कोल्हापुरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेकडून रहित

कोल्हापूर – कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रहित झाल्यानंतर आता रिझर्व्ह बँकेकडून कोल्हापूर येथील सुभद्रा लोकल एरिया या बँकेचा परवाना रहित करण्यात आला आहे. बँकेच्या कारभारातील समस्यांमुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचे रिझर्व्ह बँकेने सांगितले. २४ डिसेंबरपासून या बँकेचे कामकाज रहित करण्यात आले आहे.

या कारवाईमागील कारण सांगतांना रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, सुभद्रा बँकेचे कामकाज सध्याच्या आणि भविष्यातील ठेवीदारांच्या हितासाठी हानीकारक ठरेल अशा पद्धतीचे आहे. रिझर्व्ह बँक याविषयी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे; मात्र सुभद्रा लोकल एरिया बँक सर्व ठेवीदारांची भरपाई करण्यास समर्थ असल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात सुभद्रा लोकल एरिया बँकेच्या एकूण १३ शाखा आहेत. वर्ष २००३ मध्ये उद्योगपती अण्णासाहेब मोहिते यांनी या बँकेची स्थापना केली होती.