परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !

परात्पर गुरु डॉ. आठवले

वर्ष २०२० मध्ये झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या वेळी ऑनलाईन पद्धतीने दाखवलेल्या ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेसंबंधी केलेले अमूल्य मार्गदर्शन’ या विषयावर परात्पर गुरु डॉक्टरांशी साधकांच्या झालेल्या भेटींच्या वेळच्या चित्रफितींमधील संवाद येथे देत आहोत.

१. सेवेमध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असे काही नसते, सेवा भावपूर्ण आणि मन लावून केल्यामुळे आध्यात्मिक प्रगती होते !

साधिका : मी स्वयंपाकघरात सेवा करते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : आपल्याकडे स्वयंपाकघरातील साधिका ६० टक्के आध्यात्मिक पातळीच्या पुढे आहेत, हे ठाऊक आहे ना ? आणखी १ – २ साधिका तर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या आहेत. १ – २ वर्षांत त्या संत होतील. वर्ष २०१६ मध्ये पू. (कु.) रेखा काणकोणकर या स्वयंपाकघरात सेवा करून संत झाल्या आहेत. सेवेत श्रेष्ठ-कनिष्ठ असे काही नसते. सेवा भावपूर्ण आणि मनापासून केली, तर अध्यात्मात प्रगती होते.

२. सेवा परिपूर्ण होण्यासाठी सेवा करतांना मधे मधे प्रार्थना करून भावस्थितीत रहाण्याचा प्रयत्न करावा !

साधक : पूर्वी मी स्वतःहून माझ्या सेवेतील चुका शोधण्याचा प्रयत्न करत नव्हतो. आता प्रयत्न केल्यानंतर सेवा दोनदा पडताळतो, तरीसुद्धा कधी कधी चूक राहून जाते. त्यामुळे मला पुष्कळ खंत वाटते. ‘असे का झाले ?’, असे मला वाटते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : रामनाथी आश्रमातील साधक सेवा करतांना प्रत्येक १५ – २० मिनिटांनंतर देवाला प्रार्थना करतात. ते भावस्थितीत जाण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर त्यांची सेवा परिपूर्ण होते. सेवा करतांना अधूनमधून प्रार्थना करा.

साधक : ‘सेवा लवकरात लवकर पूर्ण करायची आहे’, असेही कधी कधी मनात असते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : ते ठीक आहे. तो गुण आहे; परंतु सेवा परिपूर्ण व्हायला पाहिजे. सेवेत चुका होता कामा नये. प्रार्थना केल्यावर ती परिपूर्ण होईल.

३. ज्ञानशक्तीमुळे सर्व जण हिंदु धर्माकडे आकृष्ट होत असल्याने ‘अधिकाधिक लेख आणि ग्रंथ यांचे प्रकाशन’ असा उद्देश ठेवून प्रयत्न करावा !

साधक : एकदा आम्ही ग्रंथालयात प्रसार केला. त्या वेळी केवळ दोघे जणच आले. नंतर आम्ही प्रसारासाठी मंदिरातसुद्धा गेलो. तेथेही केवळ चार जणच आले. ‘आम्ही सांगत होतो; परंतु कुणाला ऐकण्याची इच्छाच नाही’, असे वाटत होते. त्याऐवजी जर मी कुणाला मेजवानीसाठी (मौजमजा करण्यासाठी) बोलावले किंवा काही निःशुल्क ठेवले, तर प्रत्येक जण येतो. ‘जर कुणामध्ये मनापासून खरी जागृती करायची असेल, तर मंदिरात करीन; कारण तेथे चांगले वातावरण असेल. त्यामुळे लोक येऊन ऐकतील’, असे मला वाटले होते; परंतु प्रत्यक्षात तसे झाले नाही. असे का झाले असावे ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : हल्ली लोक मंदिरात केवळ सकाम इच्छेने जातात. ‘माझ्या मुलीचे लग्न व्हावे, मला मुलगा झाला पाहिजे’, अशा त्यांच्या काही इच्छा असतात. ‘मला ईश्‍वर पाहिजे’, यासाठी मंदिरात कोण जातो ? आमचे आता ‘ऑनलाइन सत्संग’ चालू आहेत. एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ आहे. त्या माध्यमातून लक्षावधी लोक जोडले जात आहेत.

साधक : ‘मला आतून चांगले वाटत आहे. त्याविषयी इतरांना सांगितले, तर इतरांनाही आनंद वाटेल’, असे मला वाटते. ‘तरी लोक का ऐकून घेत नाहीत ?’, असा प्रश्‍न मला पडला.

परात्पर गुरु डॉ. आठवले : आता एवढा प्रसार एस्.एस्.आर्.एफ्.च्या माध्यमातून झाला आहे. बाकी संस्थांमध्ये इतरांना प्रत्यक्ष जावे लागते. आपल्याला असे काही करावे लागते का ? याचे महत्त्व कसे आहे ? रात्री सर्व जण झोपलेले असतात. जेव्हा सकाळी सूर्य उगवतो, तेव्हा तो सर्वांच्या घरी जाऊन म्हणत नाही की, अरे, उठा ! मी आलो आहे. तो पशू-पक्ष्यांना सांगतो का ? नाही ना ? आणखी एक उदाहरण देतो. फुलात मध असतो. फूल कुणाला बोलवायला जात नाही की, ‘अरे, इकडे या आणि मध आहे तो घेऊन जा’, तरीसुद्धा फुलपाखरे इत्यादी सर्व येतातच ना ? तसेच ज्ञानाचे आहे. इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती अशा ३ शक्ती आहेत. आमच्या ज्ञानाने सर्व जण आकर्षित होतात, तर काळजी कशाला करायची ? ‘अधिक लेख कसे तयार होतील ? ग्रंथ कसे होतील ?’, या विचारावर आपले मन केंद्रित करायचे आहे.

४. भक्तीयोगानुसार साधना करणारे भावाच्या स्थितीत राहून आणि कर्मयोगानुसार साधना करणारे परिपूर्ण सेवा करून साधना करतात !

साधिका : ‘श्रीकृष्णाशी अनुसंधान ठेवणे’, ही आपली साधना आहे. श्रीकृष्णाला विचारूनच प्रत्येक कृती करायची आहे. ते मला पुष्कळ कठीण वाटते. ‘मला ठाऊक आहे’, हा अहंचा पैलू अधिक असल्यामुळे असे होते कि आणखी कशामुळे होते ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. प्रत्येकाचा साधनामार्ग वेगळा असतो. भक्तीमार्गी असलेल्यांना ईश्‍वराला विचारूनच कृती करणे सोपे जाते. त्यामुळे ते भावस्थितीत रहातात; परंतु कर्मयोग्यांसाठी ‘सेवा परिपूर्ण करणे’ महत्त्वाचे आहे.