नवी मुंबईत पंतप्रधान निवास योजनेला सर्व पक्षियांचा विरोध

नवी मुंबई – येथे उभारण्यात येणार्‍या पंतप्रधान आवास योजनेतील घरांना शहरातील रहिवाशांसमवेत सर्व पक्षाच्या लोकांनी विरोध करण्यास आरंभ केला आहे. भाजपसमवेत महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनीही पंतप्रधान आवास योजनेला विरोध केला आहे.

रेल्वे स्थानकामधील वाहनतळ, मैदान, एपीएम्सीतील ट्रक टर्मिनस अशा मोक्याच्या जागेवर ही घरे उभी रहाणार आहेत. ही १० सहस्र घरे उभारल्यास मोकळ्या जागा नामशेष होणार असल्याने सिडकोच्या या प्रकल्पाला सर्व स्तरांतून विरोध होत आहे.

सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईतील सानपाडा आणि जुईनगर रेल्वेस्थानक, वाशीतील ट्रक टर्र्मिनल अशा मोक्याच्या ठिकाणी सिडको ही घरे उभारणार आहे. अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी घरांची निर्मिती होणार आहे. रेल्वे स्थानकाबाहेरील वाहनतळातील जागेत आणि मोकळ्या भूखंडावर घरांचा प्रकल्प उभारला गेल्यास वाहनतळाची मोठी समस्या निर्माण होऊ शकते. तसेच शहरात हाताच्या बोटावर मोजण्या ऐवढ्या जागाच मोकळ्या सोडल्या आहेत. त्याही रेल्वे स्थानकाबाहेर आहेत. त्यामुळे जर येथे प्रकल्प उभा केल्यास मोकळ्या जागेचे अस्तित्व संपणार असून शहराला बकाल स्वरूप येऊ शकते, असा आरोप भाजप आमदार गणेश नाईक यांनी केला आहे.

शहरातील लोकसंख्या प्रमाणाच्या बाहेर वाढल्याने आधीच गाड्यांच्या वाहनतळाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे सिडकोने हा गृहप्रकल्प उभा करायला घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी शिवसेनेने दिली आहे.

वाहनतळाच्या जागेच्या ठिकाणी गृहप्रकल्प उभारला जाणार असला, तरी सध्याचे वाहनतळ भूमिलगत ठेवून वरील बाजूस घरे सिद्ध करणार असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे.