साधकांवर कृपेचा वर्षाव करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
२३ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध केलेल्या या लेखाच्या आठव्या भागात आपण साधिकेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याच्या दिवशी आलेल्या विषयीच्या अनुभूती पाहिल्या. आज त्या पुढील सूत्रे पाहूया.
(भाग ९)
भाग ८ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/453668.html
२६. वर्ष २०१८
२६ अ. एप्रिल ते जुलै २०१८ – गुरुस्मरण करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे श्रीकृष्णाच्या रूपात युद्धभूमीवरील योद्धा म्हणून दर्शन होणे : प्रतिदिन झोपण्यापूर्वी मी नामजप आणि भजने ऐकते, तसेच १ – २ वेळा गुरुस्मरण करते. १ – २ वेळा गुरुस्मरण करतांना मला परात्पर गुरु डॉक्टरांचे श्रीकृष्णाच्या रूपात युद्धभूमीवरील योद्धा म्हणून दर्शन झाले. ‘ते या वेशात त्यांच्या खोलीतून बाहेर पडून ध्यानमंदिराकडे चालत जात आहेत’, असे दृश्य मला दिसले.
२६ आ. ऑगस्ट २०१८ – परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातून दर्शन होणे आणि त्या वेळी ते तरुण अन् आनंदी दिसणे : या मासात एकदा मला सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांचे आश्रमाच्या व्हरांड्यात दर्शन झाले. त्या वेळी ते पिवळा झब्बा घालून सभागृहाकडे चालले होते.
२६ इ. सप्टेंबर २०१८
२६ इ १. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले साधिकेला आणि तिच्या बहिणीला स्वतःसमवेत गरुडाच्या पंखावर बसवून नेत आहेत’, असे दृश्य दिसणे : एकदा मी चारचाकी घेऊन पणजीहून रामनाथीला चालले होते. या प्रवासात मला सूक्ष्मातून एक दृश्य दिसले. त्यात परात्पर गुरु डॉक्टर स्वतःचे वाहन असलेल्या गरुडावर बसले होते. त्यांनी माझी आणि माझ्या बहिणीची गरुडाच्या पंखावर बसण्याची व्यवस्था केली होती आणि ‘ते आम्हालाही त्यांच्या समवेत घेऊन जात आहेत’, अशी मला अनुभूती आली. या अनुभूतीमुळे माझी पुष्कळ भावजागृती झाली अन् ‘गुरुदेव आमच्यासाठी किती करतात !’, याची जाणीव झाल्यामुळे माझे मन कृतज्ञतेने भरून गेले.
२६ इ २. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची भेट झाल्यावर त्यांच्याप्रती परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी वाटत असलेला भाव जाणवणे आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे चरण सोडू नका’, असे सांगणे : १८.९.२०१८ या दिवशी माझी आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकूंची रामनाथी आश्रमात भेट झाली. त्यापूर्वी त्यांना माझ्याविषयी फारशी माहिती नव्हती. परात्पर गुरु डॉक्टरांविषयी माझ्या मनात जो अपार भाव आहे, तसाच भाव मला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकूंना पाहून जाणवला. त्या मला म्हणाल्या, ‘‘तुमच्याविषयीच मी विचार करत असून ते विचार परात्पर गुरु डॉक्टरांकडून येत आहेत.’’ श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ पुढे म्हणाल्या, ‘‘परात्पर गुरु डॉक्टर तुमच्यावर कृपेचा वर्षाव करत आहेत. त्यांचे पवित्र चरण सोडू नका.’’
२६ ई. डिसेंबर २०१८ – परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी असलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून आश्वस्त करणे : डिसेंबर २०१८ मध्ये एकदा मी रामनाथी देवस्थानामध्ये आयोजित केलेल्या एका यज्ञाला उपस्थित राहून घरी परत चालले होते. त्या वेळी अकस्मात् मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ चारचाकीतून बाहेर जाण्यासाठी निघाल्याचे दिसले. परात्पर गुरु डॉक्टरांना पाहिल्यावर माझी जशी भावजागृती होते, तशी त्या दोघींना पाहून माझी भावजागृती झाली. त्यांनी माझ्याकडे पाहून स्मितहास्य केले. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू माझ्याजवळ आल्या आणि माझा हात घट्ट धरून म्हणाल्या, ‘‘तुम्ही आमच्या आहात. आश्रमात कधी येणार आहात ?’’ त्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘लवकरच !’’ ‘परात्पर गुरु डॉक्टर हे स्वतः त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी असलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या वात्सल्यपूर्ण वाक्यांमधून मला आश्वस्त करत आहेत’, असे मला जाणवले.
२७. वर्ष २०१९
२७ अ. ऑगस्ट २०१९
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होण्यापूर्वी नामजप आपोआप चालू होणे, त्यांचे चैतन्य न पेलवल्याने दोन-अडीच घंट्यांनी छातीत धडधडू लागणे आणि संतांनी ‘तुम्हाला ‘ओव्हरडोस’ मिळाला आहे’, असे सांगितल्यावर धडधड थांबणे : ‘एकदा परात्पर गुरु डॉक्टर एका सोहळ्यात येणार होते. ते येण्यापूर्वी माझा नामजप आपोआप चालू झाला. मी हा नामजप थांबवू शकत नव्हते. त्यातून मला पुष्कळ आनंद मिळत होता. सोहळा चालू झाल्यावर दोन-अडीच घंट्यांनी मला छातीत धडधडू लागले. एका संतांना मी हे सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘तुम्हाला ‘ओव्हरडोस’ मिळाला आहे.’’ म्हणजे परात्पर गुरूंकडून मला पुष्कळ प्रमाणात चैतन्य मिळाले आहे, जे मी पेलवू शकत नव्हते. माझा नामजप मात्र अखंड चालू होता. केवढी त्यांची शक्ती आणि कृपा !
२७ आ. १६ सप्टेंबर २०१९
एका कामासाठी पोलीस चौकीत गेल्यावर तेथे पुष्कळ गर्दी आणि गोंधळ असणे, तेथे दीड घंटा थांबावे लागणे, गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर दुसर्या पोलीस अधिकार्याने येऊन काम करून देणे आणि शुल्कही न आकारणे : माझी नवीन चारचाकी काही दुष्ट (गैरवर्तन करणार्या) व्यक्तींनी खराब केली. त्यासाठी मला विम्याचा हक्क सांगायचा होता; परंतु त्यासाठी पुरावा म्हणून पोलिसांत तक्रार नोंदवल्याची प्रत हवी होती. त्यामुळे माझी इच्छा नसतांनाही मला पोलीस चौकीत जावे लागले. तेथे पुष्कळ गर्दी होती आणि गोंधळ चालू होता. प्रत्येक जण विविध तक्रारी नोंदवण्यासाठी पुढे पुढे करत होता. मला तेथे जवळजवळ दीड घंटा थांबावे लागले. शेवटी कंटाळून मी गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘मला येथे येण्याची जराही इच्छा नव्हती. काहीतरी शिकण्याच्या उद्देशाने तुम्हीच मला येथे पाठवले आहे. तुम्हीच पोलीस अधिकार्याला माझे काम करायला सांगा, अन्यथा मी येथून जाते. मला येथील रज-तमात्मक वातावरण सहन होत नाही.’ लगेचच सकाळी कामावर असलेल्या अधिकार्याला बदली म्हणून दुसरा अधिकारी तेथे आला. हा अधिकारी सात्त्विक दिसत होता. मी बराच वेळ वाट पहात होते; म्हणून दुसर्या पोलीस अधिकार्याने त्याला माझी तक्रार नोंदवण्यास सांगितले. केवळ पाच मिनिटांतच त्याने सर्व औपचारिकता पूर्ण केली आणि त्याने काही शुल्कही आकारले नाही.
२७ इ. २४ सप्टेंबर २०१९
सेवेला बसण्याची जागा पालटल्याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होईनासे होणे आणि सकारात्मक विचार केल्यावर त्याच दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन झाल्यावर ‘कोणतीही गोष्ट मला त्यांच्यापासून वेगळे करू शकत नाही’, ही श्रद्धा दृढ होणे : परात्पर गुरु डॉक्टर सकाळी गच्चीत असलेल्या तुळशीला पाणी घालण्यासाठी येत असल्याने मला त्यांचे दर्शन होत असे. माझी सेवेसाठी बसण्याची जागा पालटल्यामुळे मला त्यांचे दर्शन होणे बंद झाले. त्या वेळी माझ्या मनात ‘हरकत नाही. ते माझ्या समवेत आहेत. ही भक्कम भिंत आणि लाकडी पटल मला त्यांच्यापासून वेगळे करू शकत नाही’, असा विचार माझ्या मनात आला. अगदी त्याच दिवशी परात्पर गुरु डॉक्टर यांनी माझी विचारपूस केली. त्यातून ‘कोणतीही गोष्ट मला त्यांच्यापासून वेगळे करू शकत नाही’, ही माझी श्रद्धा अधिकच दृढ झाली.
२७ ई. ११ नोव्हेंबर २०१९
वडिलांच्या पुण्यतिथीच्या दिवशी वडिलांसाठी अन्न बनवून ते बाहेर ठेवणे, ते ग्रहण करण्यासाठी एकही कावळा न येणे, नंतर एका कावळ्याने येऊन अन्न ग्रहण करून जाणे आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वडिलांच्या लिंगदेहाला तेथे येण्यास येत असलेले अडथळे दूर केले’, असे जाणवणे : काळभैरव जयंतीच्या दिवशी माझ्या वडिलांची पुण्यतिथी होती. अमेरिकेत असलेला माझा भाऊ वडिलांचा श्राद्धविधी करत होता. माझ्या आईने सांगितल्यानुसार मी वडिलांसाठी अन्न बनवून ते बाहेर ठेवले. काही वेळ एकही कावळा ते अन्न ग्रहण करण्यासाठी आला नाही. थोड्या वेळाने तेथे गरुड येऊन तीन वेळा घिरट्या घालून गेला. त्यानंतर एक कावळा आला आणि अन्न ग्रहण करून गेला. वडिलांच्या लिंगदेहाला तेथे येण्यास येत असलेले अडथळे दूर केल्याविषयी मी परात्पर गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
२७ उ. ११ डिसेंबर २०१९
२७ उ १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या विष्णुतत्त्व जागृती सोहळ्याच्या वेळी आलेल्या अनुभूती
२७ उ १ अ. सोहळ्यापूर्वी १ – २ आठवडे ‘नारायणा रमा रमणा …’ हे भक्तीगीत ऐकण्याची इच्छा होणे आणि विष्णुतत्त्व जागृती सोहळ्याच्या वेळी एका साधकाने याच गीतावर बासरीवादन करणे : दत्तजयंतीच्या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची पाद्यपूजा करण्यात आली. या सोहळ्यापूर्वी एक किंवा दोन आठवडे मला ‘नारायणा रमा रमणा …’ हे भक्तीगीत ऐकण्याची इच्छा होऊन मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव दाटून येत होता. ‘मी त्यांचे चरण घट्ट धरले आहेत आणि हे गीत गात आहे’, अशी कल्पना मी करत होते. दत्तजयंतीच्या दिवशी या सोहळ्यात एका साधकाने याच गीतावर बासरीवादन केले.
२७ उ १ आ. या सोहळ्यानंतर ‘परात्पर गुरु डॉक्टरांना पुष्कळ शक्ती मिळाली आहे’, असे वाटत होते. त्यांचे मुख लाल झाले होते आणि त्यांच्याकडून पुष्कळ प्रमाणात आनंद प्रक्षेपित होत होता.
(समाप्त)
– डॉ. रूपाली भाटकार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ऑगस्ट २०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |