शिवाजी महाराज यांचे पूर्वज कर्नाटक येथील असल्याचे विधान चुकीचे ! – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

प्रवीण दरेकर

पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांना जातीपाती आणि जन्मस्थळे यांमध्ये अडकवू नका. त्यांचा जन्म हा महाराष्ट्रातील शिवनेरी येथे झाला आहे, हे अवघ्या जगाला ठाऊक आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्वज हे कर्नाटक येथील असल्याचे विधान चुकीचे आहे, असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले आहे. ‘असे विधान करून थोर पुरुषांच्या संदर्भात वाद निर्माण करू नये’, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ते लोणावळा येथे शिवक्रांती कामगार संघटनेने आयोजित केलेल्या कामगार मेळाव्यानंतर माध्यमांशी बोलत होते. या वेळी माजी मंत्री बाळा भेगडे, शिवक्रांती कामगार संघटनेचे अध्यक्ष विजय पाळेकर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्वज कर्नाटकातील होते. त्यांचे मूळ पुरुष बेळीअप्पा आहेत. कर्नाटकात दुष्काळ पडल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज महाराष्ट्रात गेले. नंतरच्या पिढीतील शिवाजी महाराज आहेत. त्यामुळे शिवाजी महाराज हे मूळचे कन्नड भूमीतील आहेत. तसेच कर्नाटकात मराठी आणि कन्नड जनता प्रेमाने रहाते. जात मराठा असली, तरी ते कन्नडच आहेत, असा दावा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री गोविंद कार्जोळ यांनी केला होता.