संजीवनी !

गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी जगातील अनेक देश कोरोनाविरोधी लस बनवण्यासाठी प्रयत्नशील होते. असे असतांना भारताला त्यात यश मिळाले आणि त्याच्या गुणवत्तेवरही जगाचा विश्‍वास निर्माण झाला, ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ऑक्सफर्डच्या फायजर आस्थापनाने लस बनवली, त्याच वेळी चीनची लसही सिद्ध झाली. दोघांचा वापर काही देशांमध्ये चालू झाला. चीनच्या लसीवर जगाचा विश्‍वास नाही आणि त्याची गुणवत्ताही चांगली नाही, हे दिसून येत आहे. भारतात भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूट यांच्याकडून कोरोनाविरोधी लस शोधण्यात आल्यानंतर १६ जानेवारीपासून लसीकरण चालू झाले आहे. भारताने कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन अशा दोन लसींचे उत्पादन करण्यात येत आहे. काही देशांनी फायजर आणि चीनच्या लसीची मागणी करून त्याचा वापर चालू केला आहे; मात्र अनेकांचा या लसींवर विश्‍वास नसल्याने आणि तांत्रिक अन् आर्थिक दृष्ट्या भारताच्या लसी अधिक चांगल्या असल्याने अनेक देशांची याची मागणी केली आहे; मात्र भारताने प्रथम भारतातील पहिल्या फळीतील म्हणजे डॉक्टर, परिचारिका, पोलीस, प्रशासन यांमधील लोकांना तिचे डोस देण्यात आल्यानंतर शेजारी देशांना ही लस देऊन मग उर्वरित देशांना पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. तरीही भारताने यात पालट करत शेजारील देशांना काही लाख लसींचे डोस पाठवले आहेत. मालदीवला भेट स्वरूपात दीड लाख डोस पाठवण्यात आले. तसेच ब्राझिलच्या मागणीवरून त्यालाही २० लाख डोस पाठवण्यात आले. याचे ब्राझिलच्या राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांनी भारताचे आभार मानतांना एक चित्र ट्विटरवर पोस्ट केले आहे. यात भारतातून श्री हनुमान हातात संजीवनी असलेला डोंगर घेऊन ब्राझिलमध्ये येत आहे, असे दर्शवले आहे. हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांचा एका विदेशी आणि ख्रिस्ती देशाच्या राष्ट्रपतींकडून अशा प्रकारे आध्यात्मिक स्तरावर मानण्यात आलेले आभार महत्त्वाचे आहे. एरव्ही भारतियांच्या धार्मिक ग्रंथांवर टीका करणारे भारतीय पुरो(अधो)गामी आणि पाश्‍चात्त्यांना ही चपराकच आहे. बोलसोनारो यांच्या आभारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे आभार मानले.

ब्राझिलच्या राष्ट्रपतींचा आभार भारतासाठी फार मोठा आहे. भारत हा विश्‍वगुरु होता. भारतातील हिंदू जगाला वसुधैव कुटुम्बकम् । या दृष्टीनेच पहातात. हीच त्यांची संस्कृती आहे, त्यातून संकटाच्या काळात भारताकडून अशा प्रकारचे साहाय्य केले जात आहे. आताच नाही, तर यापूर्वीही हायड्रोक्लोरोक्विन हे औषधही भारताकडून अमेरिकेसह अन्य देशांना त्यांनी मागणी केल्यानंतर देण्यात आले होते. त्या वेळीही भारताचे आभार मानण्यात आले होते. हिंदूंची संस्कृती ही मारण्याची नाही, तर जगवण्याची आहे, हे यातून जगाला पुन्हा एकदा लक्षात आले. भारताच्या इतिहासामध्ये भारत कधीही आक्रमक देश नव्हता. भारताने कधी इतरांवर आक्रमण करून वंशसंहार केला नाही; मात्र भारतावर मुसलमान आणि ख्रिस्ती आक्रमकांनी आक्रमण करून कोट्यवधी हिंदूंची हत्या केली. त्यांचा छळ केला. त्यांच्या धार्मिक स्थळांची तोडफोड केली; मात्र भारताने कधी याचा सूड घेण्याचा प्रयत्न केला नाही. हीच हिंदु संस्कृती आहे !