साप्ताहिक शास्त्रार्थ
१४.१.२०२१ या दिवसापासून पौष मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी साप्ताहिक शास्त्रार्थ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार शार्वरी नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४२, उत्तरायण, हेमंतऋतू, पौष मास चालू आहे.
(संदर्भ : दाते पंचांग)
२. शास्त्रार्थ
२ अ. पुत्रदा एकादशी : श्रावण शुक्ल पक्ष एकादशी आणि पौष शुक्ल पक्ष एकादशी या दोन्ही एकादशींना पुत्रदा एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णु आणि श्री लक्ष्मी यांची पूजा करतात. पुत्रदा एकादशीच्या व्रताने दांपत्याला पुत्र संतती होते, असे मानले जाते.
२ आ. मन्वादि : पौष शुक्ल पक्ष एकादशी या तिथीला मन्वादि योग होतो. या दिवशी केलेल्या श्राद्धाचे विशेष फल सांगितले आहे.
२ इ. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. २४.१.२०२१ या दिवशी उत्तररात्री १२.०१ पासून २५.१.२०२१ या दिवशी उत्तररात्री १२.२५ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
२ ई. दग्ध योग : दग्ध योग हा अशुभ योग असल्याने सर्व कार्यांसाठी निषिद्ध मानला आहे. २४.१.२०२१ या दिवशी रविवार असून रात्री १०.५८ नंतर द्वादशी तिथी असल्याने रात्री १०.५८ पासून सोमवारी सूर्योदयापर्यंत दग्ध योग आहे.
२ उ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी विष्टी करण असते, त्या काळालाच भद्रा किंवा कल्याणी असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यात विलंब होण्याचा संभव असतो. २४.१.२०२१ या दिवशी सकाळी १०.०१ पासून रात्री १०.५८ पर्यंत विष्टी करण आहे, तसेच २७.१.२०२१ या दिवशी उत्तररात्री १.१८ पासून २८.१.२०२१ या दिवशी दुपारी १.०६ पर्यंत विष्टी करण आहे.
२ ऊ. अमृतयोग : अमृतयोगावर कोणतेही शुभ कार्य केल्यावर यश प्राप्त होते. २३.१.२०२१ या दिवशी हा योग रात्री ९.३३ पासून २५.१.२०२१ या दिवशी उत्तररात्री १.५५ पर्यंत आहे.
२ ए. भौमप्रदोष व्रत : प्रत्येक मासातील शुक्ल आणि कृष्ण त्रयोदशीला प्रदोष असे म्हणतात. मंगळवारी येणार्या प्रदोष तिथीला भौमप्रदोष म्हणतात. आर्थिक अडचणी नष्ट होण्यासाठी भौमप्रदोष हे व्रत करतात. गतजन्मी केलेल्या पापामुळे लागलेल्या विविध प्रकारच्या दोषांचे निवारण करण्यासाठी, तसेच भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी सायंकाळी हे व्रत करतात.
२ ऐ. यमघंट योग : वार आणि नक्षत्र यांच्या संयोगाने यमघंट योग होतो. २६.१.२०२१ या दिवशी उत्तररात्री ३.१२ पर्यंत आर्द्रा नक्षत्र आणि मंगळवार एकत्र आल्याने यमघंट योग होतो. हा अनिष्ट योग आहे. या योगावर कधीही प्रवास करू नये.
२ ओ. गुरुपुष्यामृत योग : गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यास गुरुपुष्यामृत योग होतो. २८.१०.२०२१ या दिवशी सकाळी ९.४१ पासून दुसर्या दिवशी सूर्योदयापर्यंत गुरुपुष्यामृत योग आहे. या दिवशी सुवर्ण खरेदी करणे आणि शुभ कार्ये करणे, असा प्रघात आहे. साधकांनी गुरुपुष्यामृत योगावर सुवर्ण खरेदी करण्यापेक्षा अधिकाधिक साधना करणे आवश्यक आहे.
२ औ. माघस्नानारंभ : सूर्योदयकाली असलेल्या पौष पौर्णिमेच्या दिवशी माघस्नानारंभ होतो. दोन दिवशी सूर्योदयकाली पौर्णिमा तिथी असल्यास दुसर्या दिवशी माघस्नान आरंभ करतात. पौष पौर्णिमेला चंद्र ग्रह पुष्य नक्षत्रात असल्याने या दिवशी तीर्थक्षेत्री स्नान केल्याने विशेष लाभ होतो. तीर्थक्षेत्री स्नान करणे शक्य नसल्यास पवित्र नद्यांचे स्मरण करून स्नान करावे. २८.१०.२०२१ या दिवशी सूर्योदयकाली पौष पौर्णिमा तिथी आहे.
२ अं. शाकंभरी पौर्णिमा : पौष शुक्ल पक्ष अष्टमी तिथीपासून पौष पौर्णिमेपर्यंत शाकंभरी देवीचा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाची समाप्ती पौष मासातील उदयव्यापिनी पौर्णिमेला होते; म्हणून या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी अनेक भाज्यांचा (शाक) नैवेद्य देवीला दाखवला जातो.
– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१४.१.२०२१)
टीप १ – ज्योतिषशास्त्रानुसार सूर्योदयानंतर वार पालटतो.
टीप २ – प्रदोष, घबाड मुहूर्त, भद्रा (विष्टी करण), यमघंट योग आणि संकष्ट चतुर्थी यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे. टीप ३ – शेजारील सारणीतील शुभ / अशुभ दिवस पाहून दिवस अशुभ आहे, हे कळल्यावर प्रवास किंवा इतर सेवा केल्यास त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील, अशी शंका साधकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा साधकांनी संतांची पुढील वचने लक्षात ठेवावीत. १. हरिचिया दासा हरि दाही दिशा । अर्थ : भक्ताला सर्वत्र देवाचेच दर्शन होते. भक्ताचा जसा भाव असतो, त्या स्वरूपात त्याला देव दिसतो. २. तुका म्हणे हरिच्या दासा । शुभ काळ दाही दिशा ॥ अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, भक्तासाठी सर्व दिशा आणि वेळ ही शुभच असते. ज्या व्यक्तीच्या मनात सतत ईश्वरप्राप्तीचा ध्यास आहे, अशा भक्ताची काळजी ईश्वर घेतो. |