अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने मिरज येथे ब्रह्म कोरोना योद्धयांचा सन्मान
मिरज, १८ जानेवारी – कोरोनाच्या काळात कोरोना योद्धयांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांनी जिवाची पर्वा न करता अवितरपणे केलेले काम निश्चितच गौरवास्पद आहे, असे मनोगत ज्येष्ठ सरकारी अधिवक्ता उज्वल निकम यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ मिरज तालुका आणि ब्राह्मण परिवार यांच्या वतीने १७ जानेवारी या दिवशी गोरे मंगल कार्यालय येथे बह्म कोरोना योद्धा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे मिरज तालुकाध्यक्ष श्री. ओंकार शुक्ल यांनी प्रास्ताविक केले, तर कविता घारे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन वैशाली गोडबोले यांनी केले.
या वेळी सांगली अर्बन सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. गणेश गाडगीळ, सौ. दुर्गादेवी शिंदे-म्हैसाळकर, राज्य गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपअधीक्षक श्री. मुकुंद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात आधुनिक वैद्य, पोलीस, शव वाहिकेचे चालक, मृत कोरोना रुग्णांना अग्नि देणारे कर्मचारी यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अत्तर, गंध आणि तिळगुळ देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले. या वेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे सांगली जिल्हाप्रमुख श्री. मंगेश ठाणेदार, भाजप प्रसिद्धीप्रमुख श्री. केदार खाडीलकर, सर्वश्री श्रेयस गाडगीळ, दिगंबर कुलकर्णी, कुश आठवले, भूषण गोठणकर, सौ. मुग्धा गोरे, सौ. अपर्णा कोल्हटकर, अनुराधा जोशी यांसह अन्य उपस्थित होते.