पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – पंढरपूर शहरातील सरडा भवन येथे भीमा नदीपात्रातून वाळू उपसा करून ती ११ गाढवांवर ११ टिक्की लादून, तर जुना अकलूज रोड जॅकवेल जवळील भीमा नदी पात्रामध्ये १८ गाढवांवर १८ टिक्की लादून, तसेच मांडव खडकीदेवीच्या मंदिराजवळ नदी पात्रातून ७ गाढवांवर वाळू वाहतूक करतांना पोलिसांना आढळले. या एकूण ३६ गाढवाना पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आले होते. या गाढवांच्या मालकांची माहिती पोलिसांना न मिळाल्याने अखेर या गाढवांची रवानगी तमिळनाडू राज्यातील उटी येथे करण्यात आली आहे.
अवैधरित्या वाळू उपसा करणार्या वाहनांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते. या कारवाईपासून वाचण्यासाठी वाळू चोर वाळूची चोरी करण्यासाठी गाढवांचा वापर करतात. प्राण्यांना ठेवण्यासाठी महाराष्ट्रात कोठेही कोंडवाडा नाही. त्या गाढवांना चार दिवस चारा टाकण्याचे काम पोलीस कर्मचारी करत होते, तसेच गाढवे पळून जाऊ नयेत यासाठी २ होमगार्ड यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून ३६ गाढवांना वाहनातून उटी येथे पाठवण्यात आले.