सावंतवाडी कुटीर रुग्णालयात कोरोनाची लस देतांना कोरोना योद्धा असलेल्या पालिका कर्मचार्‍यांना प्राधान्य दिले नाही ! – माजी आरोग्य सभापती परिमल नाईक

माजी आरोग्य सभापती परिमल नाईक

सावंतवाडी – कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या जिवावर उदार होऊन सेवा बजावणार्‍या येथील पालिका कर्मचारी असलेल्या कोरोना योद्ध्यांना डावलून आवश्यकता नसलेल्या लोकांना सावंतवाडी कुटीर रुग्णालयात कोरोनाची लस दिल्याचा आरोप सावंतवाडी पालिकेचे नगरसेवक तथा माजी आरोग्य सभापती परिमल नाईक यांनी केला आहे.

हा प्रकार योग्य नाही. कोरोना काळात पालिका सफाई कर्मचारी, आरोग्यसेवक, यांनी ज्या पद्धतीने कामे केली, त्यामुळे आपण शहरात मोठया प्रमाणात कोरोनावर मात करू शकलो. त्यामुळे कोरोनाची लस प्राधान्याने त्यांना द्यायला पाहिजे; परंतु तसे न होता ही लस इतरांना दिली जाते. हा सर्व प्रकार चुकीचा आहे, अशा शब्दांत त्यांनी अप्रसन्नता व्यक्त करून या प्रकाराची चौकशी होणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यासाठी आवश्यक असलेले पुरावे त्यांच्याकडे आहेत, असेही ते म्हणाले.