उत्तरप्रदेशात मंदिराची भूमी बळकावण्यासाठी देव मरण पावल्याची कागदोपत्री नोंद !

उपमुख्यमंत्र्यांकडून चौकशीचा आदेश !

  • भारतातील नीतीमूल्यांचा किती र्‍हास झाला आहे, हेच ही घटना दर्शवते ! हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने त्यांना देवासाठी त्याग करून आनंद घ्यायचा असतो, हेच ठाऊक नसल्याने ते अशाश्‍वत गोष्टींसाठी अशा प्रकारचे कृत्य करतात ! हिंदु राष्ट्रात प्रत्येकाला धर्मशिक्षण दिले जाईल !
  • अशा घटनांमुळेच मंदिरांचे सरकारीकरण करण्याचे कारण राज्य सरकारांना मिळते आणि ते मंदिरे नियंत्रणात घेतात, हे लक्षात घ्या !
  • अशा गोष्टीसाठी उत्तरदायी असणार्‍या सर्वांनाच कठोर शिक्षा देण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे अन्यथा उद्या ‘सरकार आणि प्रशासन मरण पावले आहे’, असे सांगून सरकारी भूमीही लाटली जाईल !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशमधील मोहनलालगंज येथील कुशमौरा हलुवापूर या गावामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि श्रीराम यांच्या एकत्रित मंदिराची भूमी हडपण्यासाठी या देवता मरण पावल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मंदिराचे मूळ विश्‍वस्त सुशीलकुमार त्रिपाठी यांनी वर्ष २०१६ मध्ये नायब तहसीलदारांकडे केलेल्या तक्रारीमुळे २५ वर्षांपूर्वीचे हे प्रकरण आता उजेडात आले आहे. (वर्ष २०१६ मध्ये तक्रार केल्यानंतर ही गोष्ट वर्ष २०२१ मध्ये उघड होते, यावरून प्रशासकीय कारभार कसा चालत आहे, याची कल्पना येते ! – संपादक) उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी प्रफुल्ल त्रिपाठी यांना दिला आहे. (आता ही चौकशी किती वर्षे चालणार, हे देवालाच ठाऊक ! – संपादक)

१. हे मंदिर १०० वर्षांहून अधिक जुने आहे. या मंदिराच्या मालकीची ७ सहस्र ३०० चौरस मीटर क्षेत्रफळाची भूमी आहे. हे मंदिर कृष्ण-राम ट्रस्टकडून चालवण्यात येत आहे. मंदिरातील भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण या देवतांचे वडील म्हणून गयाप्रसाद या व्यक्तीचे नाव कागदपत्रांत नमूद करण्यात आले होते.

२. वर्ष १९८७ मध्ये या मंदिराच्या मालकीच्या भूमीच्या कागदपत्रांत काही फेरफार करून भगवान श्रीकृष्ण आणि श्रीराम या देवता मरण पावल्याचे दाखवून ट्रस्टची ही सर्व भूमी गयाप्रसाद यांच्या नावावर करण्यात आली होती. वर्ष १९९१ मध्ये गयाप्रसाद मरण पावले. त्यानंतर कृष्ण-राम ट्रस्टची सारी सूत्रे त्यांचे भाऊ रामनाथ आणि हरिद्वार यांच्याकडे गेली.