एका समाजातील महिलांविषयी अपमानास्पद लिखाण केल्याचा आरोप
जळगाव – ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीत लभान गोरबंजारा समाजातील महिलांविषयी अपमानास्पद लिखाण करण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
अधिवक्ता भरत पवार यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली. त्यावरून हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भालचंद्र नेमाडे यांना दिलेला ज्ञानपीठ पुरस्कार परत घेण्याची मागणीही एका निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या पदाधिकार्यांनी जामनेरचे तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन दिले आहे. त्यात ही मागणी केली आहे. पुस्तकाचे प्रकाशक हर्ष भटकळ यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.