हिंद महासागरातील देशांच्या हितांकडे दुर्लक्ष केले जाणार नाही ! – बायडेन यांनी जिनपिंग यांना सुनावले

जो बायडेन आणि शी जिनपिंग यांच्यात दूरभाषवर चर्चा

‘जो बायडेन जिंकल्यास अमेरिकेत चीनचे राज्य येईल’, असे ट्रम्प यांच्याकडून म्हटले जात होते, तसेच तज्ञांकडूनही ‘बायडेन यांचे चीनविषयी धोरण मवाळ असेल’, असा दावा केला जात होता; मात्र अद्यापतरी तो चुकीची ठरत असल्याचेच यातून दिसत आहे !

(डावीकडून) जो बायडेन आणि शी जिनपिंग

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी प्रथमच दूरभाषवर चर्चा केली. याविषयी अधिकृतरित्या कोणतीही माहिती चीन किंवा अमेरिका यांच्याकडून देण्यात आली नसली, तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हाँगकाँगमध्ये चीनने अडेलतट्टूपणा दाखवल्यावरून बायडेन यांनी चिंता व्यक्त केली. तसेच ‘तेथील परिस्थितीत सुधारणा व्हायला हवी’, अशी अपेक्षा व्यक्त केली. ‘हिंद महासागरातील देशांच्या हितांकडे दुर्लक्ष केले जाणार नाही’, असेही बायडेन यांनी सुनावले. या चर्चेच्या वेळी बायडेन यांनी शिनजियांग प्रांतात उघुर मुसलमानांच्या होत असलेल्या छळाचे सूत्रही उपस्थित केले. या चर्चेत दोन्ही देशांनी परस्पर सहकार्य करण्याविषयीही चर्चा झाली.

व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, बायडेन यांनी जिनपिंग यांना मानवी अधिकाराच्या सूत्रावरून कडक शब्दांत सुनावले. ‘हा प्रश्‍न अमेरिकाच नव्हे, तर जगासाठी चिंतेचा विषय आहे. आमची त्यावर कडक भूमिका राहील. अमेरिकेच्या नागरिकांची सुरक्षा आणि त्यांचे हितरक्षण यांविषयी तडजोड केली जाणार नाही.