पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला लागलेल्या आगीत ५ जणांचा मृत्यू ! – महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे

आगीच्या प्रकरणी घातपाताचा संशयाच्या दृष्टीने केंद्रीय यंत्रणांकडून तपास चालू

पुणे – येथील सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीमध्ये लागलेल्या आगीत ५ जणांचा मृत्यू झाला. त्या ठिकाणी वेल्डिंगचे काम चालू असल्याने ठिणगी पडून आग लागली, अशी प्राथमिक माहिती असल्याचे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

या आगीच्या प्रकरणी घातपाताचा संशयाच्या दृष्टीने केंद्रीय यंत्रणांकडून तपास चालू करण्यात आला असून माहिती घेण्यात येत आहे. सध्या आग आटोक्यात आली आहे. इमारतीच्या तिसर्‍या आणि चौथ्या मजल्यावर ही आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी आल्या होत्या. आगीमुळे धुराचे मोठे लोळ पसरले होते.

राजेश टोपे

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे पुढे म्हणाले की, सीरम इन्स्टिट्यूटच्या बीसीजी लस बनवणार्‍या इमारतीला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आग लागली. या इन्स्टिट्यूटचा हा मांजरी भागातील नवीन ‘प्लान्ट’ आहे. इमारतीचे काम चालू होते. ‘वेल्डिंग’ चालू असल्यामुळे ही आग लागली आणि तेथे ‘इन्सूलेशन’चे साहित्य असल्याने आग त्वरित पसरली. आता आग विझवण्यात आली आहे. आग आटोक्यात यायला २ ते ३ घंटे वेळ लागला. कोरोनाच्या लसीची निर्मिती जेथे होते, ती इमारत घटनास्थळापासून दूर आहे. त्यामुळे लसीला कुठलीही हानी झालेली नाही. या संदर्भात पोलीस तपास चालू आहे.

आग विझवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व यंत्रणांना सूचना दिल्या होत्या. सीरमचे अदर पुनावाला यांनी प्रारंभी ट्वीटमध्ये आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगितले होते; मात्र पोलीस प्रत्यक्ष घटनास्थळी गेल्यावर त्यांना ५ जणांचे मृतदेह सापडले.