आपत्काळात कशी स्थिती येणार आहे, हे गेली अनेक वर्षे सनातन संस्थेसह अनेक संत सांगत आहेत ! ते आता अशा उदाहरणावरून लक्षात येईल !
नांदेड – आता खुल्या शेतीला भविष्य राहिलेले नाही. आच्छादित शेतीशिवाय काहीही शिल्लक रहाण्याची शक्यता नाही. आगामी काळात शेतीला चांगले दिवस नाहीत, हे निश्चित आहे. पृथ्वीवरचे तापमान आणि हवेतील कार्बन वाढल्याने कितीतरी पिके नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पीक विमा जेवढा मजबूत करता येईल, तेवढा मजबूत केला पाहिजे. हवेतील कार्बन अल्प करणारी पिके घेऊन पिकांमध्ये पालट करावा लागणार आहे, असे प्रतिपादन राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी ३० जानेवारी या दिवशी येथे एका वृत्तवाहिनीशी बोलतांना केले.
ते पुढे म्हणाले की, केंद्राच्या क्रीडा नावाच्या संस्थेने एक अहवाल दिला आहे की, वर्ष २०३० पर्यंत दुधाचे उत्पन्न हे चाळीस टक्क्यांवर येईल, तर पावसाचे प्रमाण अल्प आणि तापमानात वाढ होऊन अनेक पिकेही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पर्यावरणपूरक पिके घेण्यास शेतकर्यांना प्रवृत्त करण्यासाठी शासनाला पुढाकार घ्यावा लागणार आहे. शासनाने पेट्रोल, डिझेल, कोळसा जाळण्यावर, तसेच प्लास्टिकवर बंदी आणणे आवश्यक आहे. वातावरणात अधिकाधिक ऑक्सिजन कशाप्रकारे असेल, याविषयी केंद्र शासनाने उपाययोजना करणे आवश्यक आहे.