५६ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली अमरावती येथील चि. त्रिशिका समित परसनकर (वय १ वर्ष) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. त्रिशिका समित परसनकर एक आहे !

चि. त्रिशिका (लक्ष्मीचे नाव) समित परसनकर हिचा पहिला वाढदिवस तिथीने माघ कृष्ण पक्ष तृतीया (१.३.२०२१) या दिवशी आहे. त्यानिमित्त तिची आई सौ. सारिका समित परसनकर आणि इतर कुटुंबियांना तिच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ –  परात्पर गुरु डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

चि. त्रिशिका समित परसनकर

चि. त्रिशिका समित परसनकर हिला सनातन परिवाराकडून पहिल्या वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद !

१. गर्भधारणेपूर्वी

१ अ. श्री भवानीदेवीची ओटी भरतांना बाळासाठी प्रार्थना केल्यानंतर गर्भधारणा होणे आणि त्यानंतर नामस्मरण, प्रार्थना अन् कृतज्ञता व्यक्त होणे : ‘माझे लग्न झाल्यावर दीड वर्षांनी मी माझ्या माहेरची कुलदेवी श्री भवानीदेवीची ओटी भरायला गेले होते. त्या वेळी मी देवीला मला बाळ होण्यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर मला दिवस गेल्यावर माझ्या मनात आले, ‘मला श्री भवानीदेवीनेच मूल होण्यासाठी आशीर्वाद दिला आहे.’ तेव्हापासून मला देवाची ओढ वाटू लागली आणि मी नामस्मरण, प्रार्थना अन् कृतज्ञता व्यक्त करायला लागले. त्या पूर्वी माझा देवाप्रती भाव अल्प होता.

२. गर्भावस्था

२ अ. गर्भधारणा झाल्यापासून सतत आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन, स्तोत्रे म्हणणे, नामजप करणे आणि नामजपादी उपाय करणे : गर्भधारणा झाल्यापासून मी ‘श्रीमद्भगवत्गीता’ वाचायला आरंभ केला आणि तीन मास संपताच माझी ‘भगवत्गीता’ वाचून झाली. अथर्वशीर्ष आणि रामरक्षा स्तोत्रही मी सकाळ-संध्याकाळ नियमित म्हणायला आरंभ केला. मी लग्नाच्या आधीपासूनच देवीकवच वाचत असे. नऊ मास संपेपर्यंत मी ‘रामायण’ वाचले. तसेच मी सनातन संस्थेचे आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे ग्रंथवाचनही करत असे. मी प्रतिदिन पाच ते सात माळा नामजप करत असे. माझे अत्तर आणि कापूर यांचे उपाय चालू झाले.

२ आ. गर्भावस्थेत आलेल्या अनुभूती

२ आ १. रामायणाचे वाचन करतांना ‘बाळाला ते समजत असून त्याला आनंद होत आहे’, असे वाटणे : मी रामायण वाचत असतांना माझ्या पोटात बाळाच्या हालचाली पुष्कळ वाढायच्या. त्या वेळी ‘बाळाला ते पूर्ण समजत आहे. ते पोटात पुष्कळ खेळत असून त्याला पुष्कळ आनंद होत आहे’, असे मला वाटायचे.

२ आ २. पोटावर हात ठेवून नामजप करतांना पोटात बाळाच्या हालचाली पुष्कळ वाढत असत आणि नामजप बंद झाल्यावर ते शांत होत असे.
२ आ ३. गोकुळाष्टमीला ‘श्रीकृष्णाला कृष्णकमळाचे फूल वहावे’, अशी तीव्र इच्छा होणे आणि एका अनोळखी मुलीने कृष्णकमळाचे फूल औषध विक्रीच्या दुकानात ठेवून गेल्यावर पुष्कळ कृतज्ञता वाटणे : एकदा गोकुळाष्टमीला मी कृष्णाचे चित्र पाटावर ठेवून मनोभावे पूजा केली. त्या दिवशी मला ‘कृष्णकमळाचे फूल पाहिजे’, असे पुष्कळ वाटत होते; पण आजूबाजूला कुठेच फूल मिळत नव्हते. मग मी कृष्णाला सांगितले, ‘कृष्णा फूल मिळत नाही रे ! काय करू ?’ तेव्हा आमच्या औषध विक्रीच्या (मेडिकलच्या) दुकानात एक लहान मुलगी आली आणि ती कृष्णकमळाचे फूल ठेवून गेली. मी दुकानात गेल्यावर यजमानांना विचारले, ‘‘फूल कुणी आणले ?’’ तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘एक मुलगी आली आणि ती ठेवून गेली.’’ त्या वेळी मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

३. जन्मानंतर

३ अ. जन्म ते ५ मास

३ अ १. बाळाचा जन्म श्री भवानीदेवीच्या कृपेने होत असल्यामुळे ‘तो मंगळवारी व्हावा’, अशी इच्छा होणे आणि तो मंगळवारीच होणे : माझे बाळ मला श्री भवानीदेवीच्या कृपेने होणार होते. त्यामुळे माझी पुष्कळ इच्छा होती की, ‘माझ्या बाळाचा जन्म मंगळवारी व्हावा.’ तिच्या कृपेने बाळाचा जन्म मंगळवार ११.२.२०२० या दिवशी झाला.

३ अ २. जन्मापासूनच कपाळावर लाल टिळा दिसणे : ती जन्माला आली, तेव्हा तिच्या कपाळावर लाल टिळा दिसत होता. ‘तिने कुंकू लावून जन्म घेतला’, असे वाटत होते. तो टिळा आताही स्पष्ट दिसतो.

३ अ ३. दळणवळण बंदी काळात श्री दुर्गादेवी, श्री गुरुदेव दत्त आणि शिव यांचा नामजप चि. त्रिशिकाला पुष्कळ आवडत असल्याचे दिसून येणे : चि. त्रिशिका २ मासांची असतांना सगळीकडे दळणवळण बंदी चालू झाली होती. या काळात आम्ही सर्वजण ४५ मिनिटे श्री दुर्गादेवी, श्री गुरुदेव दत्त आणि शिव हा नामजप करायचो. हा जप तिला पुष्कळ आवडायचा. हा नामजप पूर्ण होईपर्यंत ती खेळायची, ओठ हलवायची आणि आमच्या नामजपाच्या सूरात सूर लावत असे. ‘तीही जप करत आहे’, असे वाटत होते.

३ आ. ६ मास ते १२ मास

३ आ १. त्रिशिकाने जन्माष्टमीनंतर श्रीकृष्णाच्या चित्राशी तिच्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करणे : ११.८.२०२० या दिवशी त्रिशिकाला ६ मास पूर्ण झाले आणि योगायोगाने त्याच दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी होती. मी त्या दिवशी श्रीकृष्णाचे चित्र भिंतीवरून काढून पाटावर ठेवले. तेव्हा ती एकसारखी त्याकडे पहात होती. तसेच ‘हूं हूं’ करत श्रीकृष्णाशी बोलण्याचा प्रयत्न करत होती. नंतर मी तिला सांगितले, ‘‘हा श्रीकृष्ण आहे.’’ तेव्हापासून ती श्रीकृष्णाला ओळखते. जन्माष्टमी झाल्यावर श्रीकृष्णाचे चित्र परत भिंतीला लावले. तेव्हापासून ती श्रीकृष्णाशी तिच्या भाषेत बोलते.

३ आ २. दूध पीत असतांना श्रीकृष्णाचा नामजप करत दोन्ही हात जोडणे : तिला देवाची ओळख ‘जय जय’ अशी करून दिली. तेव्हापासून कुठेही देवाचे चित्र असले, तरी ती बरोबर शोधते. तसेच आपण ‘जय जय कुठे आहे ?’, असे विचारल्यावर ती अचूक सांगते. मी तिला दूध देत असतांना ती श्रीकृष्णाचा नामजप करत दोन्ही हात जोडते.

– सौ. सारिका समित परसनकर (त्रिशिकाची आई), नांदगाव (खंडेश्‍वर), जि. अमरावती. (६.२.२०२१)

४. देवाची आवड

​‘त्रिशिका जेवण करत नसेल, तेव्हा ‘ये रे कृष्णा जेवायला’, असे म्हटल्यावर ती श्रीकृष्णाच्या चित्राकडे पहाते. तसे करत असतांना ‘तिची त्याच्याशी फार जुनी ओळख आहे’, असे जाणवते.’ – सौ. संगीता विनोद नागोलकर (त्रिशिकाची आत्या), आकोट, जि. अकोला.

५. परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राकडे पाहून बोलणे आणि रडत असतांना श्रीकृष्णाचा नामजप केल्यावर शांत होणे

त्रिशिका विशेष रडत नाही. ती नेहमी हसत खेळत रहाते. तिच्याकडे बघून प्रसन्न वाटते. तिला नमस्कार करायला सांगितला असता ती वाकून नमस्कार करते. तिला ‘‘परम पूज्य कुठे आहेत ?’’, असे विचारले की, ती त्यांच्या छायाचित्राकडे बोट दाखवते. ‘ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे बघून त्यांच्याशी बोलत आहे’, असे वाटते. कधी ती रडत असतांना ‘येरे कृष्णा !’, असे म्हटल्यावर ती इकडे तिकडे भिर भिर पहाते आणि लगेच शांत होते. श्रीकृष्णाचा नामजप केल्यावर ती शांत बसते.’

– सौ. प्रियांका रवींद्र कानडे (त्रिशिकाची मावशी), उमरखेड, जिल्हा यवतमाळ.


यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक