भिवंडी न्यायालयात न्यायाधिशांसमोरच अधिवक्त्यांमध्ये मारहाण; पत्रकाराला धमकी

असे अधिवक्ते अशीलाला न्याय कसे मिळवून देत असतील ?

भिवंडी, १ फेब्रुवारी (वार्ता.) – एका खटल्याची सुनावणी ३१ जानेवारी या दिवशी भिवंडी न्यायालयात चालू असतांना आरोपी आणि फिर्यादी यांची दोन्ही अधिवक्ते त्यांची बाजू मांडत होते. त्या वेळी न्यायाधिशांच्या समोरच अधिवक्ता शैलेश गायकवाड आणि अधिवक्ता अमोल कांबळे यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर नंतर हाणामारीमध्ये झाले. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी दोन्ही अधिवक्त्यांना शांतीनगर पोलीस ठाण्यात आणले. अधिवक्ता अमोल कांबळे यांनी अधिवक्ता शैलेश गायकवाड यांच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.

या घटनेची माहिती पत्रकारांना मिळताच घटनेचे वार्तांकन करण्यासाठी ‘एबीपी माझा’चे पत्रकार अनिल वर्मा गेले असता या गोष्टीचा राग अधिवक्ता गायकवाड यांना आल्याने त्यांनी वर्मा यांना शिवीगाळ केली आणि ‘बातमी लावली तर तुला बघून घेईन’, असे धमकावत पोलीस ठाण्यासमोर मारहाण करण्यास आरंभ केला. ‘आम्ही दिलेल्या बातम्या तू लावत नाहीस आणि आमची बातमी कशी लावतो तेच बघतो’, अशी धमकी त्यांना दिली. या प्रकरणात पत्रकार अनिल वर्मा यांच्याकडून अधिवक्त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. भिवंडीतील पत्रकारांनी या दुर्दैवी घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.