युरोपीय संघाकडून भारताला नव्हे, तर पाकच्या बासमती तांदळाला ‘जीआय’ टॅग !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – गेल्या वर्षी सप्टेंबर मासामध्ये भारताकडून बासमती तांदळावर मालकी सांगणारा अर्ज युरोपीय संघाकडे करण्यात आला होता. लांब दाण्याचा हा तांदूळ उत्तर भारतात, हिमालयाच्या पायथ्याशी, गंगेच्या पठारी प्रदेशात पिकवला जातो. त्यामुळे याचे मूळ भारतात आहे, असा दावा भारताने केला होता. या दाव्याला डिसेंबर २०२०मध्ये पाकिस्तानने आव्हान दिले होते. बासमती तांदूळ हा भारत आणि पाकिस्तान दोन्हीकडे पिकतो, असे पाकिस्तानचे म्हणणे होते. पाकच्या या दाव्याला मान्यता देत पाकला ‘बासमती’ तांदळाच्या जगप्रसिद्ध जातीचा ‘भौगोलिक निदर्शक शिक्का’ (जीआय टॅग) मिळाला आहे. यामुळे बासमती तांदळाचे मूळ स्थान म्हणून यापुढे पाकिस्तानचा उल्लेख होईल. जागतिक बाजारात कोणतेही उत्पादन नोंदवण्यासाठी त्या उत्पादनाची नोंदणी प्रथम संबंधित देशाच्या जीआय कायद्यांतर्गत होणे आवश्यक असते. सध्या प्रतीवर्षी पाकमधून ५ ते ७ लाख टन बासमती तांदूळ जगभरात निर्यात केला जातो. यांपैकी २ लाख ते अडीच लाख टन तांदूळ युरोपीय संघाला निर्यात केला जातो.

भारताच्या व्यापारावर परिणाम नाही ! – शेतकरी संघटना न्यासाचे अध्यक्ष गोविंद जोशी

भारताच्या बासमती तांदळाच्या व्यापारावर याचा विशेष परिणाम होईल, असे वाटत नाही. उद्या पाकिस्तानी बासमती तांदूळ भारतात विक्रीसाठी आला, तरी ग्राहक दोन्ही बासमतींची गुणवत्ता तपासून पाहील आणि मग कोणता बासमती खरेदी करायचा ते ठरवेल. टॅगचे तात्कालिक परिणाम दिसून येतील; पण दीर्घकालीन परिणाम होणार नाहीत, असे शेतकरी संघटना न्यासाचे अध्यक्ष गोविंद जोशी यांनी म्हटले.

‘जीआय टॅग’ म्हणजे काय ?

विशिष्ट भौगोलिक प्रदेशात मूळ असलेल्या पदार्थांना, पिकांना त्या प्रदेशाची ओळख मिळावी यासाठी ‘भौगोलिक निदर्शक शिक्का’ (‘जीआय टॅग’) दिला जातो. जीआय टॅग मिळाल्यामुळे त्या पदार्थाची, पिकाची गुणवत्ता आणि महत्ता ही त्या प्रदेशाशी कायमची जोडली जाते.