कोल्हापूर, २२ फेब्रुवारी – कोरोना प्रतिबंधासाठी ट्रेसिंग (शोधमोहीम), टेस्टिंग आणि सर्वेक्षण वाढवण्यावर भर द्या. जे अधिकारी-कर्मचारी यांची नोंदणी लसीकरणासाठी झाली आहे, त्यांचे लसीकरण २६ फेब्रुवारीपर्यंत होण्याचे दायित्व त्या-त्या विभागप्रमुखांवर आहे, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी २२ फेब्रुवारी या दिवशी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियोजन यांसाठी सर्व अधिकार्यांची ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिग’द्वारे बैठक घेण्यात आली. त्या वेळी त्यांनी हे आदेश दिले. या बैठकीला आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासह जिल्हातील सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
अन्य घडामोडी
१. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार्या प्रवाशांवर कर्नाटक सरकारने कडक अटी लागू केल्या आहेत. केवळ ७२ घंट्यांच्या आतील कोरोनाबाधित नसलेल्यांनाच कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. कोगनोळी पथकर नाक्यावर कर्नाटक सरकारकडून प्रत्येक प्रवाशाची कसून चौकशी केली जात आहे. अचानक पडताळणी चालू करण्यात आल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय होत आहे. या प्रवाशांना अनेक घंटे रस्त्यावरच अडकून रहावे लागत आहे, तर अनेकांना परतही यावे लागत आहे.
२. महाराष्ट्रातील नागरिकांना कर्नाटकमध्ये प्रवेश करतांना कठोर अटी लागू केल्याने कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील कर्नाटक सरकारच्या आडमुठेपणावर संतापले आहेत. कोरोना संसर्ग वाढत असला, तरी महाराष्ट्रातील नागरिकांची ‘आर्.टी.पी.सी.आर्. टेस्ट’ करून त्यांना कर्नाटकमध्ये प्रवेश द्यावा. कर्नाटक सरकार आडमुठी भूमिका घेत असेल, तर आम्हालासुद्धा कर्नाटकचे प्रवासी महाराष्ट्रात घेतांना विचार करावा लागेल. कर्नाटक सरकारच्या या भूमिकेविषयी मी केंद्राला माहिती देणार आहे, असे सतेज पाटील यांनी सांगितले. कर्नाटक सरकारने प्रवाशांची कोरोना चाचणी करून त्यांना विलगीकरणात ठेवावे, यावर आम्हाला काहीही हरकत नाही.