजेत ठेवायला जागा आहे.’’ ते मोठ्या आवाजात म्हणाले, ‘‘ठेवू शकता; पण शास्त्रात तर्क-वितर्क नसतात. त्याने काही होत नाही. आम्ही सर्व शास्त्रानुसार करतो. लोक पैशांसाठी करतात.’’ या वेळी माझ्या लक्षात आले की, बहुतेक त्यांना माझ्या विचारण्याचा राग आला असावा.
९. साधिकेने नारायण नागबळी विधीविषयी प्रश्न विचारल्यावर महाराजांनी त्र्यंबकेश्वर येथे विधी करणे चुकीचे असल्याचे सांगणे
मी महाराजांना एक प्रश्न विचारला, ‘‘नारायण नागबळी हा विधी घरी करता येतो का ?’’ ते म्हणाले, ‘‘जे लोक त्र्यंबकेश्वर किंवा अन्य ठिकाणी जाऊन पूजा करतात, त्यांच्यासारखे मूर्ख दुसरे कुणी नाही. मी स्पष्ट बोलणारा आहे आणि असे बोलणारे व्यक्ती कडवे वाटतात. आपल्या घरात सर्व तीर्थ आणि देवदेवता असतात. त्यामुळे ही पूजा घरीच करणे योग्य असते. बाहेर केवळ पैसे लुटतात. अनेक जणांची पूजा एकत्र करतात. ज्याप्रमाणे अनेक व्याधींचे लोक असतात, त्याप्रमाणे एकच कालसर्प अनेक प्रकारचे असतात. (या वेळी त्यांनी मला त्यांच्या भ्रमणभाषमधील ‘व्हिडिओ’ दाखवला.) त्यामुळे पैशांसाठी एकत्र पूजा करतात. आम्ही पैशांसाठी पूजा करत नाही.’’
१०. महाराजांनी आरतीमध्ये सहभागी न होता मोठ्याने बोलत रहाणे
घरातील पूजा झाल्यानंतर आरती चालू झाली; पण महाराज त्यात सहभागी न होता आमच्याशी मोठ्याने बोलत होते, ‘‘मी आतापर्यंत जवळजवळ ५० पेक्षा अधिक नारायण नागबळीचे विधी केले आहेत. आम्ही भागवत करतो; पण कुणी इतर विधी विचारले, तर तेही करून देतो. तुम्ही पुष्कळ कथा ऐकल्या असतील; पण अशी कथा कधीच ऐकली नसेल.’’
११. भागवत पूजेमध्ये पितरांचे छायाचित्र ठेवण्याचे शास्त्र विचारल्यावर त्याचे महाराजांनी सांगितलेले कारण
‘भागवत पूजेमध्ये पितरांचे छायाचित्र का ठेवतात ?’, असे मी महाराजांना विचारले. त्यावर ते म्हणाले, ‘‘भागवत पितरांच्याच कल्याणासाठी असते. त्यांचे कल्याण झाले, तर ते आपल्याला साहाय्य करतात. आम्ही जर काही चुकीचे केले, तर त्याचा दोष आम्हाला आणि आमच्या परिवाराला लागेल, तुम्हाला लागणार नाही.’’
१२. आरती अयोग्य प्रकारे करणे आणि व्यासपिठावरील देवतांची पूजा न करणे
यानंतर महाराज यज्ञ करायला मंडपात गेले. हे सर्व विधी आणि पूजा त्यांचे शिष्य करत होते. ते बाजूला बसून भ्रमणभाष हाताळत होते. शेवटी मोठ्या महाराजांनी आरती केली, तेव्हा ते एका हातात माईक आणि एका हातात भ्रमणभाषमधील आलेले ‘कॉल’ पहात संपर्क करत होते. त्यांनी व्यासपिठावरील देवतांच्या चित्रांची पूजा स्वतः केली नाही आणि कुणाला करण्यासही सांगितली नाही. सर्व झाल्यावर मी ‘पूजा करू का ?’ असे मी विचारल्यावर ‘करू शकता’, असे सांगितले.
१३. अव्यवस्थितपणा असलेली कलश यात्रा !
पूजेनंतर कलश यात्रा निघाली, तेव्हा कुणीच एका ओळीत नव्हते. यात्रेला आरंभ होण्याआधी तशा सूचनाही दिल्या नव्हत्या. त्यामुळे मध्ये अंतर पडत होते आणि कुणी मागचे पुढे धावत येत होते. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्व जण चपला अव्यवस्थित ठेवत होते. मी एक दिवस सर्वांसमोर १० ते १५ वेळा ओळीत चपला लावल्या; पण तेथील कुणालाच सवय नसल्यामुळे कुणाकडूनही तशी कृती होत नव्हती. सर्व भाविक रांगोळीच्या समोर अव्यवस्थितपणे चपला ठेवत होते.
१४. सर्व जणांनी महाराजांचा उल्लेख एकेरी करणे
सर्व जण महाराजांच्या संदर्भात बोलतांना ‘तो राधेश्याम आला, गेला’, असे एकेरी शब्दात बोलत होते. याची त्यांना जाणीव करून दिल्यावर त्यांचे ‘राधेश्याम’ असे नाव नसून ते कथा सांगतात; म्हणून त्यांना सर्व जण तसे म्हणत असल्याचे कळले.
१५. नारायण नागबळी विधीच्या वेळी करण्यात येणार्या स्वयंपाकाविषयी प्रश्न विचारल्यावर महाराजांनी अयोग्य उत्तर देणे
मी महाराजांना विचारले, ‘‘आपल्याकडे ६ व्या आणि ७ व्या दिवशी नारायण नागबळी विधी करणार. पितरांच्या नावाने स्वयंपाक केला जाणार, तर तो प्रसाद सर्व नातेवाइक आणि भक्त यांना चालेल का ?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘तो भंडारा आहे.’’ त्यावर बहीण मला म्हणाली, ‘‘आता तर आरंभीपासून पितरांची पूजा आहे. शेवटच्या दोन दिवसांत विधी करणार आहे. मग ५ दिवस तुला जेवायला काय हरकत आहे ?’’ त्यावर मी तिला सांगितले की, मी भागवतच्या निमित्ताने उपवास करत आहे.
१६. ‘देवाला व्यवस्थितच पदार्थ द्यायला हवा’ म्हणून साधिकेने पदार्थ चाखून पाहिल्यावर बहिणीने ओरडणे आणि त्यावरून महाराजांनी साधिकेला टोमणे मारणे
एकदा मी माझ्या सवयीप्रमाणे पदार्थ बनल्यावर तो चाखून पाहिला. माझी बहीण मला म्हणाली, ‘‘उष्टे केलेस.’’ तेव्हा मी तिला म्हणाले, ‘‘बरोबर आहे का, ते पहाण्यासाठी चव पाहिली; कारण देवाला व्यवस्थित द्यायला हवे ना !’’ तिला हे पटले नाही. मी तिला शबरीचे उदाहरण सांगितले. तिने ते महाराजांना सांगितले. तेव्हा महाराजांनी दुसर्या दिवशी व्यासपिठावरून सांगितले, ‘आजकल लोग भोजन झूठा करकें भगवानको देते है ।’ ते प्रत्येक प्रसंगात मला टोमणा मारल्यासारखे बोलत होते, तर दुसरीकडे भागवत सप्ताहामध्ये महाराजांनी शबरीची कथा सांगितली.
१७. कथा सांगतांना महाराजांमध्ये पुष्कळ अहंभाव असल्याचे जाणवणे
महाराज कथा सांगतांना काही प्रश्न विचारायचे आणि त्याचे उत्तर कुणाला आले नाही, तर म्हणायचे, ‘ऐसा लगता है, भागवतकार कथा अच्छी सुनाते नहीं है । अच्छे ढंगसे स्पष्ट करके बताते नहीं । इसलिए आपको एक भी प्रश्न का उत्तर आता नही । ठीक है । मैं आपको अच्छी कथा बताऊँगा ।’ तेव्हा त्यांच्या बोलण्यातून ‘मी पुष्कळ चांगले सांगतो’ असे वाटायचे. जे भाविक बोलायचे नाहीत, त्यांना ते म्हणायचे, ‘‘भागवत कथेत बोलले नाही, तर पुढच्या जन्मात मुके होतात. तुम्हाला कृष्णाला हृदयात बसवायचे असेल, तर वृंदावनात जावे लागेल.’’ त्या वेळी मला वाटले की, इतर भागवतकार चांगलेच सांगत असतील; पण लोक विसरून जाऊ शकतात. याचा अर्थ भागवतकार चांगले सांगत नाहीत, असा होऊ शकत नाही.
१८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे देवघरातील छायाचित्र काढण्यास सांगणे
एका चौरंगावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे उभे छायाचित्र होते. ते छायाचित्र पाहून महाराज म्हणाले, ‘इस फोटो को हटा दो ।’
१९. पुष्कळ गर्दी असूनही काहीच शिस्त नसणे
लोक यात्रेला आल्याप्रमाणे बसले होते. तेव्हा त्यांना ‘ओळीत बसूया, चप्पल रांगेत ठेवूया’, अशा सूचना दिल्या जात नव्हत्या.
२०. नृत्य करणे, पूजा करणे, आरती ओवाळणे यातच अर्धा वेळ जात होता.
२१. एकदा मांडलेल्या चौरंगावरची पूजा विसर्जित न करता त्यावरच इतरांसाठीची पूजा करणे आणि सुवर्णदान करण्यास सांगणे
महाराजांनी एका व्यक्तीला ‘नारायण-नागबळी करावे लागेल, अधिक पैसे लागणार नाहीत’, असे सांगितले. ते व्यासपिठाजवळच बाहेरच्या लोकांची पूजा करायचे. नंतर ती पूजा विसर्जित न करता तशीच ठेवायचे; कारण दुसरे कुणी आले, तर पुन्हा चौरंग सजवावे लागणार नाही.
महाराजांची तीन दिवसांची पूजा झाल्यावर त्यांनी एका व्यक्तींना सुवर्णदान करायला सांगितले. त्यानंतर ती व्यक्ती आलीच नाही. त्या वेळी महाराजांनी माझ्या भावाला सांगितले, ‘आपकी बहन सत्संग लेती है । इसिलिए मेरी पूजा के ग्राहक कम हो रहे है ।’
(क्रमशः उद्याच्या अंकात)
– सौ. मीना खळतकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (डिसेंबर २०१७)