नियमांचे पालन होत नसल्याच्या दु:स्थितीविषयी महाराष्ट्र मंत्रालयीन अधिकारी संघटनेकडून मुख्यमंत्र्यांना पत्र

मंत्रालयात कोरोनासंबंधीच्या नियमांचे तीनतेरा !

मंत्रालयातून राज्यातील विविध भागांत कोरोनाचा प्रसार होत असल्याची भीती व्यक्त

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई – शासकीय परिपत्रक काढून नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करणार्‍या मंत्रालयातच कोरोनाच्या नियमांचे तीनतेरा वाजले आहेत. याविषयी महाराष्ट्र मंत्रालयीन अधिकारी संघटनेचे सरचिटणीस विष्णु पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांना मंत्रालयातील दु:स्थितीविषयी अवगत केले आहे. (राज्यातील शासकीय कामकाजाचे मुख्य केंद्र असलेल्या ठिकाणी कोरोनाविषयीच्या नियमांचे पालन होत नसेल, तर राज्यातील नागरिक तरी कोरोनाच्या नियमांचे पालन करतील का ? मंत्रालयात अशा प्रकारची स्थिती असणे, हे प्रशासनासाठी खेदजनक आहे. – संपादक)

विष्णु पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मंत्रालयात येणार्‍या अभ्यागतांना मंत्रालयात मुक्त प्रवेश दिला जात आहे. कोरोना संक्रमित भागांतील अभ्यागतांसाठीही काहीही निर्बंध नाहीत. अभ्यागतांच्या शरिराचे तापमान नोंदणे, ते मास्कचा वापर करतात किंवा कसे ? यावर लक्ष ठेवण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही, अभ्यागतांच्या हातांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. यांमुळे मंत्रालयात कोरोनाचा धोका वाढला आहेच; पण मंत्रालयाच्या माध्यमातून राज्याच्या विविध भागांमध्येही कोरोनाच्या संसर्गाची शक्यता निर्माण झाली आहे.

मंत्रालयातील ३५ कर्मचारी आणि अधिकारी यांना कोरोनाची लागण

विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आठवड्यावर आले असतांना मंत्रालयातील ३५ कर्मचारी आणि अधिकारी यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. यामध्ये उपसचिव, अवर सचिव, कक्ष अधिकारी, साहाय्यक कक्ष अधिकारी, लिपिक आदींचा सामावेश आहे.