मांगोरहिल, वास्को येथील श्री अय्यप्पा मंदिर !

स्वामिये शरणम् अय्यप्पा !

श्री अय्यप्पादेव

इतिहास

अय्यप्पा सेवा समिती, मांगोरहिल, वास्को या संस्थेची स्थापना मार्च १९७८ मध्ये झाली. तेव्हापासून गेल्या ४२ वर्षांत या समितीने लक्षणीय प्रगती साधली असून गोव्यातील प्रमुख मंदिरांमध्ये श्री अय्यप्पा मंदिराची गणना होते.

वर्ष १९७८पर्यंत मांगोर हिल, वास्को येथील मोजकेच भक्त त्यांच्या निवासस्थानी श्री अय्यप्पा देवाची पूजा करायचे आणि भजन म्हणायचे. मार्च १९७८ मध्ये या भक्तांनी एकत्र येऊन अय्यप्पा सेवा समितीची स्थापना केली. दिवंगत श्री. स्वामीदास हे या समितीचे संस्थापक अध्यक्ष होते, श्री. ए. श्रीधरन हे सचिव होते, तर दिवंगत श्री. के. कन्नान हे गुरुस्वामी होते. श्री अय्यप्पादेवाचा पूजाविधी करण्यासाठी समितीला योग्य जागेची उणीव भासत होती. वरुणापुरी येथील श्रीराम मंदिरामध्ये समितीकडून श्री अय्यप्पादेवाची पूजा केली जायची. भक्तांची संख्या वाढत गेली तशी मांगोरहिल येथे श्री अय्यप्पा मंदिराची गरज भासू लागली. समितीच्या अथक प्रयत्नांतून श्री अय्यप्पा मंदिरासाठी वास्तू उभारण्यात आली. यामध्ये अष्टकोन श्रीकोविल, समितीचे कार्यालय आणि २ खोल्या, अशी तरतूद करण्यात आली.

देवतांची स्थापना !

त्यानंतर अष्टकोन श्रीकोविलमध्ये श्री अय्यप्पादेवाचे छायाचित्र ठेवून नियमित पूजा-अर्चा चालू झाली. दिवंगत श्री. के. कन्नान यांच्याकडे पुजारी म्हणून उत्तरदायित्व सोपवण्यात आले. १८ जानेवारी १९८१ या दिवशी अष्टकोन श्रीकोविलमध्ये श्री अय्यप्पादेवाची पाषाणी मूर्ती विधीपूर्वक स्थापन करण्यात आली. त्याच दिवशी येथे श्री विनायक, श्री करुप्पास्वामी आणि श्री नागराज या उपदेवतांची स्थापना करण्यात आली. १८ जानेवारी १९८९ या दिवशी वार्षिक उत्सवाच्या वेळी श्री सुब्रह्मण्यम् (श्री कार्तिकेय) देवाची प्रतिष्ठापना करण्यात आली. या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांसाठी सभामंडपाची उणीव भासू लागली. तीही भक्तांच्या साहाय्यातून पूर्ण करण्यात आली.

वर्ष १९९० मध्ये मी समितीचे अध्यक्षपद स्वीकारले. त्यानंतर प्रसिद्ध मंदिराच्या वास्तूत आचार्य श्री. कनिप्पाय्युर कृष्णन् नंबूदिरीपाद यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य देवता आणि उपदेवता यांची पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर १७ जानेवारी १९९२ मध्ये या ठिकाणी श्री शांतादुर्गादेवीची मूर्ती विधीपूर्वक स्थापन करण्यात आली, तसेच १६ जानेवारी २००३ मध्ये नवग्रह प्रतिष्ठापना करण्यात आली.

मंदिराची रचना !

श्री अय्यप्पादेवाचे मंदिर

श्री अय्यप्पा सेवा समितीने श्री अय्यप्पा मंदिरात सात्त्विकता आणण्याच्या दृष्टीने वेदिक यज्ञ-याग यांना महत्त्व दिले आहे. त्या दृष्टीने श्री. कनिप्पाय्युर कृष्णन् नंबूदिरीपाद यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकल्प पूर्ण करण्यात आले. यामध्ये ध्वजस्तंभ, बळीकल्लू, छुत्तंबलम, विलक्कुमडम्, नमस्कार मंडपम्, पवित्र थिडाप्पली, प्रशासकीय कार्यालय, सभागृह, निवासी गाळे, स्वयंपाकघर आणि भोजनगृह, व्यासपीठ आणि भव्य गोपुरम् यांचा समावेश आहे.

मंदिरात होणारे धार्मिक विधी !

मंदिरात वर्षभर विविध धार्मिक विधी केले जातात. यामध्ये हरिवर्षनाम, अष्टद्रव्य गणपति होम, अष्टदल पद्म भगवती सेवा, मंडल पूजा, महामृत्युंजय होम, निर पुथरी, अय्यप्पन विलाक्कू, नागाक्कम पट्टू, अईल्या पूजा, थांथ्री पूजा, अखंड नामजप, नवरात्री पूजा, सर्वेश्‍वर्या पूजा, शोभायात्रा, भजन इत्यादी कार्यक्रम होतात. मंदिरामध्ये स्वामीभिक्षा आणि अन्नदान हे कार्यक्रमही राबवले जातात.

यंदा १४ ते २१ जानेवारी या काळात आयोजित कार्यक्रम

१४ जानेवारीला सकाळी ९.३० वाजता मकर विलाक्कू, महामृत्युंजय होम, गणपतीला कलशाभिषेक आणि श्री अय्यप्पाला तुपाचा कलशाभिषेक करण्यात येणार आहे.

१५ जानेवारीला नवग्रह प्रतिष्ठापना दिवस असल्याने सकाळी ९ वाजता नवग्रहांना कलशाभिषेक, तसेच अय्यप्पादेवाला दुधाचा अभिषेक करण्यात येईल.

१६ जानेवारीला देवी प्रतिष्ठापना दिवस असल्याने सकाळी ९ वाजता देवीला कलशाभिषेक, तसेच अय्यप्पादेवाला पंचामृताचा कलशाभिषेक होणार आहे.

१७ जानेवारीला उत्सवबलीपूजा होणार असून सकाळी ७.३० वाजता सुब्रह्मण्यम्स्वामींना (कार्तिकेयाला) कलशाभिषेक, सकाळी ८.३० वाजता श्री अय्यप्पादेवाला शहाळ्याचा कलशाभिषेक आणि सकाळी ९.३० वाजता मरप्पानी होणार आहे.

१८ जानेवारीला अय्यप्पा प्रतिष्ठापना दिवस असल्याने सकाळी ८ वाजता कलशपूजा, सकाळी ९.३० वाजता मरप्पानी आणि सकाळी १० वाजता कलाशम् इझुन्नेलिप्पू  आणि अय्यप्पादेवाला कलशाभिषेक होणार आहे.

१९ जानेवारीला सकाळी ७.३० वाजता कराप्पास्वामी आणि नागदेवतेला कलशाभिषेक, तसेच अय्यप्पादेवाला मधाचा कलशाभिषेक आणि रात्री ९ वाजता पल्लीवेट्टा कार्यक्रम होणार आहे.

२० जानेवारीला सकाळी ६ वाजता पल्लीयुनरथल, अभिषेक, अकथेझुन्नेलिप्पू, पूजा, सायंकाळी ५.३० वाजता अरट्टू बलीपूजा, अरट्टू, सायंकाळी ६.३० वाजता अरट्टू थिरीचेझुन्नेलिप्पू, परयीडल, कोडीयीरक्कम, करट्टू कलशम्, दीपाराधना आणि हरिवरसनम् होणार आहे.

अरट्टू थिरीचेझुन्नेलिप्पू मंदिर परिसरात आल्यानंतर जे भक्त परयीडल अर्पण करू इच्छितात, त्यांनी समितीच्या कार्यालयात संपर्क साधावा.

कृतज्ञता !

भगवान श्री अय्यप्पाच्या कृपाशीर्वादाने हे सर्व कृतीत उतरले आ. माजी मख्यमंत्री श्रीमती शशिकला काकोडकर, व्यवस्थापकीय समितीचे सर्व सदस्य, भक्त, अर्पणदाते यांचे याकामी मोलाचे योगदान लाभले आहे.

श्री अय्यप्पादेवाच्या कृपेने मंदिरातील सर्व कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडत आहेत. यामध्ये येणारे अडथळे त्याच्या कृपेनेच दूर होत आहेत. तेच आम्हाला शक्ती आणि प्रेरणा देत आहेत. कलियुगामध्ये मानवतेवर प्रभुत्व गाजवू पहाणार्‍या अनिष्ट शक्तींपासून आमचे रक्षण कर, अशी श्री अय्यप्पादेवाच्या चरणी प्रार्थना !

वर्ष १९८०पासून अय्यप्पा सेवा समितीशी माझा संबंध असून या समितीचा अध्यक्ष म्हणून सेवा करण्याची संधी मिळाल्याविषयी मी स्वत:ला भाग्यवान समजतो.

– श्री. रविशंकर थिरुनिलथ

अध्यक्ष, अय्यप्पा सेवा समिती, वास्को, गोवा.