पनवेल येथे वीज देयक माफ करण्यासाठी भाजपच्या वतीने ‘टाळा ठोको आणि हल्लाबोल’ आंदोलन

पनवेल – राज्यातील वीज ग्राहकांना वीज देयक माफ करून दिलासा देण्याऐवजी त्यांना वेठीस धरून कारभार चालवण्याचे काम करणार्‍या महाविकास आघाडी शासनाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत पनवेल तालुका आणि शहर भाजपच्या वतीने भाजपचे जिल्हाध्यक्ष अन् आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भिंगारी येथील महावितरण कार्यालयात ५ फेब्रुवारी या दिवशी वीज देयक माफ करण्याच्या मागणीसाठी ‘टाळा ठोको आणि हल्लाबोल’ आंदोलन करण्यात आले.

राज्य शासनाने प्रतिमहा १०० युनिट देयक माफ करण्याचे घोषित केले होते. त्यानुसार १२ मासांचे १ सहस्र २०० युनिटचे वीज देयक माफ करा, तसेच शेतकर्‍यांची वीज जोडणी किमान ५ वर्षे कापू नये, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या आंदोलनात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वीजग्राहक सहभागी झाले होते.

७५ लाख वीज ग्राहकांची वीज कट करण्याचा फतवा राज्य सरकारने काढला आहे. या निर्दयी सरकारचा धिक्कार करत असून सरकारला जाग न आल्यास ऊर्जा मंत्र्यांना जनता उग्र आंदोलनाचा ‘शॉक’ दिल्याशिवाय रहाणार नाही, असे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील म्हणाले.

महापौर डॉ. कविता चौतमोल या वेळी म्हणाल्या की, वाढीव देयके अल्प करणे आवश्यक आहे. ज्यांची देयक भरण्याची परिस्थिती नाही, अशा गरीब वीज ग्राहकांचे देयक माफ करावे.

वीजजोडण्यांचा पुरवठा खंडित करण्याचा निर्णय सरकारने मागे घेण्याच्या मागणीसाठी भाजपचे नाशिक येथे आंदोलन

नाशिक – राज्यातील ७२ लाख वीजजोडण्यांचा पुरवठा खंडित करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने तात्काळ मागे घ्यावा, या मागणीसाठी भाजपच्या वतीने शहरातील तिबेटीयन मार्केट येथील महावितरण कार्यालय परिसरात आंदोलन केले आणि कार्यलयाला टाळे ठोकले. कोरोनाच्या प्रसारापूर्वी महाविकास आघाडीच्या ऊर्जामंत्र्यांनीच १०० युनिटपर्यंतचे वीज देयक माफ करण्याचे आश्‍वासन दिले होते; परंतु हे आश्‍वासन प्रत्यक्षात पूर्ण केले नाही. जर दिलेली आश्‍वासने पूर्ण करायची हिंमत महाविकास आघाडी सरकारमध्ये नसेल, तर निदान अशी सक्तीने वीजदेयक वसुली करणे थांबवावी अन्यथा भाजप रस्त्यावर उतरून जनआंदोलन करेल, अशी चेतावणी आमदार देवयानी फरांदे यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. या वेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण सावजी, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष हिमगौरी आडके, आदी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.